आपला जिल्हाक्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडी

साउथ झोन हॉकी स्पर्धेचा कोल्हापुरात शानदार शुभारंभ ; यजमान संजीवन पब्लिक स्कूलची विजयी सलामी

साउथ झोन हॉकी स्पर्धेचा कोल्हापुरात शानदार शुभारंभ ; यजमान संजीवन पब्लिक स्कूलची विजयी सलामी

​कोल्हापूर : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

येथील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील १४, १७ व १९ वर्षांखालील मुला-मुलींच्या संघांमध्ये रंगणाऱ्या प्रतिष्ठेच्या साउथ झोन हॉकी क्रीडा स्पर्धेचा अत्यंत देखण्या आणि उत्साही वातावरणात शुभारंभ झाला. उद्घाटनानंतर झालेल्या १७ वर्षांखालील गटातील चुरशीच्या सलामीच्या लढतीत यजमान संजीवन पब्लिक स्कूलने जळगावच्या डॉ. उल्हास पाटील स्कूल (भुसावळ) संघाचा १-० असा पराभव करत स्पर्धेत विजयाने आगेकूच केली.

​स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर रूपाराणी निकम, महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, उपायुक्त किरणकुमार धनवडे, शिक्षक आमदार जयंत आसगावकर, महापालिका स्थायी समितीचे सभापती विशाल शिराळे, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, क्रीडा उपसंचालक सुहास पाटील, संजीवन शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ.पी.आर. भोसले, सहसचिव  प्रा.एन.आर. भोसले, कार्यकारी संचालक सौरभ भोसले, प्राचार्य व आयोजन सचिव बी. आर. बेलेकर यांच्या हस्ते सरस्वती पूजन आणि दीपप्रज्वलनाने संपन्न झाले.

​उद्घाटन सोहळ्याच्या प्रारंभी दोन्ही राज्यांतून आलेल्या सर्व संघांच्या खेळाडूंनी शानदार संचलन सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. संजीवनच्या संगीत विभागातील विद्यार्थ्यांनी सुरेल स्वागतगीत सादर केले. प्रास्ताविकामध्ये संजीवन समूहाचे अध्यक्ष पी. आर. भोसले यांनी संस्थेच्या तीन दशकांतील संघर्षाचा पट मांडला. हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जीवनातील प्रेरक प्रसंगांचे दाखले देत स्थानिक खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव उज्ज्वल करण्याचे ध्येय बाळगावे, असे आवाहन त्यांनी केले.

​महापौर रूपाराणी निकम यांनी संजीवनच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानाचे कौतुक करताना खेळाडूंच्या प्रगतीसाठी आणि क्रीडा सुविधांच्या विकासासाठी महापालिका सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही दिली. महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांनी स्पर्धेच्या अधिकृत उद्घाटनाची घोषणा केली. विद्यार्थ्यांनी मैदानावर कठोर परिश्रम घेऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्याचे स्वप्न प्रत्यक्षात आणावे, असा सल्ला त्यांनी दिला. संजीवनची उदयोन्मुख हॉकीपटू आर्या देशमुख हिने सर्व सहभागी खेळाडूंना क्रीडा नैतिकतेची शपथ दिली.

​समारंभास संजीवन समूहाचे संचालक किरण साळोखे, राजकुमार भोसले, खजिनदार एम. एस. लोहार, प्राचार्य महेश पाटील, प्राचार्या शिल्पा पाटील-सांगावकर, जिल्हा हॉकी संघटनेच्या अध्यक्षा सुरेखा पाटील, आजी-माजी नगरसेवक, प्रशिक्षक, क्रीडाप्रेमी आणि खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते. संयोजन उपप्राचार्य पी. एन., अमोल राऊत आणि शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केले. सूत्रसंचालन पांडुरंग गाजवे, विद्या साळोखे, विजय यादव आणि महेंद्र कुलकर्णी यांनी केले.

https://nynavabharatnews.online

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??