आपला जिल्हाताज्या घडामोडी
करवीर निवासिनी श्री अंबाबाईची महासरस्वती कौशिकी रूपात मनोहारी पूजा ; दर्शनासाठी भाविकांची गर्दी

करवीर निवासिनी श्री अंबाबाईची महासरस्वती कौशिकी रूपात मनोहारी पूजा ; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
कोल्हापूर : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात आज बुधवारी देवीची महासरस्वती कौशिकी तथा कात्यायनी रूपात नयनरम्य आणि वैशिष्ट्यपूर्ण अलंकार पूजा बांधण्यात आली. देवीचे हे अलौकिक व शांत स्वरूप डोळ्यांत साठवण्यासाठी सकाळपासूनच मंदिर परिसरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती. अंबाबाई चरणी लीन होत हजारो भाविकांनी दर्शन घेतले, तर घंटा आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात संपूर्ण मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
’देवीमाहात्म्य’ या ग्रंथातील उत्तरचरित्राची प्रमुख अधिष्ठात्री देवता म्हणून महासरस्वती कौशिकीचे स्थान अनन्यसाधारण मानले जाते. शुंभ आणि निशुंभ या दैत्यांनी तिन्ही लोकांत हाहाकार माजवला असताना त्यांचा संहार करण्यासाठी ही देवता प्रकट झाली, अशी पौराणिक आख्यायिका आहे. देवी पार्वतीच्या म्हणजेच साक्षात गौरीच्या शरीरातून कौशिकीचे प्राकट्य झाले. या धर्मयुद्धात देवीच्या साहाय्यासाठी ब्राह्मी, माहेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, चामुंडा, नारसिंही, ऐंद्री आणि शिवदूती या मातृका अवतरल्या होत्या. वैकृतिक रहस्यानुसार महासरस्वती कौशिकीची पूजा बांधताना तिच्या समवेत या मातृका, श्री गणपती आणि रुद्र यांचीही आराधना करण्याची पुरातन परंपरा आहे. याच धार्मिक आणि शास्त्रीय संकेतांना अनुसरून मंदिरातील पूजकांनी ही पारंपरिक पूजा साकारली.
आजच्या या पूजेमध्ये देवीच्या अष्टभुजा स्वरूपाचे दर्शन घडवण्यात आले. देवीच्या हातांमध्ये घंटा, त्रिशूळ, नांगर, शंख, मुसळ, चक्र, धनुष्य आणि बाण ही आयुधे पारंपरिक अलंकारांसह लीलया सजवण्यात आली होती. देवीची अंगकांती शरद ऋतूतील ढगांच्या आडून पडणाऱ्या चंद्राच्या शीतल, पांढऱ्याशुभ्र प्रकाशासारखी अत्यंत मनमोहक दिसत होती. चांदीच्या अलंकारांनी मढवलेली आणि विविधरंगी सुवासिक फुलांनी सजवलेली अंबाबाईची ही मूर्ती अत्यंत लोभसवाणी दिसत होती.
ही पूजा वेदांग मुनिश्वर, अजिंक्य मुनिश्वर, अभिषेक मुनिश्वर आणि रवी माईणकर यांनी पारंपरिक पद्धतीने बांधली. सकाळच्या महाभिषेकानंतर दुपारी या पूजेची मांडणी पूर्ण झाली. त्यानंतर मंदिराचे मुख्य दरवाजे उघडताच ‘अंबामाता की जय’ आणि ‘उदो गं अंबे उदो ‘च्या जयघोषाने मंदिर प्रांगण दुमदुमून गेले. करवीरनगरीतील भाविकांसह परजिल्ह्यांतून आलेल्या भाविकांनीही या पूजेचे मनोभावे दर्शन घेतले.





