ऊस दराचा तिढा पेटला; भोसे फाटा इथे स्वाभिमानीने रात्रभर रोखल्या ७८ ऊस ट्रॉली मिरज ग्रामीण पोलिसांच्या मध्यस्थीने तणाव निवळला.

ऊस दराचा तिढा पेटला; भोसे फाटा इथे स्वाभिमानीने रात्रभर रोखल्या ७८ ऊस ट्रॉली मिरज ग्रामीण पोलिसांच्या मध्यस्थीने तणाव निवळला.
भोसे (विशेष प्रतिनिधी) : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
चालू गळीत हंगामासाठी उसाला पहिली उचल प्रतिटन पाच हजार रुपये मिळावी या मागणीवरून पश्चिम महाराष्ट्रातील ऊसदर आंदोलन अधिक चिघळले आहे. दर निश्चितीचा कोणताही अधिकृत निर्णय जाहीर झालेला नसताना साखर कारखान्यांनी परस्पर तोडणी व वाहतूक सुरू केल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली. मिरज-सोलापूर महामार्गावरील शिरढोण परिसरातील भोसे फाटा येथे सांगली भागातील कारखान्यांकडे निघालेल्या तब्बल ७८ ऊस ट्रॉली कार्यकर्त्यांनी अडवून धरल्या. जोपर्यंत दराचा निकाल लागत नाही, तोपर्यंत एकही वाहन पुढे जाऊ देणार नाही असा पवित्रा घेत आंदोलकांनी रात्रभर महामार्गावरच ठिय्या मांडला.
आंदोलनाची बातमी समजताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख नेते माजी खासदार राजू शेट्टी यांचे पुत्र सौरभ शेट्टी यांनी सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी धडक दिली. दर जाहीर न करता शेतकऱ्यांच्या उसाची परस्पर उचल करणाऱ्या साखर कारखान्यांच्या व्यवस्थापनाला त्यांनी थेट जाब विचारला. शेतकऱ्यांच्या घामाचे मोल निश्चित न करता सुरू असणारी ही वाहतूक अन्यायकारक असून, केवळ तोंडी आश्वासनांवर आंदोलन मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका सौरभ शेट्टी यांनी मांडली.
वाहने अडवल्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आंदोलक, ऊस वाहतूकदार आणि संबंधित कारखाना प्रशासन यांच्यात समन्वयाची भूमिका घेतली. प्रशासनाने आंदोलकांशी चर्चा करून लेखी स्वरूपात भूमिका मांडावी, अशी मागणी शेतकरी नेत्यांनी लावून धरली.
अखेर कार्यकर्त्यांच्या आक्रमक पवित्र्यापुढे झुकत कारखाना प्रशासनाने लेखी हमीपत्र दिले. दर निश्चित होईपर्यंत जर ही वाहने पुन्हा ऊस वाहतूक करताना आढळली, तर त्यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही आर्थिक अथवा अन्य नुकसानीची संपूर्ण जबाबदारी संबंधित वाहन मालक आणि व्यवस्थापनाची राहील, असे स्पष्ट नमूद करण्यात आले. या लेखी आश्वासनानंतर आणि पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर पहाटेच्या सुमारास आंदोलन मागे घेण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी अडवून ठेवलेली वाहने पुढील प्रवासासाठी सुरक्षितपणे मार्गस्थ केली.
पश्चिम महाराष्ट्राच्या साखर पट्ट्यात पहिल्या उचलीच्या मागणीवरून शेतकरी संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. शिरढोण येथील या कारवाईने साखर कारखानदार आणि वाहतूकदारांचे धाबे दणाणले असून, प्रशासनाने तातडीने बैठक घेऊन दराचा निर्णय न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.




