अंबाबाई मंदिर परिसराचा होणार कायापालट ; नागरिकांचे हित जपूनच भूसंपादन प्रक्रिया
योग्य मोबदल्यासाठी समितीचा विचार ; प्रशासनाकडून सर्वांना सहकार्याचे आवाहन

अंबाबाई मंदिर परिसराचा होणार कायापालट ; नागरिकांचे हित जपूनच भूसंपादन प्रक्रिया
योग्य मोबदल्यासाठी समितीचा विचार ; प्रशासनाकडून सर्वांना सहकार्याचे आवाहन
कोल्हापूर : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर आणि परिसर विकास आराखड्याची अंमलबजावणी करताना बाधित होणाऱ्या नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना योग्य मोबदला दिला जाईल. या संपूर्ण प्रक्रियेत कोणावरही अन्याय होणार नसून सर्वांच्या हिताचे रक्षण केले जाईल, अशी ग्वाही राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली. मंदिराचा कायापालट करणारा हा ऐतिहासिक आराखडा यशस्वी करण्यासाठी सर्व संबंधितांनी सकारात्मक सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखडा आणि प्रस्तावित भूसंपादनाबाबत विशेष समन्वय बैठक आयोजित करण्यात आली होती. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली. या बैठकीत स्थानिक नागरिक, बाधित व्यापारी, माजी नगरसेवक आणि श्रीपूजक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, करवीर उपविभागीय अधिकारी मोसमी चौगुले, जिल्हा नियोजन अधिकारी विक्रम देशमुख, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या सचिव वर्षा साळुंखे तसेच देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव उपस्थित होते.
बैठकीत भूमिका मांडताना आमदार क्षीरसागर म्हणाले की, साडेतीन शक्तिपीठांपैकी प्रमुख पीठ असणाऱ्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराला प्राचीन आणि ऐतिहासिक वारसा लाभला आहे. दरवर्षी देशभरातून लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. मंदिर परिसराचा विकास करताना भाविकांची सोय आणि परिसरातील नागरिकांचे हित या दोन्हींचा समतोल राखणे ही शासनाची भूमिका आहे. बाधित नागरिकांना जागेचा योग्य मोबदला मिळवून देण्यासाठी जिल्हा स्तरावर स्वतंत्र समिती स्थापन करण्याबाबत विचार केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी बैठकीत मंदिर विकास आराखड्याचे सादरीकरण केले. भूसंपादनाची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि वस्तुनिष्ठ पद्धतीने राबवली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या विकास आराखड्यानुसार एकूण ३६० मिळकतींचे संपादन प्रस्तावित आहे. यामध्ये ८९ निवासी, १९५ व्यावसायिक आणि ५३ संयुक्त मिळकतींचा समावेश आहे. मिळकत पत्रिकेनुसार या भागाचे एकूण क्षेत्र २८ हजार ५८ चौरस मीटर असून त्यातील १९ हजार ४८९ चौरस मीटर खासगी मालकीच्या क्षेत्राच्या संपादनाची प्रक्रिया हाती घेण्याबाबत नियोजन करण्यात आले आहे.
या विकास आराखड्यात भाविकांच्या दृष्टीने सर्वसमावेशक पायाभूत सुविधांचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये दर्शन रांग, दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी प्रशस्त पार्किंग व्यवस्था, बाधित व्यापाऱ्यांसाठी व्यावसायिक संकुल व दुकान गाळे, अन्नछत्र, मंदिर कार्यालय, ॲम्फीथिएटर, अद्ययावत स्वच्छतागृहे, हेरिटेज प्लाझा, लॉकर सुविधा आणि चप्पल स्टँड यांचा समावेश आहे. बैठकीदरम्यान उपस्थित सदनिकाधारक आणि गाळेधारकांनी आपल्या मागण्या व काही व्यवहार्य सूचना मांडल्या, तसेच योग्य मोबदला आणि पुनर्वसनाचा मार्ग मोकळा झाल्यास आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी सहकार्य करण्याची तयारी दर्शवली.




