पुणे विभाग पदवीधर व शिक्षक निवडणूक : मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; भवितव्य मतपेटीत बंद, २७ ऑक्टोबरला फैसला

पुणे विभाग पदवीधर व शिक्षक निवडणूक : मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ; भवितव्य मतपेटीत बंद, २७ ऑक्टोबरला फैसला
कोल्हापूर : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
पुणे विभागातील पदवीधर आणि शिक्षक विधानपरिषद निवडणुकीसाठी शुक्रवारी चुरशीच्या वातावरणात मतदान पार पडले असून, लोकशाहीच्या या महत्त्वाच्या प्रक्रियेत मतदारांनी आपला कौल नोंदवला आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि पुणे या पाच जिल्ह्यांमध्ये सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांची लगबग पाहायला मिळाली. प्रशासनाने जाहीर केलेल्या अंतिम आकडेवारीनुसार, शिक्षक मतदारसंघासाठी तब्बल ८८.६२ टक्के मतदान झाले, तर पदवीधर मतदारसंघासाठी ६३.८३ टक्के मतदारांनी हक्क बजावला. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडल्यानंतर आता सर्व प्रमुख राजकीय पक्ष आणि अपक्ष उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.
विभागातील एकूण १ हजार ५१ केंद्रांवर ही प्रक्रिया राबवण्यात आली. दोन्ही मतदारसंघांत मिळून एकूण ४ लाख ४९ हजार ९५९ नोंदणीकृत मतदार होते, ज्यामध्ये पदवीधर मतदारांची संख्या ३ लाख ८८ हजार १९ आणि शिक्षक मतदारांची संख्या ६१ हजार ९४० इतकी होती. पदवीधरमधून ४७ आणि शिक्षकमधून ३० उमेदवार आपले नशीब आजमावत असल्याने प्रत्येक मतासाठी शेवटच्या क्षणापर्यंत चुरस दिसून आली. कोल्हापूर जिल्ह्यातील केंद्रांवर सकाळपासूनच शिक्षक आणि पदवीधरांच्या रांगा लागल्या होत्या. मेन राजाराम हायस्कूल, महाराष्ट्र हायस्कूल, एस. एम. लोहिया हायस्कूल यांसारख्या प्रमुख केंद्रांवर दिवसभर मोठी गर्दी पाहायला मिळाली.
मतदानाच्या सुरुवातीच्या टप्प्यात शिक्षकांनी मतदानात बाजी मारली होती. सकाळी दहाच्या सुमारास शिक्षक मतदारसंघात १२.९४ टक्के मतदान नोंदवले गेले होते, तर पदवीधरमध्ये ही टक्केवारी ८.८६ टक्के होती. दुपारनंतर पदवीधरांचा मतदानाचा जोर वाढला आणि सायंकाळी चार वाजेपर्यंत दोन्ही मतदारसंघांत समाधानकारक मतदानाची नोंद झाली. प्रशासनाने मतदारांसाठी केंद्रांवर आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे संपूर्ण प्रक्रिया अत्यंत सुरळीत पार पडली.
शिक्षकांचे सेवाशर्ती प्रश्न, जुनी पेन्शन, वेतनातील त्रुटी आणि पदवीधरांचे रोजगारविषयक मुद्दे या निवडणुकीत कळीचे ठरले होते. महायुती, महाविकास आघाडी आणि रिंगणातील मातब्बर अपक्ष उमेदवारांनी केलेली मोर्चेबांधणी प्रत्यक्ष मतपेटीत कितपत उतरली आहे, याचा अंदाज आता राजकीय विश्लेषक बांधू लागले आहेत. मतदारांनी विद्यमान नेतृत्वावर विश्वास कायम ठेवला की नव्या पर्यायाला संधी दिली, हे आता मंगळवारी, २७ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे.




