आरोग्य व शिक्षणकृषी व व्यापारताज्या घडामोडी

डिजिटल अरेस्ट फसवणुकीची रक्कम बँकांनीच भरून द्यावी – सर्वोच्च न्यायालयाचे कडक ताशेरे

व्हॉट्सॲपकडून उपाययोजनांची मागणी...

डिजिटल अरेस्ट  फसवणुकीची रक्कम बँकांनीच भरून द्यावी – सर्वोच्च न्यायालयाचे कडक ताशेरे , व्हॉट्सॲपकडून उपाययोजनांची मागणी…

 

नवी दिल्ली :एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

देशभरात सामान्य नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या ‘डिजिटल अरेस्ट’ आणि संबंधित सायबर गुन्ह्यांची सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. या पार्श्वभूमीवर व्हॉट्सॲपसह इतर सर्व मध्यस्थ डिजिटल व्यासपीठांनी अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी काय ठोस पावले उचलली आहेत आणि भविष्यात कोणत्या उपाययोजना प्रस्तावित आहेत, याचा सविस्तर आराखडा न्यायालयात सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचबरोबर हे प्रस्ताव केंद्रीय गृह मंत्रालयाच्या ‘भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्रा’कडेही (I4C) तातडीने सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

​सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर या संदर्भातील याचिकेवर सुनावणी पार पडली. बनावट तपास यंत्रणांचे अधिकारी बनून व्हिडिओ किंवा ऑडिओ कॉलद्वारे नागरिकांना घरातच ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली धमकावण्याचे प्रकार वेगाने वाढत आहेत. बहुतांश घटनांमध्ये व्हॉट्सॲप आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा गैरवापर केला जात असल्याचे समोर आले आहे. यामुळे न्यायालयाने डिजिटल कंपन्यांना त्यांची जबाबदारी निश्चित करत प्रत्यक्ष कृती आराखडा मागवला आहे. 

​सुनावणीदरम्यान व्हॉट्सॲपच्या वतीने बाजू मांडताना ज्येष्ठ विधीज्ञांनी सांगितले की, प्लॅटफॉर्मने प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून आतापर्यंत संशयित आणि फसवणुकीशी संबंधित सुमारे ९ हजार ४०० खाती बंद केली आहेत. तसेच संशयित हालचाली ओळखून युझर्सना धोक्याची सूचना देणारी विशेष सुरक्षा प्रणाली विकसित करण्याचे काम सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली. न्यायालयाने यावर स्पष्ट भूमिका घेत केवळ खाती बंद करून चालणार नसून, भविष्यात फसवणूक रोखण्यासाठी काय कायमस्वरूपी योजना आहे, हे प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्ट करण्यास सांगितले.

​बँकांनी पीडितांचे नुकसान भरून द्यावे; खंडपीठाचे स्पष्ट मत

​केवळ डिजिटल प्लॅटफॉर्म्सच नव्हे, तर बँकिंग यंत्रणेच्या भूमिकेवरही न्यायालयाने कडक शब्दांत ताशेरे ओढले. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) प्रस्तावित केलेल्या नियमावलीमध्ये अशा तरतुदी समाविष्ट कराव्यात, ज्यामुळे सायबर फसवणुकीला बळी पडलेल्या निष्पाप नागरिकांचे नुकसान बँकांनी भरून दिले पाहिजे, असे खंडपीठाने स्पष्टपणे नमूद केले. संशयास्पद बँक खाती, पैशांचे अचानक होणारे मोठे व्यवहार यावर लक्ष ठेवणे आणि ग्राहकांचे खाते सुरक्षित ठेवणे ही बँकांची प्राथमिक जबाबदारी आहे. बँकांनी ग्राहकांसाठी संरक्षक कवच म्हणून काम केले पाहिजे, त्यामुळे बँकिंग व्यवस्थेच्या निष्काळजीपणामुळे किंवा पडताळणीतील त्रुटींमुळे ग्राहकांचे पैसे गेले असल्यास, नुकसान भरपाई देण्याची तरतूद बंधनकारक असावी, असा पुनरुच्चार न्यायालयाने केला.

​याशिवाय सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या पोलीस महासंचालकांनी (डीजीपी) त्यांच्या कार्यक्षेत्रात दाखल झालेल्या डिजिटल अरेस्ट आणि सायबर गुन्ह्यांच्या गुन्ह्यांचा आणि तपासाचा सविस्तर अहवाल समन्वय समितीकडे सोपवावा, असे आदेशही देण्यात आले आहेत. या सर्व प्रकरणांची पुढील सुनावणी २३ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

nynavabharatnews.online

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??