दुष्काळग्रस्त शेतकरी आणि साखर कारखान्यांना सावरण्यासाठी केंद्राने विशेष पॅकेज द्यावे ; खासदार धनंजय महाडिक यांचे अमित शहा यांना निवेदन

दुष्काळग्रस्त शेतकरी आणि साखर कारखान्यांना सावरण्यासाठी केंद्राने विशेष पॅकेज द्यावे ; खासदार धनंजय महाडिक यांचे अमित शहा यांना निवेदन .
नवी दिल्ली : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
यंदाच्या अपुऱ्या आणि लहरी पावसामुळे महाराष्ट्रातील शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर मोठे संकट ओढवले असून, दुष्काळाच्या या छायेतून शेतकरी, साखर कारखाने आणि पशुधनाला वाचवण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने विशेष मदत पॅकेज जाहीर करावे, अशी आग्रही मागणी राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी केली आहे. नवी दिल्ली येथे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांची भेट घेऊन त्यांनी यासंदर्भात एक सविस्तर निवेदन दिले. विशेषतः सोलापूर जिल्ह्यासह राज्याच्या ऊस पट्ट्यातील साखर कारखान्यांना गाळप उसामागे प्रतिटन ५०० ते ७०० रुपयांचे थेट अनुदान द्यावे, जेणेकरून शेतकर्यांची उसाची देणी वेळेवर देता येतील, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. अमित शहा यांनी या सर्व मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद दिल्याने बळीराजाला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राज्याच्या अनेक भागात यावर्षी पावसाने मोठी ओढ दिली. त्यातही सोलापूरसारख्या जिल्ह्यात, जिथे राज्यामध्ये सर्वाधिक साखर कारखान्यांचे जाळे आहे, तिथे पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा अत्यंत कमी राहिले आहे. जमिनीतील ओलाव्याचा अभाव आणि प्रदीर्घ काळ राहिलेल्या कोरड्या वातावरणामुळे खरिपापाठोपाठ रब्बी हंगामावरही पाणी फिरले आहे. पिकांची वाढ खुंटल्याने उत्पादनात मोठी घट अपेक्षित आहे. या अस्मानी संकटाचा सर्वाधिक फटका ऊस शेतीला बसला आहे. पाण्याच्या अभावी उसाची उंची आणि वजन तर घटलेच आहे, पण त्यासोबतच उसाचा दर्जाही घसरला आहे. चालू गाळप हंगामात सोलापूर विभागातील साखर उतारा थेट साडेसात ते पावणेआठ टक्क्यांपर्यंत खाली येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. उतारा घटल्याने साखरेचे एकूण उत्पादन मोठ्या प्रमाणावर घसरणार असून, याचा थेट फटका कारखान्यांच्या आर्थिक ताळेबंदावर पडणार आहे.
साखर उतारा कमी असला तरी, कारखान्यांना शासनाच्या वैधानिक किमान आधारभूत किंमत (एफआरपी) आणि स्थानिक करारानुसार शेतकर्यांना उसाची बिले अदा करावीच लागतात. उसाचे वजन आणि एकरी उत्पादन आधीच घटल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. अशा दुहेरी कोंडीत सापडलेल्या साखर कारखान्यांवर कमी उतार्याचा संपूर्ण आर्थिक भार टाकल्यास अनेक कारखाने डबघाईला येतील आणि पर्यायाने शेतकर्यांची कोट्यवधी रुपयांची बिले थकीत राहतील. या संभाव्य संकटाची जाणीव करून देताना खासदार महाडिक यांनी बाधित कारखान्यांना प्रतिटन ५०० ते ७०० रुपये विशेष अर्थसहाय्य देण्याची व्यवहार्य मागणी सहकार मंत्र्यांसमोर ठेवली. केंद्राने ही मदत दिल्यास कारखान्यांना मोठा आर्थिक आधार मिळेल आणि शेतकर्यांच्या हक्काचे पैसे विनाविलंब त्यांच्या खात्यावर वर्ग करणे शक्य होईल. ही मदत थेट बाधित कारखान्यांपर्यंत पोहोचावी आणि यात कोणतीही अनियमितता होऊ नये यासाठी एक पारदर्शक यंत्रणा राबवण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.
केवळ शेती आणि कारखानेच नव्हे, तर दुष्काळाचे भीषण चटके पशुधनालाही बसत आहेत. पाणी आणि चाऱ्याच्या तीव्र टंचाईमुळे पशुपालकांवर आपली जनावरे कवडीमोल भावाने विकण्याची नामुष्की ओढवली आहे. ही परिस्थिती वेळीच हाताळण्यासाठी राज्यभर तातडीने चारा डेपो आणि जनावरांच्या छावण्या सुरू कराव्यात, तसेच चारा खरेदीसाठी पशुपालकांना थेट आर्थिक मदत द्यावी आणि पिण्याच्या पाण्याची सोय करावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
साखर उद्योगावर केवळ ऊस उत्पादक शेतकरीच नव्हे तर ऊसतोड मजूर, ट्रॅक्टर-बैलगाडी वाहतूकदार आणि स्थानिक बाजारपेठ अशी संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्था अवलंबून असते. त्यामुळे या संकटाकडे केवळ कृषी क्षेत्राचा प्रश्न म्हणून न पाहता, संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेसमोरील मोठे आव्हान म्हणून पाहण्याची गरज खासदार महाडिक यांनी अधोरेखित केली. याशिवाय पीक नुकसानीचे तातडीने पंचनामे करून विमा कंपन्यांकडून दाव्यांची लवकर परतफेड व्हावी, यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने समन्वयाने काम करण्याची विनंती त्यांनी केली. सहकार मंत्री अमित शहा यांनी या सर्व परिस्थितीचे गांभीर्य समजून घेत सकारात्मक कारवाईचे आश्वासन दिले आहे.




