ताज्या घडामोडीराजकीय

कथित ऑडिओ क्लिपवरून महायुतीत कलगीतुरा ; रामदास कदमांच्या आरोपांवर प्रवीण दरेकरांचा पलटवार

आरोप-प्रत्यारोपांमुळे महायुतीतील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर 

कथित ऑडिओ क्लिपवरून महायुतीत कलगीतुरा; रामदास कदमांच्या आरोपांवर प्रवीण दरेकरांचा पलटवार

आरोप-प्रत्यारोपांमुळे महायुतीतील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर 

मुंबई :एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी समोर आणलेल्या कथित ऑडिओ क्लिपवरून राज्यातील राजकारण तापले असून, या प्रकरणावरून सत्ताधारी महायुतीतील भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) या प्रमुख मित्रपक्षांमध्ये थेट जुंपली आहे. भाजपमधील काही नेते एकनाथ शिंदे यांना संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा घणाघाती आरोप शिवसेना नेते रामदास कदम यांनी केला होता. या आरोपांना भाजपचे विधान परिषदेतील गटनेते प्रवीण दरेकर यांनी आक्रमक शब्दांत प्रत्युत्तर दिले. सत्तेत एकत्र नांदताना मित्रपक्षावर असे निराधार आरोप करणे खपवून घेतले जाणार नाही, असा थेट इशारा देतानाच, आंदोलनादरम्यान देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करण्यासाठी जरांगे यांना पडद्याआडून कोण बळ पुरवत होते, यावर आम्ही बोलायचे का, असा रोखठोक सवाल उपस्थित करत दरेकर यांनी शिवसेनेला घरचा आहेर दिला.

​मनोज जरांगे पाटील यांनी दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे यांच्यावर ५०० कोटी रुपयांच्या देवाणघेवाणीचा गंभीर आरोप करत त्यानंतर पत्रकार परिषदेत एक ऑडिओ क्लिप सार्वजनिक केली होती. या क्लिपच्या आधारे रामदास कदम यांनी भाजपवर निशाणा साधला. भाजपमधीलच काही नेत्यांनी मराठा नेत्याला पुढे करून एकनाथ शिंदे यांच्याविरोधात षडयंत्र रचल्याचा दावा कदम यांनी केला होता. कदम यांच्या या विधानामुळे महायुतीत मिठाचा खडा पडल्याची चर्चा सुरू झाली.

​या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रवीण दरेकर यांनी कदम यांच्या दाव्यांचा खरपूस समाचार घेतला. एकनाथ शिंदे यांच्यावर करण्यात आलेले आरोप चुकीचे असून भाजप त्याचे समर्थन करत नाही, हे स्पष्ट करत दरेकर म्हणाले की, संबंधित ऑडिओ क्लिप खरी आहे की खोटी, यामागे नेमके कोण सूत्रधार आहेत, याची विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) सखोल चौकशी व्हावी. मात्र, स्वतःच्या बचावासाठी किंवा राजकीय सोयीसाठी भाजपला वेठीस धरणे योग्य नाही. एकत्र सत्तेत कारभार करताना अशा प्रकारची वक्तव्ये करणे आघाडी धर्माला धरून नाही, असेही त्यांनी ठणकावले.

​मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान झालेल्या घडामोडींवर बोट ठेवत दरेकर यांनी सूचक वक्तव्य केले. मराठा समाजाच्या हक्कांच्या मागण्यांना भाजपचा नेहमीच पाठिंबा होता आणि पुढेही राहील, असे सांगताना ते म्हणाले की, जेव्हा आंदोलनाच्या नावाखाली भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांना वैयक्तिक लक्ष्य करून बदनाम करण्याचा विडा उचलला गेला, तेव्हा भाजपने उघडपणे भूमिका घेतली. त्यावेळी आम्ही लपूनछपून काही केले नाही. उलट त्या काळात फडणवीस यांच्यावर टीका करण्यासाठी जरांगेंना पडद्यामागून कोण ताकद पुरवत होते, याचा शोध यथावकाश लागेलच. फडणवीस यांच्या अंगावर कोणाला सोडले गेले आणि त्यामागे कोण होते, हे देखील येणाऱ्या काळात समोर येईल, असा गर्भित इशारा देत दरेकर यांनी शिंदे गटावरच संशयाची सुई फिरवली.

​ऐन महत्त्वाच्या राजकीय घडामोडींच्या काळात ५०० कोटींच्या कथित व्यवहारावरून आणि ऑडिओ क्लिपवरून सत्ताधारी गोटातच सुरू झालेल्या या आरोप-प्रत्यारोपांमुळे महायुतीतील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली असून, या वादाचे पडसाद आगामी काळात अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

nynavabharatnews.online

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??