अमेरिकेत जन्मजात नागरिकत्वावर नवे नियंत्रण, राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दोन महत्त्वाच्या कार्यकारी आदेशांवर स्वाक्षरी

आंतरराष्ट्रीय:एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

अमेरिकेत जन्मजात नागरिकत्वावर नवे नियंत्रण, राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दोन महत्त्वाच्या कार्यकारी आदेशांवर स्वाक्षरी
वॉशिंग्टन डी.सी. वृत्तसेवा :
येथील घडामोडीनुसार, अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी जन्मजात नागरिकत्वावर निर्बंध आणण्यासाठी आणि जन्म पर्यटनाला आळा घालण्यासाठी दोन नव्या कार्यकारी आदेशांवर स्वाक्षरी केली आहे. काही आठवड्यांपूर्वी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या आधीच्या आदेशाला फेटाळून लावल्यानंतर, प्रशासनाने अधिक कडक पावले उचलत हे नवे निर्णय जाहीर केले आहेत. व्हाईट हाऊसच्या ओव्हल ऑफिसमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ट्रम्प यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या त्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आणि प्रशासनाकडून आता त्यानुसार आवश्यक ते बदल व कायदेशीर पर्याय तपासून पावले उचलली जात असल्याचे स्पष्ट केले आहे.
या नव्या घोषणे अंतर्गत पहिल्या आदेशामध्ये जन्मजात नागरिकत्वासाठी पात्र नसलेल्या व्यक्तींच्या श्रेणींचा अधिक विस्तार करण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने ज्या व्यक्ती व्यावसायिक व्यवहारांद्वारे किंवा विशिष्ट करारांमार्फत अमेरिकेत येऊन आपल्या अपत्याला जन्म देतात, अशा मातांच्या मुलांचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय परदेशी दहशतवादी संघटनांच्या सदस्यांची मुले, परदेशी सरकारांचे प्रतिनिधी आणि ज्या अमेरिकन भूभागांवर फेडरल कायद्यानुसार जन्मजात नागरिकत्व लागू होत नाही तेथील काही घटकांना यातून वगळण्यात आले आहे. दुसऱ्या कार्यकारी आदेशाद्वारे जन्म पर्यटनावर संपूर्ण बंदी घालण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत. अनेक परदेशी नागरिक केवळ मूल अमेरिकेत जन्माला यावे आणि त्या द्वारे अपत्याला सहज नागरिकत्व मिळावे यासाठी पर्यटनाच्या नावाखाली अमेरिकेत जातात, ज्याला आळा घालणे हा यामागचा मुख्य उद्देश असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. या आदेशांतर्गत परराष्ट्र विभाग आणि गृह सुरक्षा विभागाला विशेष अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.



