कृषी व व्यापारताज्या घडामोडी

उद्यानपंडित गणपतराव पाटील ‘कृषी स्वास्थ्य संवर्धक पुरस्कारा’ने सन्मानित

उद्यानपंडित गणपतराव पाटील ‘कृषी स्वास्थ्य संवर्धक पुरस्कारा’ने सन्मानित

​माती केवळ बोलून नव्हे , तर कामातून जपायची असते : डॉ. तारा भवाळकर यांचे उद्गार 

​सांगली : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

माणूस जिवंत राहण्यासाठी जमीन, पाणी आणि झाडेझुडपे हेच खरे मुख्य आधार आहेत. आजच्या काळात आपली माती जिवंत आणि सुपीक ठेवण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे. माती वाचली, तरच आपली संस्कृती आणि पुढची पिढी टिकेल. माती केवळ चांगल्या गप्पा मारून किंवा मंत्र म्हणून टिकत नाही, तर त्यासाठी शेतात प्रत्यक्ष घाम गाळावा लागतो आणि योग्य पद्धती वापरावी लागते. हेच काम उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी आपल्या शेतीतील नव्या प्रयोगांतून करून दाखवले आहे, असे विचार ज्येष्ठ साहित्यिक डॉ. तारा भवाळकर यांनी मांडले.

​येथील जनस्वास्थ्य परिवार संघटनेच्या वतीने शेतीत नवे प्रयोग करणारे दिवंगत बाबासाहेब मडके यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘स्व. बाबासाहेब मडके स्मृती कृषी स्वास्थ्य संवर्धक पुरस्कार’ सुरू करण्यात आला आहे. रोटरी क्लबच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात श्री दत्त उद्योग समूहाचे प्रमुख व दत्त साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक उद्यानपंडित गणपतराव पाटील यांना हा पहिला पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. वैजनाथ महाजन होते.

​डॉ. तारा भवाळकर पुढे म्हणाल्या, आई आणि माती या दोघींचे मोल सारखेच आहे. घरापासून ते समाजापर्यंत प्रत्येक ठिकाणी स्त्रियांचे योगदान मोठे राहिले आहे. आपली लोकसंस्कृती ही खऱ्या अर्थाने महिलांच्या कष्टावरच उभी राहिली आहे. त्यामुळे घराच्या वंशावळीत जशी पुरुषांची नावे येतात, तसेच आता महिलांची नावेही समाविष्ट केली पाहिजेत. शेतात राबणाऱ्या कष्टकरी महिलांच्या कष्टाचीही दखल घेऊन अशा पुरस्कारांनी त्यांचाही सन्मान व्हायला हवा.

​सत्काराला उत्तर देताना गणपतराव पाटील म्हणाले, बाबासाहेब मडके हे नेहमी नवे प्रयोग करणारे आणि जमिनीशी घट्ट जोडलेले व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून चांगल्या कामाची पावती म्हणून हा पुरस्कार सुरू करण्यात आला आहे. पहिल्याच पुरस्कारासाठी माझी निवड झाली, याचा मनापासून आनंद वाटतो. आज अतिरिक्त खतांमुळे आणि पाण्याच्या अतिवापरामुळे जमिनी नापीक व क्षारपड होत चालल्या आहेत. या जमिनी पुन्हा चांगल्या करणे, पाण्याचा जपून वापर करणे आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी माती कसदार ठेवणे ही काळाची गरज आहे. या पुरस्कारामुळे माझ्या शाश्वत शेतीच्या कामाला अधिक बळ मिळाले आहे.

​अध्यक्षीय भाषणात प्रा. वैजनाथ महाजन यांनी जनस्वास्थ्य परिवाराच्या उपक्रमाचे कौतुक केले. गणपतराव पाटील यांनी शेती आणि साखर उद्योगाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन शेतकऱ्यांसमोर चांगला आदर्श ठेवला आहे, असे त्यांनी सांगितले.

​सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. डॉ. महावीर अक्कोळे यांनी स्वागत करून पुरस्कारामागचा हेतू सांगितला. डॉ. अनिल मडके यांनी बाबासाहेब मडके यांच्या आठवणींना उजाळा दिला. सुनील कुलकर्णी यांनी मानपत्राचे वाचन केले.

​या वेळी डॉ. सुरेश उपळावीकर, सुभाष मडके, राजाराम मडके, नामदेव माळी, सतीश डोडिया, प्रा. गौतमीपुत्र कांबळे, अविनाश सप्रे, रमेश शहा, संजय ठिगळे, महेश कराडकर, अनिल फाळके यांच्यासह सांगली व परिसरातील नागरिक, शेतकरी आणि मडके कुटुंबीय उपस्थित होते

nynavabharatnews.online

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??