सीबीएसई क्लस्टर फुटबॉल : १४ वर्षांखालील गटात संजीवन पब्लिक स्कूल चॅम्पियन -स्पर्धेचे नेटके आयोजन

सीबीएसई क्लस्टर फुटबॉल : १४ वर्षांखालील गटात संजीवन पब्लिक स्कूल चॅम्पियन -स्पर्धेचे नेटके आयोजन
पन्हाळा : प्रसाद जाधव / एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
येथील संजीवन टर्फ ग्राउंड आणि वारणा-कोडोली परिसरात झालेल्या सीबीएसई क्लस्टर नवव्या विभागीय फुटबॉल स्पर्धेत १४ वर्षांखालील मुलांच्या गटात यजमान संजीवन पब्लिक स्कूलने विजेतेपद पटकावले. उत्तम खेळाचे प्रदर्शन करत संजीवनच्या संघाने प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. या मैदानी यशासोबतच विविध भागांतून आलेल्या संघांची व्यवस्था आणि सामन्यांचे नियोजन संस्थेने चोखपणे पार पाडले.
सीबीएसईच्या नवव्या क्लस्टरमध्ये महाराष्ट्र, गोवा, दमण-दीव आणि दादरा-नगर हवेलीचा समावेश होतो. क्लस्टर स्तरावरील विजेत्या संघांना थेट राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत खेळण्याची संधी मिळते. त्यामुळे संजीवनच्या १४ वर्षांखालील संघाच्या विजयाला विशेष महत्त्व आहे. या गटात ध्रुव ग्लोबल स्कूल (नांद्रे) उपविजेते ठरले. एसजीआय (अतिग्रे) संघाने तृतीय, तर मिलेनियम स्कूल (पुणे) संघाने चौथे स्थान मिळवले.
सलग पाच दिवस चाललेल्या या स्पर्धेत १४, १७ आणि १९ वर्षांखालील गटांत सामने झाले. १९ वर्षांखालील गटात आर्मी पब्लिक स्कूल (दिघी, पुणे) संघाने विजेतेपद मिळवले. कल्याणी स्कूल (मांजरी, पुणे) उपविजेते, ऑर्किड इंटरनॅशनल स्कूल (बाणेर, पुणे) तृतीय, तर नेव्ही चिल्ड्रेन स्कूल (गोवा) चौथ्या स्थानावर राहिले. १७ वर्षांखालील गटात डॉन बॉस्को स्कूल (नेरुळ, मुंबई) संघ विजेता ठरला. मेट्रिक्स स्कूल (पालघर) उपविजेते, कल्याणी स्कूल (मांजरी, पुणे) तृतीय, तर पोदार स्कूल (पवई, मुंबई) चौथ्या क्रमांकावर राहिले.
स्पर्धेचा सांगता समारंभ संजीवन टर्फ ग्राउंडवर झाला. सरस्वती पूजन आणि दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. संजीवन शिक्षण समूहाचे सहसचिव प्रा. एन. आर. भोसले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना खेळासोबत चांगला माणूस होण्याचे महत्त्व सांगितले. तसेच आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या कष्टांचा दाखला देत जिद्दीने खेळण्याचे आवाहन केले.
संजीवन शिक्षण समूहाचे अध्यक्ष पी. आर. भोसले, सहसचिव एन. आर. भोसले, क्रीडा निरीक्षक प्रमोद पाटील आणि प्राचार्य बी. आर. बेलेकर यांच्या हस्ते विजेत्यांना चषक व पदके देण्यात आली. सांगता सत्रात ध्वजावतरण पार पडले. स्पर्धेसाठी क्रीडा संचालक सौरभ भोसले, क्रीडा विभाग, उपप्राचार्य पी. एन. पाटील, अमोल राऊत व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. निकाल वाचन विजय यादव व विद्या साळोखे यांनी केले. सूत्रसंचालन पांडुरंग गांजवे, विद्या साळोखे आणि महेंद्र कुलकर्णी यांनी केले. विजय यादव यांनी आभार मानले.




