आपला जिल्हाक्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडी

ढोल-ताशांचा गजर, लेझीमचा ठेका अन् करवीरकरांचा उत्साह; ‘ईठा’च्या निमित्ताने श्रद्धा कपूर अंबाबाईचरणी नतमस्तक

ढोल-ताशांचा गजर, लेझीमचा ठेका अन् करवीरकरांचा उत्साह; ‘ईठा’च्या निमित्ताने श्रद्धा कपूर अंबाबाईचरणी नतमस्तक

कोल्हापूर : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री श्रद्धा कपूर हिने आपल्या आगामी ‘ईठा’ (Eetha) या बहुप्रतीक्षित चित्रपटाच्या प्रसिद्धी दौऱ्यानिमित्त बुधवारी (दि. २५) कोल्हापूरला भेट दिली. करवीर नगरीत दाखल होताच तिने सर्वप्रथम साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात जाऊन देवीचे मनोभावे दर्शन घेतले. लाल रंगाची पारंपरिक साडी, अंगावर साजेसे दागिने आणि केसात गजरा अशा अस्सल मराठमोळ्या पेहरावात आलेल्या श्रद्धाने मंदिराच्या भिंतीवर डोके टेकवून देवीचे आशीर्वाद घेतले. यावेळी मंदिर व्यवस्थापनाच्या वतीने तिला देवीची प्रतिमा प्रसाद म्हणून देऊन सन्मानित करण्यात आले. 

मुंबईहून विमानाने कोल्हापुरात पोहोचल्यापासूनच श्रद्धाच्या स्वागतासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. अंबाबाई मंदिर परिसर आणि शहरातील प्रमुख मार्गांवर करवीरकरांनी पारंपरिक ढोल-ताशांचा दणदणाट, लेझीम पथकांची प्रात्यक्षिके आणि भव्य दुचाकी रॅली काढून तिचे जंगी स्वागत केले. कोल्हापूरकरांच्या या अनोख्या आणि प्रेमळ आदरतिथ्याने भारावून गेलेल्या श्रद्धानेही हात जोडून चाहत्यांच्या प्रेमाचा स्वीकार केला. 

अंबाबाई दर्शनानंतर श्रद्धा कपूरने संजय घोडावत विद्यापीठाच्या (SGU) दीक्षांत सभागृहात आयोजित भव्य प्रमोशन सोहळ्याला हजेरी लावली. दुपारी दोनच्या सुमारास सुरू झालेल्या या कार्यक्रमात विद्यार्थी आणि तरुणाईचा उत्साह शिगेला पोहोचला होता. यावेळी संवाद साधताना श्रद्धाने कोल्हापूरशी असलेल्या खास नात्याला उजाळा दिला. या चित्रपटाचे बहुतांश चित्रीकरण कोल्हापूर आणि परिसरातच पार पडले आहे. चित्रीकरणाच्या दिवसांत कोल्हापूरच्या मातीने आणि येथील रसिकांनी दिलेले प्रेम आपण कधीही विसरू शकत नाही, अशा शब्दांत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या. पुण्यातील झील कॉलेजच्या मैदानावर झालेल्या कार्यक्रमानंतर ‘ईठा’च्या टीमचा हा कोल्हापूर दौरा पार पडला असून, गुरुवारी (दि. २६) ती जयपूर येथे प्रमोशनसाठी रवाना होणार आहे. 

‘छावा’ या ऐतिहासिक चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी ‘ईठा’च्या माध्यमातून महाराष्ट्राच्या लोककलेतील सुवर्णपान उलगडले आहे. मॅडॉक फिल्म्सचे दिनेश विजन आणि कठपुतळी क्रिएशन्स यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट तमाशा सम्राज्ञी विठाबाई भाऊ  नारायणगावकर यांच्या संघर्षमय आणि प्रेरणादायी जीवनप्रवासावर आधारित आहे. श्रद्धाने या चित्रपटात विठाबाईंची आव्हानात्मक भूमिका साकारली असून, लावणी आणि गवळण या अस्सल मराठी लोककला सादर करण्यासाठी तिने विशेष परिश्रम घेतले आहेत. 

चित्रपटातील ‘जी जी रे जी’ या गाण्यातील तिचा पारंपरिक नऊवारी लूक आणि लावणीच्या अदांनी यापूर्वीच प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. या चित्रपटात श्रद्धा कपूरसोबत अभिनेता रणदीप हुड्डा, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर, सिद्धार्थ जाधव आणि मोहम्मद झीशान अय्यूब यांच्याही दमदार भूमिका आहेत. संगीतकार अजय-अतुल यांच्या सुमधुर संगीताने सजलेला हा सांगीतिक जीवनपट येत्या ४ डिसेंबर २०२६ रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??