संजीवनच्या पाच शिक्षकांची आयआयटी मधील कार्यक्रमासाठी निवड

संजीवनच्या पाच शिक्षकांची आयआयटी मधील कार्यक्रमासाठी निवड
आयएनएई व इन्फोसिस फौंडेशनच्या राष्ट्रीय उपक्रमात यशस्वी सहभाग
पन्हाळा : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
सोमवार पेठ, पन्हाळा येथील संजीवन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स मधील पाच प्राध्यापकांनी देशातील विविध भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) येथे आयोजित भारतीय राष्ट्रीय अभियांत्रिकी अकादमी (आयएनएई) आणि इन्फोसिस फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेला प्रतिष्ठेचा अभियांत्रिकी शिक्षण उत्कृष्टता कार्यक्रमामध्ये (सीईईई) यशस्वीरीत्या सहभाग नोंदवून संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेत मानाचा तुरा रोवला आहे.
या राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमासाठी मेकॅनिकल विभागातील डॉ. राहुल उरूणकर व प्रा. विकास थोरात यांची आयआयटी गुवाहाटी, इलेक्ट्रिकल विभागातील प्रा. अविनाश भंडारे व प्रा. प्रवीण पवार यांची आयआयटी कानपूर, तर कॉम्पुटर विभागातील प्रा. समिंदर विभूते यांची आयआयटी इंदोर येथे निवड झाली होती. सीईईई हा देशातील अभियांत्रिकी शिक्षणात गुणवत्ता, नवोपक्रम आणि अध्यापनातील उत्कृष्टता विकसित करण्यासाठी राबविण्यात येणारा एक प्रतिष्ठित राष्ट्रीय उपक्रम आहे.
या कार्यक्रमात आधुनिक अध्यापन पद्धती, कौशल्ये आधारित शिक्षण, संशोधनाभिमुख अध्यापन, अभ्यासक्रम रचना, नवोपक्रम, उद्योग व शैक्षणिक सहकार्य, कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल शिक्षण साधने तसेच विद्यार्थीकेंद्रित अध्यापन या विषयांवर आयआयटी मधील तज्ज्ञ प्राध्यापकांकडून मार्गदर्शन करण्यात आले. या प्रशिक्षणामुळे सहभागी प्राध्यापकांना जागतिक दर्जाच्या अध्यापन पद्धती, संशोधनातील सर्वोत्तम पद्धती आणि उद्योगाभिमुख शिक्षणाचा अनुभव मिळाला असून त्याचा थेट लाभ संस्थेतील विद्यार्थ्यांना होणार आहे.
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० आणि कौशल्ये आधारित शिक्षणाच्या अनुषंगाने अभ्यासक्रम अधिक प्रभावी करण्यासाठीही हे प्रशिक्षण उपयुक्त ठरणार असून आयआयटी मधील प्राध्यापकांचे यासाठी वर्षभर मार्गदर्शन लाभणार आहे. या सर्व पाच प्राध्यापकांचे संस्थेचे चेअरमन डॉ. पी. आर. भोसले, सहसचिव एन. आर. भोसले, कार्यकारी संचालक डॉ. अतुल आयरे, प्राचार्य डॉ. संजीव जैन, शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. एकनाथ साळोखे, रजिस्ट्रार दीपक पाटील, सर्व विभागप्रमुख आणि शिक्षक यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.




