आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

संजीवनमध्ये शिक्षण विभाग, कोल्हापूर विभागाची विभागस्तरीय आढावा बैठक संपन्न

संजीवनमध्ये शिक्षण विभाग, कोल्हापूर विभागाची विभागस्तरीय आढावा बैठक संपन्न

पन्हाळा : प्रसाद जाधव | एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

येथील संजीवन शिक्षण समूहामध्ये शिक्षण विभाग, कोल्हापूर विभागाची विभागस्तरीय आढावा बैठक खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. बैठकीचा प्रारंभ शिक्षण उपसंचालक प्रभावती कोळेकर, संजीवन शिक्षण समूहाचे सहसचिव एन. आर. भोसले, कोल्हापूर डायटचे प्राचार्य डॉ. रमेश होसकोटी, सांगली डायटचे प्राचार्य डॉ. विकास सलगर, सातारा डायटचे प्राचार्य जितेंद्र साळुंखे, सिंधुदुर्ग डायटचे प्राचार्य राजेंद्र कांबळे आणि रत्नागिरी डायटचे प्राचार्य सुशील शिवलकर यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने झाला.

प्रास्ताविकात एन. आर. भोसले यांनी संजीवन शिक्षण समूहाच्या तीन दशकांच्या संघर्षमय ज्ञानप्रवासाचा आढावा घेतला. तसेच विभागस्तरीय बैठकीच्या आयोजनाची संधी संजीवन शिक्षण समूहाला दिल्याबद्दल शिक्षण विभागाचे आभार मानले.

याप्रसंगी परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स (पीजीआय) अर्थात शैक्षणिक स्वास्थ्य उपक्रमात कोल्हापूर जिल्ह्याने महाराष्ट्रात प्रथम व भारतात द्वितीय क्रमांक मिळवल्याबद्दल कोल्हापूर, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या पाच जिल्ह्यांतील प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी तसेच डायटच्या प्राचार्यांचा शिक्षण उपसंचालक प्रभावती कोळेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

तसेच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत आयोजित शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झालेल्या जिल्हानिहाय गटशिक्षण अधिकाऱ्यांचाही सन्मान करण्यात आला.

औपचारिक कार्यक्रमानंतर विभागस्तरीय आढावा बैठकीस प्रारंभ झाला. बैठकीत संचमान्यता, वेतन निश्चिती, अंशतः व पूर्णतः अनुदान प्रक्रिया, ‘एक पेड़ माँ के नाम’ उपक्रम तसेच विविध शैक्षणिक विषयांवर सकारात्मक विचारविनिमय करण्यात आला.

बैठकीचे संयोजन शिक्षण उपसंचालक कार्यालय, कोल्हापूर येथील कनिष्ठ प्रशासन अधिकारी समरजीत पाटील, प्रमोद महिंद्रकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. कार्यक्रमाचे छायांकन, ध्वनीव्यवस्था व संयोजनासाठी संजीवन विद्यानिकेतनचे कलाशिक्षक नितीन गावडे, संगीत शिक्षक मंगेश पैंजणे तसेच राज खोत आणि अमित कल्याणकर यांनी सहकार्य केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र कुलकर्णी यांनी केले, तर आभार प्रदर्शन समरजीत पाटील यांनी केले.

यावेळी शिक्षण उपसंचालक प्रभावती कोळेकर यांनी विभागस्तरीय बैठकीचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल संजीवन शिक्षण समूहाचे चेअरमन पी. आर. भोसले व सहसचिव एन. आर. भोसले यांचे विशेष आभार मानले.

या बैठकीस कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी, गटशिक्षण अधिकारी तसेच शिक्षण विभागातील विविध अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://nynavabharatnews.online/

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??