आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गोकुळ’च्या न्यायालयीन लढाईसाठी ८० लाखांची उधळपट्टी ; दुष्काळात सरकारी तिजोरी लुटणाऱ्या ‘महायुती’वर सतेज पाटील यांचा घणाघात

गोकुळ’च्या न्यायालयीन लढाईसाठी ८० लाखांची उधळपट्टी ; दुष्काळात सरकारी तिजोरी लुटणाऱ्या ‘महायुती’वर सतेज पाटील यांचा घणाघात

​कोल्हापूर :एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क 

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघातील (गोकुळ) अध्यादेशाच्या समर्थनासाठी राज्य सरकारने एका दिवसाच्या न्यायालयीन युक्तिवादापोटी सरकारी तिजोरीतून ८० लाख रुपये मोजल्याचे उघडकीस आल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेचे गटनेते सतेज (बंटी) पाटील यांनी या मुद्यावरून महायुती सरकारवर अत्यंत घणाघाती टीका केली आहे. एकीकडे राज्यात दुष्काळामुळे शेतकरी देशोधडीला लागला असताना आणि विकासकामांसाठी तिजोरीत खडखडाट असताना, गोकुळमधील बेकायदेशीर हस्तक्षेपाचे समर्थन करण्यासाठी सरकारी तिजोरी लुटली जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. 

​सतेज पाटील यांनी आपल्या समाजमाध्यम पोस्टद्वारे सरकारवर थेट निशाणा साधला. गोकुळ दूध संघात कोणत्याही मार्गाने सत्ता काबीज करण्यासाठी महायुती सरकारने साम, दाम, दंड आणि कपट अशा सर्व मार्गांचा अवलंब सुरू केला असल्याचा आरोप त्यांनी केला. राज्यातील शेतकरी दुष्काळाच्या भीषण संकटात सापडला असून, सर्वसामान्य जनतेच्या मूलभूत प्रश्नांसाठी आणि विकासकामांसाठी निधीची कमतरता भासत आहे. अशा बिकट परिस्थितीत गोकुळवर लादलेल्या चार शासननियुक्त संचालकांच्या नियुक्तीचा न्यायालयात बचाव करण्यासाठी वकिली शुल्काच्या नावाखाली तब्बल ८० लाख रुपयांची उधळपट्टी करण्यात आल्याने त्यांनी सरकारचा हा कारनामा जनतेसमोर मांडत तीव्र संताप व्यक्त केला आहे.

​सहकार कायद्यातील कलम ७३ अअअ (२) मध्ये सुधारणा करून ५०० कोटींपेक्षा अधिक उलाढाल असणाऱ्या संस्थांवर पाच तज्ज्ञ संचालक नेमण्याचा अध्यादेश सरकारने जारी केला होता. या निर्णयाद्वारे गोकुळमधील समविचारी आघाडीचे बहुमत मोडीत काढण्याचा प्रयत्न झाल्याचा आक्षेप घेत संचालक शशिकांत आनंदराव पाटील-चुयेकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये रिट याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सरकारच्या वतीने बाजू मांडण्यासाठी भारताचे माजी महान्यायवादी ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. मुकुल रोहतगी यांना पाचारण करण्यात आले होते. एका दिवसाच्या सुनावणीसाठी रोहतगी यांनी ८० लाख रुपयांचे देयक सादर केले होते. सहकार विभागाने वित्त विभागाच्या मान्यतेनंतर १० टक्के आयकर कपात करून ७२ लाख रुपयांचे देयक वितरित करण्याचा शासन निर्णय २३ नोव्हेंबर रोजी जारी केला. 

​शासनाचा हा अधिकृत आदेश बाहेर येताच सहकार आणि राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. दुष्काळात बळीराजा मदतीची वाट पाहत असताना एका सहकारी संस्थेवरील राजकीय वर्चस्वाच्या ईर्ष्यापोटी जनतेच्या करातून जमा झालेल्या पैशांची वकिलांवर अशा प्रकारे उधळपट्टी करणे कितपत नैतिक आहे, असा थेट सवाल आता उपस्थित केला जात आहे. सतेज पाटील यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे गोकुळच्या संचालक मंडळातील वर्चस्वाची ही न्यायालयीन लढाई आता थेट दुष्काळ, शेतकरी आणि सरकारी तिजोरीच्या गैरवापराच्या मोठ्या राजकीय संघर्षात रूपांतरित झाली आहे. 

nynavabharatnews.online

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??