ताज्या घडामोडीराजकीय

उत्तर प्रदेशात नवा भूकंप ! असदुद्दीन ओवैसी अन् चंद्रशेखर आझाद एकत्र , थेट मुख्यमंत्रीपदाची घोषणा

उत्तर प्रदेशात नवा भूकंप ! असदुद्दीन ओवैसी अन् चंद्रशेखर आझाद एकत्र, थेट मुख्यमंत्रीपदाची घोषणा

​लखनौ : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

उत्तर प्रदेशच्या राजकारणात एका नव्या समीकरणाचा उदय झाला असून यामुळे प्रस्थापित पक्षांचे धाबे दणाणले आहेत. एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी आणि आझाद समाज पक्षाचे नेते खासदार चंद्रशेखर आझाद यांनी हातमिळवणी करत नव्या आघाडीची घोषणा केली आहे. या आघाडीचे नाव ‘सामाजिक परिवर्तन मोर्चा’ असे ठेवण्यात आले असून, चंद्रशेखर आझाद हे या आघाडीकडून थेट मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील, अशी घोषणा ओवैसी यांनी केली. या एका घोषणेने उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत आता मोठी उलथापालथ पाहायला मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

​लखनौमध्ये झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत दोन्ही नेत्यांनी एकत्र येत ही माहिती दिली. वृत्तवाहिन्यांशी बोलताना असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, उत्तर प्रदेशातील गोरगरीब, मागास, दलित आणि अल्पसंख्याक समाजाला आजवर सर्वच पक्षांनी केवळ वापरून सोडले. या जनतेला त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी आणि भाजपचा पराभव करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. चंद्रशेखर आझाद हे तरुण, धडाडीचे नेते असून तेच या लढ्याचे नेतृत्व करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

​या वेळी चंद्रशेखर आझाद यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. काही राजकीय जाणकार याला ‘तिसरी आघाडी’ म्हणत आहेत, पण प्रत्यक्षात हा उत्तर प्रदेशातील सर्वसामान्य आणि पीडित जनतेचा ‘पहिला मोर्चा’ आहे, असे आझाद यांनी ठणकावून सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चालत आम्ही सत्ता मिळवण्यासाठी आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मैदानात उतरलो आहोत. ही आघाडी केवळ नावापुरती नसून संपूर्ण ताकदीने विधानसभेच्या जागा लढवणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

​सपा आणि काँग्रेसची डोकेदुखी वाढली

​टीव्ही मीडिया आणि राजकीय विश्लेषकांच्या मते, या नव्या युतीचा थेट फटका समाजवादी पक्ष आणि काँग्रेसला बसण्याची दाट शक्यता आहे. उत्तर प्रदेशात मुस्लिम आणि दलित मते ही नेहमीच भाजपविरोधी पक्षांची मोठी ताकद मानली गेली आहेत. मात्र, पश्चिम उत्तर प्रदेशासह अनेक भागांत चंद्रशेखर आझाद यांची तरुणांमध्ये मोठी क्रेझ आहे, तर ओवैसी यांचा मुस्लिम बहुल भागात चांगला प्रभाव आहे. त्यामुळे मतांचे विभाजन होऊन त्याचा थेट परिणाम मुख्य विरोधी पक्षांवर होऊ शकतो.

​दुसरीकडे, भाजपविरोधात लढण्यासाठी या आघाडीत आणखी काही लहान पक्षांना आणि सामाजिक संघटनांना सोबत घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. येत्या २६ नोव्हेंबर रोजी एका मोठ्या जाहीर सभेने या आघाडीच्या प्रचाराचा नारळ फुटणार आहे. या दोन आक्रमक नेत्यांच्या एकत्र येण्यामुळे उत्तर प्रदेशातील लढत आता अधिक चुरशीची आणि रंगतदार झाली आहे.

https://nynavabharatnews.online/

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??