ताज्या घडामोडीराजकीय

सोनिया गांधींच्या पुस्तकाला विरोध करताना शायना एनसींकडून घोडचूक ; बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फाडल्याने खळबळ.

सोनिया गांधींच्या पुस्तकाला विरोध करताना शायना एनसींकडून घोडचूक ; बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फाडल्याने खळबळ. 

मुंबई :एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

सोनिया गांधी यांच्या नव्या पुस्तकातील एका मजकुरावर आक्षेप नोंदवण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने आयोजित केलेली पत्रकार परिषद वेगळ्याच कारणाने वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या पुस्तकाचा निषेध नोंदवताना शिवसेनेच्या प्रवक्त्या शायना एनसी यांच्याकडून अनवधानाने शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचाच फोटो फाडला गेल्याचा प्रकार घडला. या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर वाऱ्यासारखा पसरल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून ठाकरे गटाने शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य आणि जनमानसातील पडसाद ओळखून एकनाथ शिंदे यांनी शायना एनसी यांना तातडीने विधानभवनात बोलावून घेतले आहे.

​सोनिया गांधी लिखित ‘बिलॉन्गिंग- अ जर्नी ऑफ लव्ह’ या पुस्तकामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणारा मजकूर असल्याचा आरोप करत शिंदे गटाच्या प्रवक्त्यांनी बुधवारी मुंबईत एका विशेष पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. सावरकरांच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा सत्ताधाऱ्यांचा मुख्य डाव होता. या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी करत निषेध म्हणून उपस्थित नेत्यांनी पुस्तकाच्या प्रती आणि पाने फाडण्यास सुरुवात केली. रागाच्या भरात पाने फाडत असताना शायना एनसी यांच्या हातून चुकून बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र असलेले पान फाडले गेले. चूक लक्षात येताच त्यांनी अर्ध्यावरच हात थांबवला, मात्र तोपर्यंत ही सर्व घटना कॅमेऱ्यात कैद झाली होती.

​या प्रकारानंतर ठाकरे गटाकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे आणि किशोरी पेडणेकर यांनी शिंदे गटावर सडकून टीका केली. या घटनेचा समाचार घेताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, ज्या लोकांचा पुस्तकांशी काहीही संबंध नाही आणि ज्यांना केवळ टेंडर, कमिशन, टक्केवारी आणि खोके यापलीकडे काही दिसत नाही, त्यांच्याकडून पुस्तकातील वैचारिक खोली समजण्याची अपेक्षा करणेच चुकीचे आहे. केवळ राजकीय द्वेषापोटी त्यांनी थेट बाळासाहेबांचाच अपमान केला असून ही कृती महाराष्ट्रातील लाखो शिवसैनिकांच्या भावना दुखावणारी आहे, असा घणाघात ठाकरे गटाने केला आहे.

​वादाने उग्र रूप धारण केल्यानंतर शायना एनसी यांनी तातडीने सारवासारव करत प्रसारमाध्यमांसमोर आणि सोशल मीडियावर आपले स्पष्टीकरण दिले. आपण बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडलेला नसून काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांचा फोटो फाडल्याचा दावा त्यांनी केला आहे. मणिशंकर अय्यर यांचा फोटो आपण एकदा नाही तर दहा वेळा फाडू आणि हेच आपल्याला बाळासाहेबांनी शिकवले आहे, असे त्या म्हणाल्या. तसेच, विरोधकांकडून जाणीवपूर्वक आपला व्हिडिओ चुकीच्या संदर्भाने फिरवून खोटा नॅरेटिव्ह पसरवला जात आहे. आपली बदनामी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही शायना एनसी यांनी दिला आहे.

​स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अपमानाचा मुद्दा पुढे करून राजकीय फायदा मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या शिंदे गटाला या एका चुकीमुळे पूर्णपणे बचावात्मक पवित्र्यात जावे लागले आहे. या घटनेचे राज्यभरात उमटणारे तीव्र राजकीय पडसाद पाहून एकनाथ शिंदे यांनी याची गंभीर दखल घेतली. त्यांनी तातडीने शायना एनसी यांना विधानभवनात बोलावून घेतले. त्यानुसार त्या विधानभवनात दाखल झाल्या असून या संपूर्ण प्रकरणावर पक्षश्रेष्ठी त्यांना काय समज देणार आणि शिवसेना अधिकृतपणे कोणती भूमिका मांडणार, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

nynavabharatnews.online

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??