शेतकऱ्यांना ५ हजारांची दिवाळी भेट; कर्जवसुलीला स्थगिती, आणखी ४० तालुक्यांचा दुष्काळ यादीत समावेश परीक्षा शुल्कही माफ ! अंगणवाडी सेविकांना दोन हजारांची भाऊबीज भेट

शेतकऱ्यांना ५ हजारांची दिवाळी भेट ; कर्जवसुलीला स्थगिती, आणखी ४० तालुक्यांचा दुष्काळ यादीत समावेश परीक्षा शुल्कही माफ ! अंगणवाडी सेविकांना दोन हजारांची भाऊबीज भेट
मुंबई : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाऊ नये यासाठी त्यांच्या बँक खात्यावर दिवाळीपूर्वी ५ हजार रुपयांची अग्रीम मदत थेट जमा करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. राज्य मंत्रिमंडळाच्या सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. या बैठकीत राज्यातील आणखी चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आल्याने आता दुष्काळी तालुक्यांची संख्या ३०५ वर पोहोचली आहे.
अंतिम मदतीची वाट न पाहता तातडीचा आधार
दुष्काळाची अंतिम मदत आणि केंद्रीय कार्यप्रणाली पूर्ण होण्यासाठी बराच कालावधी लागतो. ही प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष निधी मिळेपर्यंत साधारणपणे डिसेंबर महिना उजाडतो. मात्र, सणासुदीच्या काळात बळीराजाच्या हातात किमान आर्थिक तरतूद असावी, या हेतूने अपेक्षित अंतिम दुष्काळी अनुदानातून ही पाच हजार रुपयांची रक्कम अग्रीम स्वरूपात थेट बँक खात्यात वर्ग करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
चाळीस नवीन तालुक्यांचा समावेश, १२ सवलती लागू
शासनाने यापूर्वी २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला होता. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मागण्या आणि तक्रारींची दखल घेऊन ‘ट्रिगर १’ व ‘ट्रिगर २’ या निकषांचा फेरआढावा घेण्यात आला. त्यानंतर नव्याने ४० तालुक्यांचा समावेश करण्यात आला असून आता राज्यातील एकूण ३५८ पैकी ३०५ तालुके दुष्काळग्रस्त घोषित झाले आहेत. या सर्व तालुक्यांमध्ये दुष्काळ निवारणासाठी लागू असणाऱ्या १२ शासकीय सवलती तातडीने अंमलात आणल्या जातील. या भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क कोणतेही निकष न लावता सरसकट माफ करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
कर्जवसुली व वीजबिलासाठी तगादा लावल्यास कारवाई
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा आर्थिक जाच होऊ नये, यासाठी जिल्हा बँका, राष्ट्रीयीकृत बँका, विविध कार्यकारी सेवा सोसायट्या आणि खासगी मायक्रो फायनान्स कंपन्यांना कर्जवसुलीसाठी तगादा न लावण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. राज्यात साडेसात अश्वशक्तीपर्यंतची कृषी वीज मोफत असूनही काही ठिकाणी वीजबिलासाठी शेतकऱ्यांवर दबाव आणला जात असल्यास अशा अतिउत्साही यंत्रणांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. कर्जमाफीच्या प्रक्रियेत नव्याने साडेतीन लाख पात्र शेतकऱ्यांची यादी प्रमाणित करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
चारा हमीभावाने खरेदी; टँकरवर जीपीएसची देखरेख
जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी ज्या भागात पाणी उपलब्ध आहे, तेथे चारा पिकांची लागवड करण्यास प्राधान्य देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला चारा शासन स्वतः हमीभावाने खरेदी करेल, अशी ग्वाही बैठकीत देण्यात आली. मराठवाड्यासह राज्यातील टंचाईग्रस्त भागात भूजल पातळी तीन मीटरपेक्षा अधिक खाली गेल्याने तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे आवश्यक त्या ठिकाणी तातडीने टँकर सुरू करण्यात येत असून, पाणी वितरणात पारदर्शकता ठेवण्यासाठी टँकर्सना जीपीएस ट्रॅकिंग बंधनकारक केले आहे. पिण्याच्या पाण्याचे स्रोत अबाधित राखण्यासाठी अनधिकृत पाणी उपशाविरोधात कठोर पावले उचलत सुमारे १६ हजार बेकायदेशीर वीज जोडण्या तोडण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
अंगणवाडी सेविकांना दोन हजारांची भाऊबीज भेट
महिला व बालविकास विभागातर्फे राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत १ लाख ८ हजार ६२७ अंगणवाडी सेविका आणि ९५ हजार ४७० अंगणवाडी मदतनीस अशा एकूण २ लाख १४ हजार ९७ पदांसाठी दिवाळीपूर्वी प्रत्येकी २ हजार रुपयांची भाऊबीज भेट दिली जाणार आहे. यासाठी सुमारे ४२ कोटी ८१ लाख १४ हजार रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.




