दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा : सीजेपीचे अभिजीत दिपके यांना सशर्त जामीन मंजूर
वर्षभर शांतता राखण्याच्या हमीपत्रावर मुक्तता

दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा : सीजेपीचे अभिजीत दिपके यांना सशर्त जामीन मंजूर
वर्षभर शांतता राखण्याच्या हमीपत्रावर मुक्तता
नवी दिल्ली :एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
राजधानीतील कनॉट प्लेस येथे शुक्रवारी आयोजित ‘लहरा दो तिरंगा’ मोर्चाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून ताब्यात घेण्यात आलेले कॉकरोच जनता पार्टीचे (सीजेपी) संस्थापक अभिजीत दिपके यांची शनिवारी विशेष कार्यकारी दंडाधिकारी न्यायालयाने सशर्त जामिनावर सुटका केली. मंदिर मार्ग येथील दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या (बीएनएसएस) तरतुदींनुसार ५० हजार रुपयांचा वैयक्तिक रोखे आणि आगामी वर्षभरासाठी शांतता राखण्याचे हमीपत्र सादर केल्यानंतर त्यांना सोडण्यात आले.
कनॉट प्लेसमध्ये कलम १६३; पोलिसांची कारवाई
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विशेष सघन पुनरावृत्ती (एसआयआर) मोहिमेतील कथित अनियमितता आणि सहकाऱ्यांच्या अटकेच्या निषेधार्थ सीजेपीने शुक्रवारी कनॉट प्लेस येथील सेंट्रल पार्कमध्ये तिरंगा फडकविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, नवी दिल्ली पालिका परिषदेची (एनडीएमसी) पूर्वपरवानगी नसल्याचे आणि संपूर्ण परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेचे कलम १६३ (जुनी जमावबंदी कलम १४४) लागू असल्याचे सांगत दिल्ली पोलिसांच्या पथकाने शुक्रवारी दुपारी झंडेवालान येथील निवासस्थानी जाऊन दिपकेंना मोर्चा न काढण्याची नोटीस बजावली होती. नोटीस झुगारून पुढे जाण्याचा प्रयत्न केल्यानंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून त्यांना तातडीने ताब्यात घेण्यात आले. या कारवाईदरम्यान एनडीएमसीने सेंट्रल पार्क दोन दिवसांसाठी बंद ठेवले होते, तर संवेदनशील भागात सुमारे २८ हजार सुरक्षा जवान तैनात करण्यात आले होते.
मंडी हाऊसमधून नेहा बोरा यांनाही घेतले होते ताब्यात
दिपकेंना ताब्यात घेतल्यानंतरही कनॉट प्लेस आणि आजूबाजूच्या परिसरात निदर्शकांनी एकत्र येत तिरंगा फडकवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, मंडी हाऊस परिसरातून मोर्चाच्या दिशेने जाणाऱ्या ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनच्या (आयसा) अध्यक्षा नेहा बोरा यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले होते. प्राथमिक चौकशी व आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बोरा यांची सुटका करण्यात आली.
आठवडाभरातील दुसरी कारवाई
गेल्या सात दिवसांत अभिजीत दिपके यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेण्याची ही दुसरी वेळ ठरली. यापूर्वी १० ऑक्टोबर रोजी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत जंतर मंतरवर आंदोलन करण्यासाठी मुंबईहून विमानाने आलेल्या दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांना विमानतळावरच उतरताच रोखण्यात आले होते. त्यावेळी ११ ऑक्टोबरला दिल्ली कॅन्टोनमेंट दंडाधिकारी न्यायालयाने ५० हजारांच्या जातमुचलक्यावर आणि चांगल्या वर्तणुकीच्या अटीवर त्यांची सुटका केली होती. त्यानंतर जंतर मंतरवर आंदोलनास परवानगी नाकारली गेल्यामुळे त्यांनी कनॉट प्लेसमध्ये तिरंगा फडकवण्याची घोषणा केली होती.
मूलभूत अधिकारांवर गदा आणल्याचा दिपकेंचा आरोप
सुटकेनंतर सोशल मीडियावर आपली भूमिका मांडताना अभिजीत दिपके यांनी पोलीस कारवाईचा निषेध केला. महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारसरणीवर आधारित शांततापूर्ण आणि अहिंसक मार्गाने राष्ट्रध्वज फडकविण्याचा हक्क दडपला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. दुसरीकडे, रामलीला मैदान किंवा बुराडीसारख्या पर्यायी जागांवर रीतसर परवानगी घेऊन निदर्शने करण्यास मुभा असताना प्रतिबंधित मध्य दिल्ली भागात विनापरवाना जनसमुदाय गोळा करण्यास परवानगी दिली जाऊ शकत नाही, असे दिल्ली पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
कॉकरोच जनता पार्टीच्या या भूमिकेमुळे आणि मतदार याद्यांमधील कथित घोळावरून विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे राजधानीत राजकीय वातावरण तापले आहे.




