आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांकडून अग्रण धुळगावचा गौरव; राष्ट्रीय परिषदेत सरपंच शिवदास भोसले यांचा विशेष सन्मान​ 

हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांकडून अग्रण धुळगावचा गौरव; राष्ट्रीय परिषदेत सरपंच शिवदास भोसले यांचा विशेष सन्मान​ 

अग्रण धुळगाव / सांगली [अमोल सुतार : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क ]

अभ्यासाचा भोंगा’ ते ५० लाखांचे ‘माझी वसुंधरा’ पारितोषिक ; महाराष्ट्रातून केवळ दोन सरपंचांना बहुमान ; गावाने निर्माण केले ‘शैक्षणिक पर्यटनाचे आदर्श मॉडेल

सांगली जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यात मोडणाऱ्या अग्रण धुळगावच्या ग्रामविकास आणि शैक्षणिक क्रांतीचा डंका आता थेट राष्ट्रीय स्तरावर वाजला आहे. हरियाणा सरकारच्या वतीने आयोजित राष्ट्रीय स्तरावरील ग्रामपंचायत व नगरपालिका सक्षमीकरण परिषदेत हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांच्या हस्ते अग्रण धुळगावचे लोकनियुक्त सरपंच शिवदास चंद्रकांत भोसले यांचा विशेष सन्मान करण्यात आला. संपूर्ण महाराष्ट्रातून या राष्ट्रीय बहुमानासाठी केवळ दोनच सरपंचांची निवड झाली असून, त्यात सांगली जिल्ह्याचे नाव उंचावत अग्रण धुळगावने मानाचे स्थान पटकावले आहे.

घड्याळात सायंकाळचे सात वाजतात, गावात एक भोंगा वाजतो आणि क्षणार्धात घरोघरचे टीव्ही संच, स्मार्टफोन्स बंद होऊन संपूर्ण गाव अभ्यासाच्या शांततेत लीन होते. सांगली जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यात मोडणाऱ्या कवठेमहांकाळ तालुक्यातील अग्रण धुळगावने राबविलेल्या या आदर्शवत ‘डिजिटल डिटॉक्स’ आणि सर्वांगीण विकासक्रांतीची दखल आता थेट राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. हरियाणा सरकारतर्फे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील ग्रामपंचायत व नगरपालिका सक्षमीकरण परिषदेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून केवळ दोन सरपंचांची निवड झाली असून, त्यात सांगली जिल्ह्याचे नाव उंचावत अग्रण धुळगावचे लोकनियुक्त सरपंच शिवदास चंद्रकांत भोसले यांनी मानाचे स्थान पटकावले आहे.

​सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी या निवडीची अधिकृत घोषणा करत ही बाब संपूर्ण जिल्ह्यासाठी अत्यंत अभिमानास्पद असल्याचे नमूद केले. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत अग्रण धुळगावने गावपातळीवर घडवून आणलेला हा आमूलाग्र बदल इतर गावांसाठी दिशादर्शक ठरला आहे.

​स्मार्टफोन आणि समाजमाध्यमांच्या आहारी गेलेल्या नव्या पिढीला पुन्हा पुस्तकांकडे वळवण्यासाठी अग्रण धुळगाव ग्रामपंचायतीने ‘अभ्यासाचा भोंगा’ हा अभिनव उपक्रम हाती घेतला. दररोज सायंकाळी सात वाजता भोंगा वाजताच मुले खेळणे थांबवून आणि जेवण आटोपून आपापली दप्तरे उघडतात. सायंकाळी सात ते नऊ या दोन तासांत संपूर्ण गावात एकही टीव्ही सुरू राहत नाही की कोणाच्या हातात मोबाईल दिसत नाही. केवळ सायंकाळच नव्हे, तर पहाटे पाच वाजता पुन्हा भोंगा वाजवला जातो आणि आठवी ते दहावीसह स्पर्धा परीक्षांची तयारी करणारी मुले सकाळी पाच ते सात या वेळेत अभ्यास करतात. दिवसातून सलग चार तास चालणाऱ्या या स्वयंस्फूर्त शिस्तीमुळे गावातील शैक्षणिक वातावरणाचा कायापालट झाला आहे.

​गावाला अचानक भेट देणाऱ्या वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आणि अभ्यासकांनी सायंकाळी गावात फेरफटका मारून घरोघरी पाहणी केली असता, मुलांचे भवितव्य घडवण्यासाठी पालकांनी तसेच आजी-आजोबांनी टीव्ही-मोबाईलचा मोह स्वेच्छेने त्यागल्याचे प्रत्यक्ष दिसून आले. ऐतिहासिक आणि निसर्ग पर्यटनाच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्रात एका खेड्याने उभे केलेले हे पहिले ‘शैक्षणिक पर्यटन’ असल्याचे गौरवोद्गारही पाहणी दौऱ्यादरम्यान अधिकाऱ्यांनी काढले.

​केवळ शिक्षणच नव्हे, तर पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासाच्या बाबतीतही अग्रण धुळगावने राज्यासमोर नवा वस्तुपाठ घालून दिला आहे. महाराष्ट्र शासनाच्या प्रतिष्ठेच्या ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’ मध्ये अग्रण धुळगाव ग्रामपंचायतीने पुणे विभागात प्रथम क्रमांक पटकावून तब्बल ५० लाख रुपयांचे घवघवीत पारितोषिक आपल्या नावावर केले. गावात केवळ कागदोपत्री झाडे न लावता तब्बल ४३ हजार ७२० वृक्षांची प्रत्यक्ष लागवड करून त्यांचे शंभर टक्के संगोपन करण्यात आले आहे.

​याशिवाय बंधारे बांधून केलेली जलक्रांती, महिला बचत गटांचे सक्षमीकरण, सेंद्रिय शेतीचे स्वतंत्र दालन आणि आधुनिक ग्रामसचिवालय अशा चौफेर आघाड्यांवर या ग्रामपंचायतीने आदर्शवत कामगिरी नोंदवली आहे. हरियाणा येथे होणाऱ्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेत देशभरातील तज्ज्ञ, वरिष्ठ सनदी अधिकारी आणि निवडक लोकप्रतिनिधींसमोर सरपंच शिवदास भोसले हे अग्रण धुळगावच्या या ग्रामविकास मॉडेलचे सादरीकरण करणार आहेत. या बहुमानाबद्दल जिल्हा परिषद प्रशासन, पंचायत समिती आणि विविध क्षेत्रांतून सरपंच शिवदास भोसले, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक आणि ग्रामस्थांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

nynavabharatnews.online

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??