दोन शतकांपासून गावात राहतोय , तरी पुरावा मागताय व्हय ?” १०१ वर्षांच्या वडिलांसह ११ जणांची नावं मतदार यादीतून गायब ; ज्येष्ठ पत्रकार किशोर आबिटकर भडकले !

“दोन शतकांपासून गावात राहतोय , तरी पुरावा मागताय व्हय ?” १०१ वर्षांच्या वडिलांसह ११ जणांची नावं मतदार यादीतून गायब ; ज्येष्ठ पत्रकार किशोर आबिटकर भडकले !
गारगोटी:एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
देशात १९५२ ला पहिली लोकसभा निवडणूक झाली, त्या पहिल्या निवडणुकीपासून आजतागायत ज्या बापानं एकाच मतदान केंद्रावर जाऊन आपलं मत टाकलं, आज त्यांच्याच घरातल्या तब्बल ११ माणसांची नावं मतदार यादीतून गायब झालीत! २०० वर्षांपासून गावात राबणाऱ्या आणि चार पिढ्यांचा इतिहास असणाऱ्या कुटुंबावरच आज ‘आम्ही या गावचे मतदार आहोत असा पुरावा देण्याची वेळ या निवडणूक यंत्रणेने आणून ठेवली आहे. गारगोटीत घडलेल्या या प्रकारामुळे ज्येष्ठ पत्रकार किशोर आबिटकर यांनी निवडणूक शाखेच्या कारभारावर चांगलाच संताप व्यक्त केला असून, भुदरगड तालुक्यातल्या मतदार नोंदणीचा पुरता बोजवारा उडाल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.
आबिटकर कुटुंब गेल्या दोन शतकांपासून गारगोटीत पिढीजात राहतंय. किशोर आबिटकर स्वतः ६६ वर्षांचे असून १९८९ पासून ते सातत्याने याच गावात मतदानाचा हक्क बजावत आहेत. मात्र, निवडणूक विभागाच्या तथाकथित ‘विशेष सखोल पुनरीक्षणा’च्या (SIR) नादात त्यांच्याच कुटुंबातील ११ जणांची नावे यादीतून गायब झाली आहेत.
बापाचं वय १०१ वर्षे; तरीबी मतदानासाठी नावांची शोधाशोध!
किशोर आबिटकर यांचे वडील आज १०१ वर्षांचे आहेत. पहिल्या निवडणुकीपासून म्हणजे १९५२ पासून त्यांनी एकाच मतदान केंद्रावर जाऊन नियमित मतदान केले. एवढा मोठा इतिहास पाठीशी असताना आज म्हातारपणात त्यांच्याच कुटुंबातील माणसांची नावे मतदार यादीत दिसत नाहीत. “वर्षानुवर्षे गावात राहून इथं मतदान करणाऱ्या माणसांनाच जर यादीतून बाहेर काढणार असाल, तर मग तुम्ही नक्की कसली तपासणी केली?” असा रोकडा सवाल आता आबिटकर यांनी उपस्थित केला आहे.
३० वर्षे पहिलं मतदान करण्याचा विक्रम; जनजागृती करणाऱ्याच्याच घरावर गदा!
किशोर आबिटकर यांची व्यथा तर आणखी वेगळी आहे. ते सांगतात, “१९८० पासून मी गारगोटीत मतदान करतोय. गेल्या ३० वर्षांत प्रत्येक निवडणुकीला मतदान केंद्रावर जाऊन भल्यापहाटे ‘पहिलं मतदान’ करण्याचा माझा शिरस्ता राहिलाय. मतदान झाल्यावर बोटाची शाई दाखवून लोकांना मतदानासाठी घराबाहेर पडण्याचं आवाहन करणारी पोस्ट मी टाकत आलोय. सलग २५ वर्षे पहिलं मतदान केल्याची नोंदही सोशल मीडियावर गाजली होती. २३ एप्रिल २०१९ च्या निवडणुकीतही मी पत्नीसह पहिलं मतदान करून जनजागृती केली होती, केंद्रानं माझा सत्कारही केला होता. मात्र, लोकांना मतदानाचे महत्त्व सांगणाऱ्या माझ्यासारख्या पत्रकारावरच आज स्वतःच्या घरच्यांची नावं शोधण्याची वेळ प्रशासनाने आणली आहे.”
फॉर्म भरून दिले तरीबी नोटिसा ; भुदरगडात नागरिकांना मनस्ताप
हा घोळ फक्त आबिटकर कुटुंबापुरता मर्यादित नसून, गारगोटी शहर आणि भुदरगड तालुक्यातील शेकडो पात्र मतदारांना प्रशासनाने पुराव्यांसाठी नोटिसा धाडल्या आहेत. यावर बोलताना आबिटकर म्हणाले, “निवडणूक शाखेने सांगितले म्हणून आम्ही सगळ्यांचे फॉर्म रीतसर भरून दिले. तरीसुद्धा पुन्हा आम्हालाच नोटिसा पाठवून कागदपत्रे मागायला लागलेत. अधिकाऱ्यांशी बोललो तरी तोच प्रकार. फॉर्म भरून दिले, कागदपत्रे दिली, तरीबी नागरिकांना नोटिसांचा ससेमिरा कशासाठी लावलाय? लोकांची कामधंदे सोडून हेच करत बसायचं का?”
अधिकारी एसी केबिनमध्ये, सामान्य जनता मात्र कागदपत्रं घेऊन रांगेत!
निवडणूक विभागाच्या या कारभाराविरुद्ध तालुक्यात आता तीव्र संताप व्यक्त होत आहे. गावातल्या लोकांचं म्हणणं सरळ आहे— दुबार नावं काढायची असतील तर बीएलओंनी (BLO) प्रत्यक्ष घरोघरी जाऊन पंचनामे का केले नाहीत? पिढ्यानपिढ्या गावात राहणाऱ्या माणसांनाच ‘तुम्ही इथले रहिवासी आहात का’ असे विचारत नोटिसा पाठवायच्या आणि दुसरीकडे मात्र नवीन मतदार जोडताना ढिलाई दाखवायची, हा कसला कारभार? एका पत्रकाराच्या घरावर ही वेळ येत असेल तर ग्रामीण भागातील अशिक्षित किंवा सामान्य मतदारांची अवस्था काय होत असेल, याची कल्पनाच केलेली बरी.
दुबार किंवा बोगस नावे वगळण्याला कोणाचा विरोध असण्याचं कारण नाही, पण प्रशासकीय चुकांचा भुर्दंड सामान्य मतदारांना सहन करावा लागत आहे. किशोर आबिटकर यांनी याप्रकरणी वरिष्ठांकडे तक्रार केली असली, तरी स्थानिक निवडणूक यंत्रणा ही चूक सुधारून आबिटकर कुटुंबासह तालुक्यातील सर्व पात्र मतदारांची नावे कधी दुरुस्त करणार, याकडेच आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.




