शाही मिरवणुकीतून कोल्हापूरच्या लोकसंस्कृतीचे दर्शन; ऐतिहासिक दसरा चौकात शाही दसरा उत्सव उत्साहात
सोने लुटण्यासाठी करवीरवासीयांची अभूतपूर्व गर्दी; “सोनं घ्या… सोन्यासारखं रहा” म्हणत दिल्या दसऱ्याच्या शुभेच्छा

शाही मिरवणुकीतून कोल्हापूरच्या लोकसंस्कृतीचे दर्शन; ऐतिहासिक दसरा चौकात शाही दसरा उत्सव उत्साहात
सोने लुटण्यासाठी करवीरवासीयांची अभूतपूर्व गर्दी; “सोनं घ्या… सोन्यासारखं रहा” म्हणत दिल्या दसऱ्याच्या शुभेच्छा
कोल्हापूर : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
विजयादशमीच्या पावित्र मुहूर्तावर कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा चौकात आज मावळत्या सूर्याच्या साक्षीने पारंपरिक शाही दसरा उत्सव अत्यंत मोठ्या उत्साहात आणि राजेशाही थाटात संपन्न झाला. कर्नाटक राज्यातील म्हैसूर येथील दसऱ्यानंतर देशातील सर्वात मोठा आणि प्रदीर्घ ऐतिहासिक परंपरा लाभलेला हा दसरा उत्सव करवीरवासीयांसाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाचा व आनंदाचा सुवर्णक्षण ठरला. सोने लुटण्याच्या मुख्य कार्यक्रमासाठी दसरा चौकात हजारोंच्या संख्येने उपस्थित राहिलेल्या भाविकांनी अभूतपूर्व उत्साह दाखवला. “सोनं घ्या… सोन्यासारखं रहा” अशा मंगलमय शुभेच्छांसह आपट्याची पाने एकमेकांना देत हा लोकोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
राजेशाही थाट आणि सांस्कृतिक परंपरेचा सुरेख संगम
कोल्हापूरच्या या ऐतिहासिक शाही दसरा उत्सवाला प्रमुख राज्य उत्सवाचा दर्जा प्राप्त झाला असून, गेल्या नऊ-दहा दिवसांपासून जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम कोल्हापूर शहरात अतिशय उत्साही वातावरणात आयोजित करण्यात आले होते. विजयादशमीच्या निमित्ताने दसरा चौकात शमी पूजनाचा मुख्य विधी पारंपरिक पद्धतीने आणि पूर्ण राजेशाही लवाजम्यात पार पडला.
करवीर निवासिनी श्री अंबाबाई आणि श्री तुळजाभवानी देवीच्या पारंपरिक पालख्यांसह भालदार, चोपदार, घोडेस्वार आणि ऐतिहासिक शाही लवाजम्यासह निघालेली मिरवणूक म्हणजे कोल्हापूरच्या लोकसंस्कृतीचे विहंगम दर्शन ठरली. या मंगल मिरवणुकीदरम्यान मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी उभ्या असलेल्या हजारो नागरिकांनी पुष्पवृष्टी करत भक्तिभावाने आपला सहभाग नोंदविला.
भवानी मंडप ते दसरा चौक मार्गावर लोकसंस्कृतीचा जागर
भवानी मंडप ते दसरा चौक या मार्गावर निघालेल्या राजेशाही मिरवणुकीत देवीच्या पालख्यांसह कोल्हापूरच्या अस्सल लोकसंस्कृतीचे दर्शन घडले. या भव्य मिरवणुकीने करवीरवासीयांचे लक्ष वेधून घेत मने जिंकली. दसरा उत्सवाच्या या शाही सोहळ्याने कोल्हापूरच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक समृद्ध वारशाची पुन्हा एकदा साक्ष दिली.
मावळ्यांच्या पारंपरिक वेशभूषेतील घोडेस्वार, एकाच लयीत निनादणारे धनगरी ढोल, महिलांचे उत्साही लेझीम पथक, रणमर्द मावळ्यांचे प्रात्यक्षिक पथक, इतिहासाच्या स्मृती जागवणारे वीररसयुक्त पोवाडे आणि पारंपरिक पद्धतीने मार्गस्थ झालेल्या देवीच्या पालख्या अशा शाही थाटात निघालेल्या मिरवणुकीने उपस्थितांचे डोळे दिपवून टाकले. यावेळी संपूर्ण मार्गावर शिस्त राखण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा एनसीसी आणि स्काऊट गाईडच्या विद्यार्थिनी उभ्या होत्या. मिरवणुकीचे आणि सोहळ्याचे संपूर्ण नियोजन जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने अत्यंत चोख व काटेकोरपणे करण्यात आले होते.
राजघराण्याची उपस्थिती आणि शाही मानवंदना

