गणेशोत्सवातून समाजप्रबोधनाचा ध्यास घ्या : पो. नि. शिंदे , शिरोळ आणि हरोलीच्या ‘अजिंक्यतारा मंडळांना मानाचा ‘गणराया अवॉर्ड’

गणेशोत्सवातून समाजप्रबोधनाचा ध्यास घ्या : पो. नि. शिंदे , शिरोळ आणि हरोलीच्या ‘अजिंक्यतारा मंडळांना मानाचा ‘गणराया अवॉर्ड’
शिरोळ : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
सार्वजनिक गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून ती एक व्यापक सामाजिक चळवळ आहे. त्यामुळे तरुण कार्यकर्त्यांनी आपण या देशाचे जबाबदार नागरिक आहोत, याचे भान ठेवून समाजात वावरले पाहिजे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचा ध्यास घेत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन शिरोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांनी केले. येथील टारे बँक्वेट हॉलमध्ये शिरोळ पोलीस ठाणे आणि शिरोळ शहर श्रमिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘गणराया अवॉर्ड २०२६’ वितरण सोहळ्यात ते बोलत होते.
यावर्षी शिरोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्वच गावांमध्ये गणेशोत्सव अत्यंत उत्साहात आणि मुख्य म्हणजे शांततेत पार पडला. उत्सवादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासन सज्ज होतेच, पण त्याला तरुण मंडळांनी दिलेली साथ कौतुकास्पद असल्याचे शिंदे यांनी नमूद केले. उत्सवाच्या काळात कोणतीही जातीय तेढ निर्माण होणार नाही आणि मिरवणुकीत आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन होऊन सर्वसामान्यांना त्याचा नाहक त्रास होणार नाही, याची दक्षता इथून पुढच्या काळातही तरुणांनीच घ्यायला हवी. समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून विधायक व प्रबोधनात्मक उपक्रम राबवणाऱ्या मंडळांचा आदर्श इतरांनीही घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
गेली दोन दशके शिरोळमध्ये या अनोख्या उपक्रमाची परंपरा जोपासली जात आहे. श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष डी. आर. पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात या मागील भूमिका स्पष्ट केली. वीस वर्षांपूर्वी पत्रकार संघाने या गणराया अवॉर्डची सुरुवात केली होती. केवळ उत्सव साजरा करण्यापुरते मर्यादित न राहता तरुणाईने समाजाच्या प्रगतीची चळवळ पुढे नेण्यासाठी सातत्याने पुढाकार घ्यावा, हा यामागचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पत्रकार संघाचे उपाध्यक्ष बाळासाहेब माळी यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.
यंदाच्या वर्षी या मानाच्या गणराया अवॉर्डवर शहरी विभागात शिरोळच्या अजिंक्यतारा गणेशोत्सव मंडळाने तर ग्रामीण विभागात हरोलीच्या अजिंक्यतारा गणेशोत्सव मंडळाने प्रथम क्रमांक पटकावून आपली मोहोर उमटवली. शहरी विभागात शिरोळमधील राजवाडा परिसरातील बाल शिवाजी गणेशोत्सव मंडळाने द्वितीय, तर माळभाग येथील जय भवानी गणेशोत्सव मंडळाने तृतीय क्रमांक मिळवला. याच विभागात नवशक्ती गणेशोत्सव मंडळ आणि श्रीराम गणेशोत्सव मंडळ यांना उत्तेजनार्थ पुरस्काराने गौरविण्यात आले. ग्रामीण विभागाचा विचार करता धरणगुत्ती येथील विघ्नहर्ता गणेशोत्सव मंडळाला द्वितीय आणि टाकवडे येथील रॉयल सर्कल गणेशोत्सव मंडळाला तृतीय क्रमांकाने सन्मानित करण्यात आले. नांदणी येथील गांधी चौक गणेशोत्सव मंडळ आणि घालवाडच्या श्रीकृष्ण गणेशोत्सव मंडळाने उत्तेजनार्थ पुरस्कार मिळवला. या सर्व विजेत्या मंडळांना मान्यवरांच्या हस्ते चषक आणि मानपत्र देऊन गौरवण्यात आले.
या कार्यक्रमात गणेश विसर्जन मिरवणुकांमधील वाढत्या ध्वनिप्रदूषणाचा एक अत्यंत कळीचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. राज्यात डॉल्बीवर कडक निर्बंध असल्याने यावर्षी विसर्जन मिरवणुकांमध्ये अनेक मंडळांनी बँजो वाद्याचा आधार घेतला. पण सध्या बँजोमध्येही मोठ्या प्रमाणावर तांत्रिक बदल केले जात आहेत.
आवाजाच्या मर्यादेचे सर्रास उल्लंघन करणारी अवाढव्य यंत्रणा या बँजोला जोडली जात असल्याने बँजोच्या नावाखाली प्रत्यक्षात डॉल्बीसारखाच कानठळ्या बसवणारा दणदणाट सुरू असल्याचे दिसून आले. या प्रचंड आवाजामुळे लहान मुले, वयोवृद्ध नागरिक आणि महिलांना कमालीचा त्रास सहन करावा लागला. याबाबत अनेक नागरिकांनी थेट पोलीस प्रशासनाकडेही तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे उत्सवाचे पावित्र्य राखण्यासाठी भविष्यात अशा सुधारित बँजोच्या आवाजावरही कायदेशीर बंधने असणे आणि ती पाळणे काळाची गरज बनली आहे, याकडे पोलीस निरीक्षक शिंदे यांनी विशेष लक्ष वेधले.
या दिमाखदार सोहळ्याला पोलीस उपनिरीक्षक मुसा सुतार, पोलीस नाईक विलास निकम, गणराया अवॉर्डचे परीक्षक व ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब कांबळे, दिलीप कोळी (दिवाण), उद्योजक अविनाश टारे यांच्यासह शहरातील आणि परिसरातील विविध तरुण मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन पत्रकार चंद्रकांत भाट यांनी केले व त्यांनीच सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.




