पुण्यातील १०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे यांची एकमताने निवड
संमेलनाच्या तारखांमध्ये बदल; आता २७ ते ३० जानेवारीदरम्यान आयोजन

पुण्यातील १०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक
डॉ. शरणकुमार लिंबाळे यांची एकमताने निवड
पुणे : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
पुण्यात आगामी वर्षात रंगणाऱ्या ऐतिहासिक १०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ विचारवंत, प्रख्यात साहित्यिक आणि ‘अक्करमाशी’कार डॉ. शरणकुमार लिंबाळे यांची मंगळवारी एकमताने निवड करण्यात आली. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत यासंदर्भातील अधिकृत घोषणा केली.
शंभराव्या ऐतिहासिक संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी साहित्य वर्तुळातून अनेक दिग्गजांची नावे चर्चेत होती. मात्र, महामंडळाच्या घटक संस्थांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत डॉ. लिंबाळे यांच्या नावावर एकमुखाने शिक्कामोर्तब करण्यात आले. अध्यक्षपदाच्या घोषणेनंतर लगेचच सायंकाळी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने नवनिर्वाचित संमेलनाध्यक्ष डॉ. लिंबाळे यांचा औपचारिक सत्कार करण्याचे नियोजित करण्यात आले. डॉ. लिंबाळे यांच्या निवडीने मराठीतील उपेक्षित, वंचित आणि मानवकेंद्री जाणिवांना संमेलनाध्यक्षपदाचा बहुमान मिळाल्याची भावना व्यक्त होत असून संपूर्ण राज्यासह देशभरातील साहित्य विश्वातून या निर्णयाचे स्वागत होत आहे.
संमेलनाच्या तारखांमध्ये बदल; आता २७ ते ३० जानेवारीदरम्यान आयोजन
शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजित तारखांमध्ये प्रशासकीय कारणास्तव बदल करण्यात आल्याची माहितीही साहित्य महामंडळाने दिली. यापूर्वी हे संमेलन २८ ते ३१ जानेवारी २०२७ या कालावधीत पुण्यात घेण्याचे ठरले होते. तथापि, ३१ जानेवारी रोजी पुण्यात ‘पुणे ग्रँड टूर २०२७’ या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेचा समारोप होत आहे. या मोठ्या क्रीडा स्पर्धेमुळे शहरातील अंतर्गत वाहतूक व्यवस्था, पोलीस बंदोबस्त आणि प्रशासकीय व्यवस्थेवर मोठा ताण येण्याची शक्यता निर्माण झाली होती. संमेलनातील रसिकांची गैरसोय टाळण्यासाठी साहित्य महामंडळाच्या मार्गदर्शक समितीने सोमवारी झालेल्या बैठकीत संमेलन एक दिवस आधी, म्हणजेच २७ ते ३० जानेवारी २०२७ या कालावधीत घेण्याचा सर्वानुमते निर्णय घेतला.
’अक्करमाशी’ ते ‘सरस्वती सन्मान’ : जागतिक स्तरावर उमटलेला ठसा
डॉ. शरणकुमार लिंबाळे हे मराठी साहित्य विश्वातील अत्यंत ताकदीचे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेलेले लेखक मानले जातात. त्यांच्या ‘अक्करमाशी’ या आत्मकथनाने भारतीय साहित्य जगतात तीव्र सामाजिक वास्तव मांडत नवा इतिहास घडवला. उपेक्षेची आणि शोषणाची दाहकता मांडणाऱ्या या ग्रंथाचे इंग्रजीसह (द आऊटकास्ट) अनेक प्रादेशिक आणि जागतिक भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. अनेक नामवंत विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांत या ग्रंथाचा समावेश आहे. लिंबाळे यांनी केवळ ललित लेखन न करता ‘दलित साहित्याचे सौंदर्यशास्त्र’ या समीक्षा ग्रंथाद्वारे साहित्याच्या समीक्षेत मानवी मूल्यांचा नवा मानदंड निर्माण केला.
त्यांच्या ‘सनातन’ या बहुचर्चित ऐतिहासिक आणि सामाजिक कादंबरीला देशातील अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा के. के. बिर्ला फाउंडेशनचा ‘सरस्वती सन्मान’ (२०२०) बहाल करण्यात आला होता. याखेरीज ‘उपल्या’, ‘बहुजन’, ‘प्रज्ञासूर्य’ यांसारखी त्यांची अनेक पुस्तके वाचकप्रिय ठरली आहेत. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात त्यांनी प्राध्यापक, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक आणि विभागीय संचालक म्हणून दीर्घकाळ शैक्षणिक आणि प्रशासकीय योगदान दिले आहे.
मराठी भाषेला केंद्र सरकारकडून अभिजात भाषेचा अधिकृत दर्जा मिळाल्यानंतरचे हे पहिलेच शतक महोत्सवी संमेलन आहे. त्यामुळे पुण्यात भरणारे हे १०० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन केवळ एक उत्सव न राहता व्यापक सामाजिक आणि वैचारिक मंथनाचे महापीठ ठरेल, असा विश्वास साहित्य रसिकांमधून व्यक्त होत आहे.




