आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

शिवाजी विद्यापीठाचा ६३ वा दीक्षांत समारंभ राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली दिमाखात संपन्न , पदवीधरांमध्ये मुलींचे वर्चस्व

तनुजा साळुंखेला मानाचे 'राष्ट्रपती सुवर्णपदक', तर वेदिका कदम 'कुलपती सुवर्णपदका'ची मानकरी

शिवाजी विद्यापीठाचा ६३ वा दीक्षांत समारंभ राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली दिमाखात संपन्न , पदवीधरांमध्ये मुलींचे वर्चस्व

तनुजा साळुंखेला मानाचे ‘राष्ट्रपती सुवर्णपदक’, तर वेदिका कदम ‘कुलपती सुवर्णपदका’ची मानकरी

कोल्हापूर : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

उच्च शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांमध्ये केवळ पदवीपुरते शिक्षण न ठेवता त्यांच्यात डिजिटल साक्षरता, विश्लेषणात्मक विचारक्षमता, सर्जनशीलता, प्रभावी संवादकौशल्य आणि उद्योजकीय दृष्टिकोन रुजवण्यावर भर दिला पाहिजे. भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विद्यापीठांनी नवोन्मेष, कौशल्य विकास आणि थेट रोजगार निर्मितीला आपल्या कार्यपद्धतीत सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे स्पष्ट प्रतिपादन राज्यपाल तथा कुलपती जिष्णु देव वर्मा यांनी केले. विकसित भारताच्या संकल्पपूर्तीसाठी युवा पदवीधरांनी केवळ या परिवर्तनाचे मूक साक्षीदार न राहता त्याचे सक्रिय शिल्पकार व्हावे आणि आपल्या ज्ञान-कौशल्यांचा उपयोग राष्ट्रउभारणीसाठी करावा, असे आवाहनही त्यांनी केले. 

​शिवाजी विद्यापीठाचा ६३ वा दीक्षांत समारंभ राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊ सभागृहात अत्यंत उत्साहात पार पडला. या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून भारताचे माजी लष्करप्रमुख, मराठा लाईट इन्फन्ट्री रेजिमेंटचे मानद कर्नल तथा अरुणाचल प्रदेशचे माजी राज्यपाल जनरल जे. जे. सिंग उपस्थित होते. या वेळी व्यासपीठावर कुलगुरू डॉ. राजनीश कामत, राज्यपालांचे सचिव प्रशांत नारनवरे, प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव तसेच वित्त व लेखा अधिकारी सुहासिनी पाटील यांच्यासह विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळांचे सदस्य उपस्थित होते. 

​छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्मृतींना आणि विचारांना अभिवादन करून राज्यपाल म्हणाले, की शिवाजी विद्यापीठाने गेल्या सहा दशकांहून अधिक काळ कोल्हापूर, सांगली आणि सातारा या तिन्ही जिल्ह्यांतील ग्रामीण, दुर्गम भागापर्यंत ज्ञानाचा प्रकाश पोहोचवण्याचे ऐतिहासिक कार्य केले आहे. पदवी हे केवळ वैयक्तिक शैक्षणिक यशाचे प्रमाणपत्र नसून ते समाजात घडणाऱ्या परिवर्तनाचे प्रतीक आहे. उच्च शिक्षणात विद्यार्थिनींचा ५७ टक्क्यांहून अधिक असलेला सहभाग हा सर्वसमावेशक प्रगतीचा पुरावा आहे; परंतु त्याच वेळी उच्च शिक्षणातील मुलांचे घटते प्रमाण ही अत्यंत गांभीर्याने विचार करण्याजोगी बाब बनली आहे. वंचित आणि दुर्बल घटकांपर्यंत उच्च शिक्षणाची गंगा पोहोचावी, यासाठी एकूण पटनोंदणी वाढवण्यावर भर दिला पाहिजे. कोणत्याही गुणवंत विद्यार्थ्याला आर्थिक अथवा भौगोलिक अडचणींमुळे शिक्षणापासून वंचित राहावे लागू नये, यासाठी ‘स्कूल कनेक्ट’सारखे उपक्रम अधिक सक्षमतेने राबवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. 

