सांगली जिल्हा बँकेवर तब्बल २२ वर्षांनंतर काँग्रेसचा झेंडा; महेंद्र आप्पा लाड अध्यक्ष, तर तानाजीराव पाटील उपाध्यक्षपदी बिनविरोध.
भाजपला सत्तेपासून रोखण्यात यश

सांगली जिल्हा बँकेवर तब्बल २२ वर्षांनंतर काँग्रेसचा झेंडा; महेंद्र आप्पा लाड अध्यक्ष , तर तानाजीराव पाटील उपाध्यक्षपदी बिनविरोध.
सांगली : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे ज्येष्ठ संचालक महेंद्र आप्पा लाड, तर उपाध्यक्षपदी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे तानाजीराव पाटील यांची बुधवारी बिनविरोध निवड झाली. या निवडीमुळे तब्बल २२ वर्षांनंतर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा बहुमान पुन्हा एकदा काँग्रेसकडे आला आहे. दुपारी तीन वाजता निवड जाहीर होताच बँकेच्या मुख्य कार्यालयाबाहेर काँग्रेस आणि शिवसेना कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी आणि मिठाईचे वाटप करत मोठा जल्लोष केला.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपनिबंधक सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी नूतन संचालक मंडळाची बैठक पार पडली. अध्यक्षपदासाठी महेंद्र लाड आणि उपाध्यक्षपदासाठी तानाजी पाटील यांचे प्रत्येकी एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे श्री. चव्हाण यांनी घोषित केले. या निवड प्रक्रियेला बँकेच्या २१ पैकी २० संचालकांनी हजेरी लावली. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे निवड प्रक्रियेवेळी गैरहजर राहिले, मात्र निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ते सभागृहात दाखल झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते व माजी मंत्री जयंत पाटील हे बाहेरगावी असल्याने निवडीच्या वेळी उपस्थित राहू शकले नाहीत.
जिल्ह्याच्या सहकार क्षेत्राचे प्रमुख सत्ताकेंद्र असलेल्या जिल्हा बँकेच्या २१ जागांच्या संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच पार पडली होती. यातील १५ जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या होत्या, तर उर्वरित ६ जागांसाठी थेट मतदान घेण्यात आले. अंतिम निकालानंतर महाविकास आघाडीकडे ११, तर महायुतीकडे १० संचालक असे पक्षीय बलाबल राहिले. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचे सर्वाधिक ६, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ५ संचालक निवडून आले होते. महायुतीमध्ये भाजपचे ५, शिंदे शिवसेनेचे ३ आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे २ संचालक आहेत. काँग्रेसचे संख्याबळ सर्वाधिक असल्याने अपेक्षाप्रमाणे अध्यक्षपदाचा बहुमान आमदार व माजी मंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या गटाचे विश्वासू महेंद्र आप्पा लाड यांना देण्यात आला.
निवडीपूर्वी बुधवारी सकाळी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या बंगल्यावर महाविकास आघाडी आणि महायुतीच्या संचालकांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत महायुतीकडून एक वर्षासाठी अध्यक्षपद मिळावे असा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. मात्र, महाविकास आघाडीने हा प्रस्ताव बाजूला ठेवत आपली रणनीती कायम ठेवली. या सकाळच्या बैठकीलाही आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी मंत्री अजितराव घोरपडे हे दोन्ही संचालक गैरहजर होते.
जिल्हा परिषदेच्या सत्तास्थापनेवेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शिंदे शिवसेनेला सोबत घेत भाजपला सत्तेपासून दूर ठेवले होते. तोच राजकीय फॉर्म्युला जिल्हा बँकेतही राबवण्यात आल्याचे या निवडीतून स्पष्ट झाले.
उपाध्यक्षपदी निवड झालेले तानाजीराव पाटील हे शिंदे शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांच्या गटाचे मानले जातात. दरम्यान, या निवड प्रक्रियेवेळी भाजप आमदार गोपीचंद पडळकर अनुपस्थित राहिल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत.



