बनावट प्रोटीन पावडर, हेल्थ सप्लिमेंट्सवर एफडीएचा चाप ; दिशाभूल करणाऱ्या इन्फ्लुएन्सर्सना १० लाखांचा दंड
जिम, औषधालयांना अन्न परवाना बंधनकारक; सप्लिमेंट्सच्या सेवनाने मृत्यू झाल्यास थेट जन्मठेप

बनावट प्रोटीन पावडर, हेल्थ सप्लिमेंट्सवर एफडीएचा चाप ; दिशाभूल करणाऱ्या इन्फ्लुएन्सर्सना १० लाखांचा दंड
जिम, औषधालयांना अन्न परवाना बंधनकारक; सप्लिमेंट्सच्या सेवनाने मृत्यू झाल्यास थेट जन्मठेप
मुंबई : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
शरीरसौष्ठवाचे वाढते वेड आणि सोशल मीडियावरील आकर्षक जाहिरातींच्या आहारी जाऊन तरुणाईकडून होणारा हेल्थ सप्लिमेंट्सचा बेसुमार व अविचारी वापर आता अन्न व औषध प्रशासनाच्या दृष्टीक्षेपात आला आहे. राज्यातील नागरिकांच्या आरोग्याशी सुरू असलेला हा खेळ थांबवण्यासाठी अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज राज्यव्यापी कडक नियमावली जाहीर केली. प्रोटीन पावडर, न्यूट्रास्युटिकल्स आणि विशेष आहाराची विनापरवाना विक्री करणाऱ्यांसह
दिशाभूल करणाऱ्या जाहिराती करणाऱ्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना दहा लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाईल, असा थेट इशारा मुंढे यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत दिला.
हे आदेश राज्यभरात तात्काळ लागू झाले असून उत्पादकांपासून थेट ग्राहकांपर्यंतच्या संपूर्ण साखळीला ते बंधनकारक असतील. यामध्ये उत्पादक, आयातदार, वितरक, गोदामे, किरकोळ विक्रेते, औषधालये, जिम, फिटनेस व हेल्थ सेंटर्स तसेच ई-कॉमर्स संकेतस्थळांचा समावेश आहे. सध्या राज्यात हेल्थ सप्लिमेंट्स आणि न्यूट्रास्युटिकल्स श्रेणीत १,१०० अन्न व्यवसाय परवाने कार्यरत असून त्यामध्ये ३१३ उत्पादक, ७५९ रिलेबलर्स आणि २८ रिपॅकर्स यांचा समावेश आहे. या सर्वांना नवीन अटी पाळाव्या लागणार आहेत. औषधालये किंवा जिमकडे इतर कायद्यांतर्गत परवाने असले, तरी सप्लिमेंट्सचा साठा किंवा विक्री करण्यासाठी त्यांना एफएसएसएआय किंवा एफडीएचा स्वतंत्र अन्न परवाना घेणे आता कायद्याने अनिवार्य राहणार आहे.
सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आणि खोट्या दाव्यांना वेसण
अलीकडे सोशल मीडियावर अनेक इन्फ्लुएन्सर्स झटपट वजन घटवणे, चेहऱ्यावर तजेला आणणे किंवा कमी वेळेत पीळदार शरीर बनवण्याचे अतिशयोक्तीपूर्ण दावे करत सप्लिमेंट्सची जाहिरात करताना दिसतात. कोणताही वैद्यकीय सल्ला न घेता दोन वर्षांवरील बालके, गर्भवती माता, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण आणि खेळाडू अशा उत्पादनांचे सेवन करतात. याचा शरीरावर तात्काळ नव्हे, तर हळूहळू घातक परिणाम होतो आणि कालांतराने रुग्ण गंभीर अवस्थेत पोहोचून उपचारांवर मोठा खर्च ओढवतो, अशी खंत मुंढे यांनी व्यक्त केली.
हेल्थ सप्लिमेंट्स हे केवळ दैनंदिन आहाराला पूरक असतात, ते औषध नाही आणि त्यांच्या सेवनाने कोणताही आजार बरा होत नाही, हे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. यापुढे कोणत्याही उत्पादनावर आजार बरा करण्याचा किंवा रोखण्याचा दावा करता येणार नाही. त्याचप्रमाणे डॉक्टरांनी किंवा आहारतज्ज्ञांनी शिफारस केलेले, असे मजकूर लिहिण्यास आणि जाहिरातींमध्ये डॉक्टरांची छायाचित्रे वापरण्यास पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे. खोटे दावे करणाऱ्या कंपन्यांइतकीच जबाबदारी त्यांची जाहिरात करणाऱ्या इन्फ्लुएन्सर्सचीही निश्चित करून कारवाई केली जाणार आहे.
