शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून येणार का?’भाजप खासदार जनार्दन मिश्रांची जीभ घसरली

शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून येणार का ?’ ई-२० इंधनाच्या समर्थनावरून भाजप खासदार जनार्दन मिश्रांची जीभ घसरली
रीवा (मध्य प्रदेश) :एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिसळण्याच्या (ई-२०) केंद्र सरकारच्या धोरणावरून देशभरात चर्चा सुरू असतानाच भाजपच्या एका ज्येष्ठ खासदाराच्या वादग्रस्त विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. मध्य प्रदेशातील रीवा मतदारसंघाचे भाजप खासदार जनार्दन मिश्रा यांनी ई-२० इंधनाचे समर्थन करताना “शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून येणार आहे का?” असा थेट सवाल विरोधकांना विचारल्याने राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटत आहेत. मिश्रा यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून त्यांच्या भाषेवर सर्वस्तरातून जोरदार टीका होत आहे.
रीवा विमानतळावरून कोलकाता-रीवा-भोपाळ या नवीन विमानसेवेच्या शुभारंभ प्रसंगी आयोजित अधिकृत कार्यक्रमात खासदार जनार्दन मिश्रा बोलत होते. या मंचावर मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री राजेंद्र शुक्ला, मंत्री प्रतिभा बागरी आणि खासदार गणेश सिंह यांच्यासह अनेक प्रमुख नेते उपस्थित होते. भाषणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पायाभूत सोयी-सुविधांच्या विकासाचे कौतुक करताना मिश्रा यांनी इथेनॉल मिश्रणाच्या मुद्द्यावर भाष्य केले. आपल्या देशात केवळ २० टक्के कच्च्या तेलाचे उत्पादन होते आणि उरलेले ८० टक्के तेल परदेशातून आयात करावे लागते, असे त्यांनी स्पष्ट केले. आंतरराष्ट्रीय पातळीवरील युद्धजन्य परिस्थितीमुळे तेलवाहू जहाजांना तब्बल १८ हजार किलोमीटरचा अतिरिक्त वळसा घालून भारतात यावे लागत असल्याचे सांगत त्यांनी देशासमोरील इंधन पुरवठ्याचे आव्हान अधोरेखित केले.
या पार्श्वभूमीवर बोलताना खासदार मिश्रा यांची जीभ घसरली. पंतप्रधान मोदी यांनी पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिसळण्याचा निर्णय घेतला, तेव्हा काही लोक निष्कारण आंदोलन करत आहेत. इथेनॉल चालणार नाही, आम्हाला फक्त शुद्ध पेट्रोलच हवे, अशी मागणी केली जात आहे. पण देशात शुद्ध पेट्रोल उपलब्धच नसेल तर ते काय तुमच्या बापाच्या घरातून येणार आहे का, अशा आक्रमक शब्दांत त्यांनी टीकाकारांवर हल्लाबोल केला. देशामध्ये इथेनॉलची निर्मिती झाली नाही तर पेट्रोल आणि डिझेल आणायचे कुठून, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
इथेनॉल वापराचे समर्थन करताना जनार्दन मिश्रा यांनी ब्राझील देशाचे उदाहरण दिले. जगात सर्वाधिक इथेनॉलची निर्मिती ब्राझीलमध्ये होते आणि तेथील वाहने १०० टक्के इथेनॉलवर विनाअडथळा चालतात. भारतातील वाहनेही इथेनॉलमिश्रित इंधनावर चालण्यास पूर्णपणे सक्षम असून यामुळे इंजिनाचे कोणतेही नुकसान होत नाही, असा दावा करत त्यांनी ई-२० ला होणारा विरोध निरर्थक असल्याचे म्हटले.
खासदार मिश्रा यांच्या या विधानाचे राजकीय पडसाद लागलीच उमटू लागले आहेत. मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जितू पटवारी यांनी मिश्रा यांच्या विधानाचा तीव्र शब्दांत समाचार घेतला आहे. लोकशाहीत नागरिकांनी किंवा विरोधकांनी ई-२० इंधनामुळे वाहनांवर होणाऱ्या परिणामांविषयी प्रश्न विचारले, तर उत्तर देण्याऐवजी भाजप लोकप्रतिनिधी अशी अपमानास्पद भाषा वापरत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून देशभरात ई-२० इंधनाच्या वापरावरून वाहनधारकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. विशेषतः जुन्या वाहनांच्या इंजिनवर याचा परिणाम होत असल्याचे आणि मायलेज घटत असल्याचे दावे केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर जनप्रतिनिधीने शंकांचे निरसन करण्याऐवजी बेताल वक्तव्य केल्याने सर्वसामान्य वाहनधारकांमधूनही संताप व्यक्त केला जात आहे. जनार्दन मिश्रा हे याआधीही आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आले असून, या ताज्या प्रकरणामुळे पक्षाची कोंडी झाली आहे.




