पन्हाळ्याच्या संजीवन विद्यानिकेतनचे मुख्याध्यापक के. के. पोवार ‘आदर्श शिक्षक’ पुरस्काराने सन्मानित

पन्हाळ्याच्या संजीवन विद्यानिकेतनचे मुख्याध्यापक के. के.पोवार आदर्श शिक्षक’ पुरस्काराने सन्मानित
कोल्हापूर : प्रसाद जाधव / एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
पन्हाळा येथील संजीवन विद्यानिकेतन या सुप्रसिद्ध निवासी प्रशालेचे मुख्याध्यापक के. के. पोवार यांना ‘आदर्श शिक्षक’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजशी संलग्न असलेल्या वरणगे पाडळी येथील ज्ञानमाऊली रोटरी ग्रामसेवा केंद्र या सामाजिक संस्थेच्या वतीने गुरुवारी, १२ नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित गुणगौरव सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कसबा बावडा येथील जिल्हा न्यायालयाजवळील रोटरी क्लब कोल्हापूर सनराईजच्या सभागृहात हा सोहळा पार पडला. रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजचे अध्यक्ष रोटेरियन योगेश रास्ते आणि सचिव विजय कुलकर्णी यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. समाजातील शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक कार्यात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सत्कार या संस्थेतर्फे दरवर्षी केला जातो. पोवार यांनी शिक्षण क्षेत्रात दिलेल्या तीन दशकांच्या योगदानाची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
के. के. पोवार हे मूळचे पन्हाळा तालुक्यातील पोहाळे या छोट्या गावातील आहेत. ग्रामीण भागातून येऊन त्यांनी शिक्षण क्षेत्रात केलेले हे काम अत्यंत प्रेरणादायी असल्याचे मान्यवरांनी यावेळी सांगितले. पोवार हे गेल्या तीस वर्षांपासून अध्यापन करत असून, ते हिंदी विषयाचे शिक्षक आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मार्च २००२ मधील दहावीच्या बोर्ड परीक्षेत एका विद्यार्थ्याने १०० पैकी ९३ गुण मिळवून कोल्हापूर विभागात हिंदी विषयात प्रथम क्रमांक मिळवला होता. याशिवाय, ते राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षा प्रक्रियेत नियामक म्हणूनही जबाबदारीने काम पाहतात.
पुरस्कार स्वीकारताना पोवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. हा आपला वैयक्तिक सत्कार नसून तो संजीवन ज्ञानसंकुलाचा सन्मान आहे, अशी कृतज्ञता त्यांनी यावेळी व्यक्त केली. या पुरस्काराबद्दल संजीवन संकुलाचे चेअरमन डॉ.पी. आर.भोसले, सहसचिव प्रा.एन.आर.भोसले आणि कार्यकारी संचालक सौरभ भोसले यांच्यासह सर्व विभागांचे प्राचार्य, शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी आणि पोहाळे गावच्या ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
या सोहळ्याचे प्रास्ताविक पोहाळे येथील नवनाथ हायस्कूलचे मुख्याध्यापक परशुराम आंबी यांनी केले. आभार मारुती आंबी यांनी मानले, तर सूत्रसंचालन के. के. चौगले यांनी केले. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर, रोटरी क्लबचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.




