आपला जिल्हाताज्या घडामोडी

अंबाबाई मंदिरात अष्टमातृकांमधील ‘वैष्णवी’ रूपात महालक्ष्मीची नयनरम्य पूजा; सप्तमीला भाविकांची अलोट गर्दी

अंबाबाई मंदिरात अष्टमातृकांमधील ‘वैष्णवी ’ रूपात महालक्ष्मीची नयनरम्य पूजा ; सप्तमीला भाविकांची अलोट गर्दी

​कोल्हापूर :एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

शारदीय नवरात्र महोत्सवाच्या सप्तमी तिथीनिमित्त करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात धार्मिक आणि चैतन्यमय वातावरणात देवीची अष्टमातृकांमधील ‘वैष्णवी’ रूपात मनमोहक पूजा साकारण्यात आली. आज सकाळपासूनच राज्यासह परराज्यातून आलेल्या लाखो भाविकांनी या विलोभनीय रूपाचे डोळे भरून दर्शन घेण्यासाठी महाद्वारासमोर आणि दर्शन मंडपात अथांग गर्दी केली होती. ‘आई राजा उदो उदो’च्या अखंड जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर आणि महाद्वार रस्ता भक्तिरसात न्हाऊन निघाला.  

​जगदंबेच्या विविध रूपांमध्ये अष्टमातृकांचे स्थान अनन्यसाधारण मानले जाते. दुर्गा सप्तशतीमधील कथेनुसार दुर्धर रक्तबीज दैत्याच्या संहारासाठी, तर शिवपुराणातील उल्लेखानुसार अंधकासुराच्या निर्दालनासाठी विश्वातील सर्व प्रमुख देवताना आपल्यातील अंश द्यावे लागले. त्यावेळी देवांच्या तेज आणि शक्तीमधून मूर्तिमंत स्त्री आकृती धारण करून अष्टमातृका प्रगट झाल्या. यामध्ये भगवान शिवाची माहेश्वरी, कार्तिकेयाची कौमारी, देवराज इंद्राची इंद्राणी, ब्रह्मदेवांची ब्राह्मी, भगवान नृसिंहाची नारसिंही आणि वराहाची वाराही यांच्यासह भगवान विष्णूंची मूर्तिमंत चैतन्यशक्ती म्हणजेच ‘वैष्णवी’ अवतरली.

​देवीच्या या वैष्णवी रूपाला गरुडासन आणि चतुर्भुज आयुधांचे देखणे अधिष्ठान लाभले आहे. तिच्या हातातील शंख हा विश्वाचा मूळ नाद असलेल्या नादब्रह्माचे प्रतिनिधित्व करतो, तर सुदर्शन चक्र तिच्या असीम गतिमानतेची अनुभूती देते. हातातील गदा ही देवीच्या क्रियाशक्तीचे आणि दुष्टप्रवृत्तींच्या नाशाचे द्योतक आहे, तर हातातील कोमल पद्म हे विश्वाचे भरण-पोषण करणाऱ्या पालनतत्वाचे प्रतीक मानले जाते. या पूजेमध्ये वैष्णवीने परिधान केलेला तेजस्वी पिवळा पितांबर केवळ मांगल्याचे दर्शन घडवत नाही, तर विश्वाच्या नवनिर्मितीसह त्याच्या अखंड पालनाची दिव्य क्षमताही अधोरेखित करतो.

​पारंपरिक पुजारी बांधवांच्या हस्ते वेदोक्त मंत्रोच्चार, कापूरारती आणि सुगंधी फुलांच्या आकर्षक आरासात ही पूजा बांधण्यात आली. देवीच्या मुखमंडळावरील शांत, तरीही दैवी तेज भाविकांना मंत्रमुग्ध करत होते. दर्शनासाठी रांगेत तासन् तास थांबलेल्या भाविकांना तृप्तीची अनुभूती देणाऱ्या या पूजेने नवरात्रोत्सवातील भक्तिभावाची उंची अधिकच वाढवली. सायंकाळी पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि तोफेच्या सलामीने देवीची पालखी नगरप्रदक्षिणेसाठी मार्गस्थ झाली, त्यावेळी अबालवृद्धांनी अंबाबाई चरणी लीन होऊन साकडे घातले.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??