मालवाहतूक वाहनांसाठी कोल्हापूर आरटीओकडून ‘MH-09-HK’ ही नवीन नोंदणी मालिका सुरू
७ सप्टेंबर रोजी पसंती क्रमांकाचे अर्ज स्वीकारणार; ८ सप्टेंबरला लिलाव प्रक्रिया

मालवाहतूक वाहनांसाठी कोल्हापूर आरटीओकडून ‘MH-09-HK’ ही नवीन नोंदणी मालिका सुरू
७ सप्टेंबर रोजी पसंती क्रमांकाचे अर्ज स्वीकारणार; ८ सप्टेंबरला लिलाव प्रक्रिया
कोल्हापूर : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ), कोल्हापूरमार्फत मालवाहतूक वाहनांसाठी सध्या सुरू असलेली जुनी नोंदणी मालिका ‘MH-०९-GJ’ लवकरच संपणार असून, त्याऐवजी ‘MH-०९-HK’ ही नवीन मालिका सुरू करण्यात येत आहे. या नवीन मालिकेतील कामकाजास येत्या सोमवार, दिनांक ७ सप्टेंबर २०२६ पासून प्रारंभ होत असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी प्रसिद्धी निवेदनाद्वारे दिली आहे.
नवीन मालिकेतील आकर्षक व पसंतीचे नोंदणी क्रमांक मिळवण्यासाठी वाहनधारकांचे अर्ज दिनांक ७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९.४५ ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत परिवहन विभागाच्या खिडकी क्रमांक २ येथे स्वीकारले जाणार आहेत.
पसंती क्रमांकासाठी महाराष्ट्र शासनाच्या ३० ऑगस्ट २०२४ च्या अधिसूचनेनुसार विहित शुल्काचा एकच डिमांड ड्राफ्ट जोडणे आवश्यक असून धनादेश किंवा पे-ऑर्डर स्वीकारली जाणार नाही. हा धनाकर्ष केवळ प्रादेशिक परिवहन अधिकारी कोल्हापूर (REGIONAL TRANSPORT OFFICE KOLHAPUR) या नावानेच काढलेला असावा. धनाकर्षाच्या मागे अर्जदाराचे नाव, वाहनाचा प्रकार, मागणी केलेला क्रमांक आणि आधार लिंक असलेला मोबाईल क्रमांक लिहिणे बंधनकारक आहे. ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.०० वाजल्यानंतर सिंगल डीडी व लिलावात गेलेल्या क्रमांकांची यादी कार्यालयात प्रसिद्ध केली जाईल.
एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्या क्रमांकाचा लिलाव केला जाईल. त्यासाठी अर्जदाराने ८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९.४५ ते दुपारी ३.३० या वेळेत जादा रकमेचा एकच स्वतंत्र डीडी बंद, अपारदर्शक पाकिटात जमा करावा लागेल. त्याच दिवशी दुपारी ४.३० वाजता कार्यालयाच्या सभागृहात प्रत्यक्ष लिलाव पार पडेल.
राखून ठेवलेला क्रमांक बदलून दिला जाणार नाही. क्रमांक आरक्षित केलेल्या दिनांकापासून १८० दिवसांच्या आत वाहन नोंदणी न केल्यास किंवा मालिका संपल्यास तो क्रमांक आपोआप रद्द होऊन भरलेले शुल्क सरकारजमा होईल. वाहनधारकांनी अर्जावर आधार संलग्न मोबाईल क्रमांक व पत्ता अचूक नमूद करावा, मोबाईल क्रमांक नसल्यास आकर्षक क्रमांकावरील हक्क राहणार नाही, असेही आरटीओ कार्यालयाने स्पष्ट केले आहे.




