नीट ,जेईई मध्ये आता लष्करी शिस्त,पेपरफुटी रोखण्यासाठी NTA चा मास्टरस्ट्रोक ; निवृत्त सैनिकांची असणार करडी नजर

नीट , जेईई मध्ये आता लष्करी शिस्त ,पेपरफुटी रोखण्यासाठी NTA चा मास्टरस्ट्रोक ; निवृत्त सैनिकांची असणार करडी नजर
नवी दिल्ली : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
स्थानिक हस्तक्षेपाला चाप: परीक्षा केंद्रांवर आता निवृत्त लष्करी आणि निमलष्करी अधिकाऱ्यांची नियुक्ती.
केंद्रांसाठी जाचक अटी: छोट्या आणि गैरसोयीच्या केंद्रांना चाळणी; ऑनलाइनसाठी २८५ संगणक सक्तीचे.
NTA चा थेट वॉच – निरीक्षक कोणत्याही स्थानिक अधिकाऱ्याला जुमानणार नाहीत, थेट दिल्लीला करणार रिपोर्टिंग.
वैद्यकीय आणि अभियांत्रिकी प्रवेशासाठी होणाऱ्या ‘नीट’ (NEET) आणि ‘जेईई’ (JEE) परीक्षा म्हणजे लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील आणि करिअरमधील सर्वात मोठा टप्पा. मात्र, गेल्या काही महिन्यांत उघडकीस आलेल्या पेपरफुटीच्या घटना आणि डमी विद्यार्थ्यांच्या सुळसुळाटाने या परीक्षांच्या पारदर्शकतेवरच मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आलेला संताप आणि देशभरात झालेली बदनामी यातून धडा घेत, राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (NTA) आता एक ऐतिहासिक आणि अत्यंत कडक पाऊल उचलले आहे. परीक्षा केंद्रांवरील गैरप्रकारांची पाळेमुळे खणून काढण्यासाठी आणि स्थानिक हस्तक्षेपाला कायमचा चाप लावण्यासाठी आता या परीक्षांवर थेट ‘निवृत्त सैनिकांची’ करडी नजर असणार आहे.
असा आहे NTA चा ‘मास्टरस्ट्रोक’
कोणत्याही परीक्षेतील गैरप्रकार बहुतांश वेळा स्थानिक पातळीवर किंवा परीक्षा केंद्राच्या संगनमताने होतात, असा आजवरचा अनुभव आहे. हीच साखळी तोडण्यासाठी एनटीएने थेट आणि स्वतंत्र निरीक्षकांची फौजच उभी करण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे देशभरातील सर्व परीक्षा केंद्रांवर निवृत्त लष्करी अधिकारी, निमलष्करी दलाचे जवान, तसेच केंद्र आणि राज्य शासनातील ‘वेतन स्तर आठ’च्या वरील निवृत्त अधिकाऱ्यांची ‘स्वतंत्र निरीक्षक’ म्हणून नियुक्ती केली जाईल. याशिवाय, सरकारी शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांतील कार्यरत किंवा निवृत्त प्राध्यापकांनाही या प्रक्रियेत सामावून घेतले जाणार आहे.
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, हे निरीक्षक परीक्षा केंद्रावरील कोणत्याही स्थानिक अधीक्षक, संस्थाचालक किंवा शहर समन्वयकाच्या दबावाखाली काम करणार नाहीत. ते थेट ‘एनटीए’चे प्रतिनिधी म्हणून काम पाहतील आणि केंद्रावरील प्रत्येक लहान-मोठ्या घडामोडीचा गोपनीय अहवाल थेट दिल्लीतील मुख्य कार्यालयाला देतील.
परदेशातही कडक नियम
भारताबाहेर ज्या देशांमध्ये या परीक्षा होतात, तिथेही हीच पारदर्शकता राखली जाणार आहे. परदेशातील परीक्षा केंद्रांवर स्थानिक पात्र भारतीय नागरिक किंवा थेट भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांची निरीक्षक म्हणून नेमणूक केली जाईल. या सर्व नियुक्त्या आयत्या वेळी धावपळ करून करण्याऐवजी, एनटीएने आधीच पडताळणी झालेली एक कायमस्वरूपी ‘पूल’ (निरीक्षकांची यादी) तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. यासाठी देशभरातील इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ६ डिसेंबर २०२६ पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत.
परीक्षा केंद्रांनाही ‘चाळणी’; अटी झाल्या कठोर
केवळ निरीक्षकांवर अवलंबून न राहता, एनटीएने परीक्षा केंद्रांच्या पायाभूत सुविधांचे नियमही अत्यंत कडक केले आहेत. आता गल्लीबोळातील किंवा अपुऱ्या सुविधा असलेल्या संस्थांना परीक्षा केंद्र म्हणून मान्यता मिळणे अशक्य होणार आहे. ऑनलाइन (CBT) परीक्षेसाठी केंद्रावर एकाच सत्रात राखीव यंत्रांसह किमान २८५ अद्ययावत संगणक असणे बंधनकारक आहे. तसेच, एकाच छताखाली ३०-३० संगणकांचे किमान चार स्वतंत्र लॅब (प्रयोगशाळा) असणे अनिवार्य करण्यात आले आहे. दुसरीकडे, ऑफलाईन (PPT) म्हणजेच पेन आणि पेपर पद्धतीच्या परीक्षेसाठी एका सत्रात किमान २५० विद्यार्थ्यांची आरामदायी बैठक व्यवस्था असावी लागेल. यासाठी प्रत्येकी ४० विद्यार्थ्यांची क्षमता असलेले किमान सहा मोठे परीक्षा हॉल केंद्रावर असणे सक्तीचे करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांचा गमावलेला विश्वास परत मिळवण्याचा प्रयत्न
‘नीट-युजी’ परीक्षेच्या पेपरफुटीमुळे देशभरात मोठा राजकीय आणि सामाजिक गदारोळ माजला होता. या सर्व प्रकारानंतर केंद्र सरकारने परीक्षा सुधारणांसाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली होती. आगामी २०२७ च्या परीक्षांच्या हंगामात कोणतीही चूक किंवा गैरप्रकार होऊ नये, यासाठी एनटीएने आतापासूनच कंबर कसली आहे. लष्करी शिस्तीत आणि निवृत्त अधिकाऱ्यांच्या कडक पहार्यात होणाऱ्या या परीक्षांमुळे हुशार आणि होतकरू विद्यार्थ्यांचे नुकसान टळेल आणि केवळ गुणवत्तेलाच न्याय मिळेल, अशी भक्कम आशा शिक्षण क्षेत्रासह पालकांमधूनही व्यक्त केली जात आहे.





