इन्स्पायर ॲवॉर्ड’मध्ये झळकला राजवर्धन काळे ;मिरज तालुक्यातील बालवैज्ञानिकाची जपानसाठी निवड

इन्स्पायर ॲवॉर्ड’मध्ये झळकला राजवर्धन काळे ;मिरज तालुक्यातील बालवैज्ञानिकाची जपानसाठी निवड
जलवाहतूक सुरक्षेच्या प्रयोगाची’ राष्ट्रीय पातळीवर दखल
मिरज : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
तालुक्यातील भोसे गावचा सुपुत्र आणि सांगली सिटी हायस्कूलचा विद्यार्थी राजवर्धन प्रदीप काळे या बालवैज्ञानिकाची जपान येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय बालवैज्ञानिक प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागामार्फत नवी दिल्ली येथे आयोजित १२ व्या राष्ट्रीय ‘इन्स्पायर ॲवॉर्ड मानक’ स्पर्धेत त्याने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले होते. ग्रामीण भागातील या विद्यार्थ्याने थेट आंतरराष्ट्रीय पातळीवर झेप घेतल्याने सांगली जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातून त्याचे कौतुक होत आहे.
जलमार्गावरील वाहतूक अधिक सुरक्षित करण्यासाठी आणि नाव तसेच बोटींचे संभाव्य अपघात रोखण्यासाठी राजवर्धनने एक अभिनव वैज्ञानिक संकल्पना विकसित केली आहे. जलप्रवासादरम्यान प्रतिकूल हवामान किंवा तांत्रिक बिघाडामुळे उद्भवणाऱ्या धोक्यांपासून बोटींचे रक्षण कसे करता येईल, याचे प्रभावी प्रारूप त्याने दिल्लीतील राष्ट्रीय प्रदर्शनात मांडले होते. आधुनिक तंत्रज्ञानाचा कल्पक वापर करून तयार केलेल्या या प्रतिकृतीने देशभरातील शास्त्रज्ञ आणि परीक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतले.
नवी दिल्ली येथे पार पडलेल्या या राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात देशभरातून सुमारे आठशे बालवैज्ञानिकांनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये बहुतांश विद्यार्थी माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील होते. मात्र, मूळचा लक्ष्मीवाडी (ता. मिरज) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा विद्यार्थी असलेला राजवर्धन हा या संपूर्ण राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणारा देशातील प्राथमिक शाळेचा एकमेव विद्यार्थी ठरला होता. प्राथमिक स्तरापासूनच विज्ञानाची आवड जोपासणाऱ्या राजवर्धनने यापूर्वी तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनांत सातत्याने यश मिळवत आपली गुणवत्ता सिद्ध केली होती.
राष्ट्रीय प्रदर्शनातील उत्कृष्ट प्रकल्पांमधून जपान येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक देवाणघेवाण कार्यक्रमासाठी देशभरातील केवळ ६० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. यात राजवर्धनने आपले स्थान पटकावून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळवला आहे.
राजवर्धनच्या या यशामागे त्याचे वडील तथा प्राथमिक शिक्षक प्रदीप काळे यांचे प्रोत्साहन लाभले. तसेच लक्ष्मीवाडी शाळेचे शिक्षक सुनील गावडे, सांगली सिटी हायस्कूलचे मुख्याध्यापक रंगराव पाटील आणि शिक्षकवृंदाचे मार्गदर्शन त्याला मिळाले. ग्रामीण भागातून पुढे येत थेट जपानच्या आंतरराष्ट्रीय मंचापर्यंत मजल मारल्याबद्दल शिक्षण, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून राजवर्धनवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.