सायंकाळी सहाच्या सुमारास न्यू पॅलेस येथून राजघराण्याच्या वाहनांच्या ताफ्यासह मेबॅक मोटारीतून खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, माजी खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती, माजी आमदार युवराज मालोजीराजे छत्रपती, शहाजीराजे आणि यशराजे यांचे ऐतिहासिक दसरा चौकात आगमन झाले. चौकात उपस्थित असलेल्या हजारो करवीरवासीयांनी टाळ्यांच्या कडकडाटात आणि जयघोषात त्यांचे स्वागत केले.
यावेळी भालदारांनी पारंपरिक ललकारी देत शाही सलामी दिली, तर पोलीस बँडच्या पथकाने संस्थानकालीन आदराचे मानगीत वाजवून मानवंदना सादर केली. त्यानंतर उपस्थित सरदार, जहागीरदार आणि मानकऱ्यांचे पारंपरिक मुजरे स्वीकारत खासदार शाहू महाराजांसह राजघराण्यातील सदस्य मंचावर स्थानापन्न झाले.
शमी पूजन, तोफांची सलामी आणि सोने लुटण्याचा अपूर्व उत्साह

दसरा महोत्सव समितीच्या वतीने राजघराण्यातील सर्व सदस्यांचे यथोचित स्वागत झाल्यानंतर राजपुरोहितांच्या पौरोहित्याखाली शमी पूजनाचा पारंपरिक विधी संपन्न झाला. यानंतर बंदुकीच्या फैरी झाडून आणि तोफांची सलामी देऊन अंबाबाई देवीला व सीमोल्लंघन सोहळ्याला मानवंदना देण्यात आली.
सलामी पूर्ण होताच सोने लुटण्याचा मुख्य कार्यक्रम सुरू झाला, जो या संपूर्ण सोहळ्याचा कळसाध्याय ठरला. शमी पूजन होताच आपट्याची पाने लुटण्यासाठी करवीरवासीयांची अक्षरशः झुंबड उडाली. लुटलेले पवित्र सोने घेऊन राजघराण्यातील सदस्यांना देण्यासाठी नागरिकांनी व्यासपीठाभोवती मोठी गर्दी केली. एकमेकांना आपट्याची पाने देत, “सोनं घ्या… सोन्यासारखं रहा” या आपुलकीच्या शब्दांत शुभेच्छांची देवाणघेवाण करत हा उत्सव नितांत श्रद्धेने व जल्लोषात साजरा झाला.
विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती
या दिमाखदार शाही सोहळ्याला खासदार धनंजय महाडीक, आमदार सतेज पाटील, महापौर रूपाराणी निकम, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, पोलीस अधीक्षक निलोत्पल, अपर जिल्हाधिकारी अजय पवार, प्र-कुलगुरू प्रा. डॉ. ज्योती जाधव, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सरिता थोरात यांच्यासह कला, क्रीडा, उद्योग, नाट्य, शिक्षण आणि प्रशासन क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. याशिवाय छत्रपती घराण्याशी संबंधित सरदार, इनामदार घराण्यातील प्रमुख मानकरी, सामाजिक कार्यकर्ते आणि वरिष्ठ शासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