स्टेरॉईड्स, अश्वगंधा आणि ‘ओआरएस’बाबत कठोर अटी
क्रीडा पूरक आहार, वजन कमी करणारी उत्पादने, लैंगिक स्वास्थ्यवर्धक आणि हर्बल उत्पादनांमध्ये अनेकदा अघोषित स्टेरॉईड्स किंवा औषधी घटकांची भेसळ आढळते. त्यामुळे अशा उत्पादनांसह आयात केलेला माल, ऑनलाइन विक्री आणि रुग्णालयांना पुरवल्या जाणाऱ्या विशेष आहारावर एफडीए विशेष तपासणी मोहीम राबवणार आहे. प्रत्येक वनस्पतीजन्य घटकासाठी वनस्पतीचा नेमका कोणता भाग वापरला आहे, हे लेबलवर स्पष्ट करणे आणि आवश्यक वैधानिक इशारे छापणे बंधनकारक असेल. अश्वगंधाचा वापर करताना केवळ मुळे किंवा मुळांचा अर्कच वापरता येईल. तसेच कोणत्याही उत्पादनाच्या नावात, ब्रँडमध्ये किंवा ट्रेडमार्कमध्ये ‘ओआरएस’ या शब्दाचा वापर करण्यास सक्त मनाई केली आहे. प्री-बायोटिक, प्रो-बायोटिक किंवा अन्य विशेष घटकांसाठी प्रशासनाची पूर्वपरवानगी आवश्यक राहील.
सहा विभागांतील धाडींत १.३९ कोटींचा माल जप्त
ही नियमावली लागू करण्यापूर्वी एफडीएने १३ नोव्हेंबर रोजी राज्यातील सहा विभागांत एकाचवेळी १७ ठिकाणी धडक तपासणी मोहीम राबवली होती. या कारवाईत १ कोटी ३८ लाख ९५ हजार ८५२ रुपये किमतीचा संशयित आणि विनापरवाना साठा जप्त करण्यात आला. ज्या घटकांच्या मंजुरीचे अर्ज भारतीय अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाने यापूर्वीच फेटाळले आहेत, अशा मॅग्नेशियम अॅसिटिल टॉरेट आणि निकोटिनामाइड मोनोन्यूक्लियोटाइड या घटकांचा वापर अनेक उत्पादक बिनधास्तपणे करत असल्याचे तपासणीत उघड झाले. काही उत्पादनांच्या वेष्टनावर एक नाव आणि आत भलताच घटक असल्याचेही आढळून आले.
या मोहिमेत नागपूर विभागात सर्वाधिक चार ठिकाणी कारवाई करत ५७ लाख ३० हजार रुपयांचा माल जप्त झाला. कोकण विभागात ठाण्यात एका ठिकाणी ४७ लाख ६५ हजार रुपये, पुणे विभागात पाच ठिकाणी ३० लाख ५७ हजार रुपये, नाशिक विभागात पाच ठिकाणी १ लाख ९९ हजार रुपये, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये एका ठिकाणी १ लाख ४२ हजार रुपयांचा साठा ताब्यात घेण्यात आला. अमरावती विभागात एका ठिकाणी तपासणी करण्यात आली, मात्र तेथे जप्तीची नोंद झाली नाही. या सर्व साठ्यांचे नमुने प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी पाठवले असून अहवाल येताच पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
नियम मोडल्यास दहा लाखांचा दंड ते थेट जन्मठेप
अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ नुसार नियमभंग करणाऱ्यांसाठी प्रशासनाने कठोर शिक्षेच्या तरतुदी स्पष्ट केल्या आहेत. निकृष्ट दर्जाचे किंवा नियमांचे उल्लंघन करणारे उत्पादन आढळल्यास कलम ५१ अन्वये पाच लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. वेष्टनावर ‘औषधी वापरासाठी नाही’ असा स्पष्ट उल्लेख नसल्यास किंवा चुकीची माहिती छापल्यास तीन लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. दिशाभूल करणारी जाहिरात केल्यास संबंधित उत्पादक किंवा इन्फ्लुएन्सर्सना थेट दहा लाख रुपयांपर्यंत दंड भरावा लागेल. वैध अन्न परवान्याविना व्यवसाय किंवा विक्री करणाऱ्यांवरही दहा लाख रुपयांपर्यंत दंड आकारला जाणार आहे.
एखाद्या बनावट किंवा असुरक्षित सप्लिमेंटच्या सेवनामुळे ग्राहकाचा मृत्यू झाल्यास दोषींना थेट जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते, असा गंभीर इशारा मुंढे यांनी दिला आहे. दंडात्मक कारवाईसोबतच सुधारणा नोटीस बजावणे, परवाना निलंबित किंवा रद्द करणे, माल जप्त करून बाजारातून मागे घेणे आणि फौजदारी गुन्हे दाखल करण्याची पावलेही उचलली जातील. दरम्यान, तरुणांनी आणि नागरिकांनी आकर्षक जाहिरातींना भुलून आरोग्याशी खेळ करू नये, तसेच कुठेही बनावट सप्लिमेंट्सची विक्री किंवा नियमबाह्य प्रकार निदर्शनास आल्यास तात्काळ अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार करावी, असे आवाहन तुकाराम मुंढे यांनी केले आहे.