​बदलत्या तंत्रज्ञानाचा संदर्भ देताना राज्यपाल म्हणाले, की सध्या जगभरात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), रोबोटिक्स, स्वयंचलित यंत्रणा, क्वांटम आणि जैवतंत्रज्ञानामुळे उद्योग व रोजगाराचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे. विद्यार्थ्यांनी या उदयोन्मुख तंत्रज्ञानाची क्षमता समजून घेतानाच त्याच्या मर्यादा आणि नैतिक परिणामांची जाणीव ठेवली पाहिजे. भविष्यकालीन आव्हानांसाठी विद्यापीठांना सज्ज करण्याच्या हेतूने राजभवनात ‘फ्युचरिस्टिक टेक्नॉलॉजी फोरम’ची स्थापना करण्यात आली असून, या फोरमचे नेतृत्व कुलगुरू डॉ. राजनीश कामत समर्थपणे करत असल्याबद्दल राज्यपालांनी त्यांचा विशेष गौरव केला. कोल्हापूर परिसरातील भक्कम औद्योगिक क्षमता लक्षात घेता विद्यापीठाने आपल्या संशोधनाचा लाभ स्थानिक फौंड्री उद्योग, वस्त्रोद्योग, अभियांत्रिकी, सहकार क्षेत्र तसेच जगप्रसिद्ध पारंपरिक कोल्हापुरी चप्पल कारागिरांच्या उत्पादकतेत वाढ करण्यासाठी द्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. 

​कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जनरल जे. जे. सिंग यांनी आपल्या ओघवत्या भाषणात युवकांना राष्ट्रनिर्मितीचे आवाहन केले. आजचा भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था असून या प्रगतीचा कणा देशातील तरुण पिढी आहे, असे सांगून ते म्हणाले, की आज माहिती आणि तंत्रज्ञान सहज उपलब्ध असले तरी विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानात सातत्य ठेवले पाहिजे. विद्यार्थ्यांनी आपले संशोधन केवळ शैक्षणिक प्रबंधांपुरते किंवा नियतकालिकांपुरते मर्यादित न ठेवता ते सामान्य माणसाच्या दैनंदिन अडचणी दूर करण्यासाठी उपयोगात आणावे. विशेषतः विद्यार्थिनींनी निर्णयप्रक्रियेत आत्मविश्वासाने पुढे येऊन नेतृत्व करावे, असे सांगतानाच छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूल्यांचा आदर्श ठेवून जीवनात यशासाठी कोणत्याही शॉर्टकटचा मार्ग निवडू नये, असा मोलाचा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. 

​समारंभाच्या प्रास्ताविकात कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी विद्यापीठाच्या शैक्षणिक व प्रशासकीय प्रगतीचा आलेख मांडला. विद्यापीठाशी संलग्न २८७ महाविद्यालये, ३४ अधिविभाग, २ स्कूल्स, १९ संशोधन केंद्रे आणि १५ अध्यासनांच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षणाची परंपरा विद्यापीठाने कायम राखली आहे. यंदाच्या दीक्षांत सोहळ्यात ६० हजार २५० स्नातकांना पदवी प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली असून, यामध्ये तब्बल ३४ हजार ६७० विद्यार्थिनींचा समावेश आहे, म्हणजेच पदवीधरांमध्ये विद्यार्थिनींचे प्रमाण ५७.५५ टक्के राहिले आहे. याशिवाय परीक्षा विभागाचे डिजिटलायझेशन, वेळेत निकाल आणि सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी राबवलेल्या विशेष योजनांचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. 

​या दीक्षांत सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांना राज्यपाल व मान्यवरांच्या हस्ते विविध पदके प्रदान करण्यात आली. शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ मधील क्रीडा, कला, बौद्धिक गुणवत्ता, एनसीसी, एनएसएस आणि सर्वंकष कौशल्यासाठीचा मानाचा राष्ट्रपती सुवर्णपदक विद्यापीठाच्या एमबीए अधिविभागातील तनुजा बाजीराव साळुंखे हिला बहाल करण्यात आला. एम. ए. मानसशास्त्र विषयात सर्वाधिक गुण मिळवल्याबद्दल कुलपती सुवर्णपदक इस्लामपूरच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील विद्यार्थिनी वेदिका उमेश कदम हिला प्रदान करण्यात आले. सामाजिक क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी पीएच.डी. स्नातकांमधून डॉ. दीपक सावंत यांना विशेष सन्मान श्रेणी देऊन गौरविण्यात आले. 

​कार्यक्रमाचे आभार कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी मानले. या सोहळ्यास विद्यापीठातील प्राध्यापक, अधिकारी, विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, अधिसभा सदस्य, पदवीधर विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते, 

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??