भोसे फाटा येथे ऊस वाहतूक रोखण्यावरून स्वाभिमानी आक्रमक; पोलीस छावणीचे स्वरूप
शंभरहून अधिक ट्रॅक्टर पोलिसांच्या गराड्यात कारखान्याकडे रवाना; प्रशासनाशी जोरदार खडाजंगी

भोसे फाटा येथे ऊस वाहतूक रोखण्यावरून स्वाभिमानी आक्रमक; पोलीस छावणीचे स्वरूप
शंभरहून अधिक ट्रॅक्टर पोलिसांच्या गराड्यात कारखान्याकडे रवाना; प्रशासनाशी जोरदार खडाजंगी
भोसे | विशेष प्रतिनिधी : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
चालू गळीत हंगामातील ऊसदराचा तोडगा अद्याप गुलदस्त्यात असतानाच सांगली जिल्ह्यात शेतकरी संघटना आणि प्रशासनातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने भोसे फाटा येथे अडवलेली ऊस वाहतुकीची वाहने बाहेर काढण्यावरून आज दिवसभर प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक एम. डी. जाधव कॉलेजच्या मैदानावर रोखून धरलेले सुमारे शंभरहून अधिक ट्रॅक्टर आज सकाळी अकराच्या सुमारास पोलिसांनी प्रचंड बंदोबस्तात सांगली साखर कारखान्याकडे रवाना केले. या कारवाईदरम्यान स्वाभिमानीचे नेते सौरभ शेट्टी आणि पोलीस प्रशासनात जोरदार खडाजंगी उडाली, तर संपूर्ण परिसराला छावणीचे स्वरूप आले होते.
ऊसदराची अधिकृत घोषणा झाल्याशिवाय साखर कारखान्यांचे धुराडे पेटू देणार नाही, असा इशारा शेतकरी संघटनांनी आधीच दिला आहे. असे असतानाही कारखान्यांकडून ऊस तोड आणि वाहतूक सुरू करण्यात आल्याने स्वाभिमानीचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. आंदोलकांनी भोसे फाटा परिसरात ऊस भरलेली शेकडो वाहने अडवून धरली होती. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनाने ही सर्व वाहने तात्पुरती एम. डी. जाधव महाविद्यालयाच्या प्रांगणात लावली होती.
आज सकाळी अकराच्या सुमारास पोलीस आणि कारखाना प्रशासनाने ही वाहने बाहेर काढण्याची मोहीम हाती घेतली. या हालचालीची कुणकुण लागताच परिसरातील शेतकरी आणि स्वाभिमानीचे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सुरुवातीला काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन वाहनात बसवण्याचा प्रयत्न केला. ही माहिती मिळताच सौरभ शेट्टी यांनी तातडीने धाव घेत पोलिसांच्या गाडीतील आंदोलक शेतकऱ्यांना बाहेर काढले. यामुळे पोलीस आणि आंदोलकांमध्ये थेट संघर्ष उभा राहिला.
मिरज ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अमितकुमार पाटील आणि सौरभ शेट्टी यांच्यात यावेळी अत्यंत तिखट शब्दांत बाचाबाची झाली. शेतकऱ्यांच्या घामाचे मोल ठरेपर्यंत एकही चाक फिरू देणार नाही, अशी भूमिका शेट्टी यांनी घेतली. मात्र, पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात करत आंदोलकांना रोखून धरले आणि शंभरहून अधिक ट्रॅक्टरच्या पुढे-मागे पोलिसांच्या गाड्या लावून कडेकोट बंदोबस्तात सांगली कारखान्याकडे मार्गस्थ केले.
या कारवाईमुळे भोसे फाटा आणि महाविद्यालय परिसरात सकाळपासूनच तणावपूर्ण शांतता पसरली होती. शेतकऱ्यांचा विरोध मोडून काढत प्रशासनाने वाहने हलवली असली, तरी तोडगा निघेपर्यंत लढा अधिक तीव्र करण्याचा पवित्रा स्वाभिमानीने घेतला आहे. या घडामोडींमुळे सांगली जिल्ह्यातील ऊस आंदोलन आता आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.




