क्राईम न्युजताज्या घडामोडीमहाराष्ट्र

लोहगड हत्या प्रकरण : केतन अगरवालच्या खुनाचा पूर्वनियोजित कट; ७९ दिवसांनंतर तिसऱ्या संशयिताला अटक 

लोहगड हत्या प्रकरण : केतन अगरवालच्या खुनाचा पूर्वनियोजित कट; ७९ दिवसांनंतर तिसऱ्या संशयिताला अटक 

पुणे : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

लोणावळ्याजवळील ऐतिहासिक लोहगड किल्ल्यावरून खोल दरीत ढकलून करण्यात आलेल्या पुण्यातील युवा बांधकाम व्यावसायिक केतन अगरवाल हत्याकांडाला ७९ दिवसांनंतर नवे वळण मिळाले आहे. या गुन्ह्यातील मूळ कटाची पूर्ण कल्पना असणे, कटात सहभाग नोंदवणे आणि गुन्ह्यानंतरचे डिजिटल पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून पुणे ग्रामीण पोलिसांनी रितेश हांगे (वय २२) या तिसऱ्या संशयित आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. वडगाव मावळ न्यायालयाने आरोपीला १२ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

 ​पुण्यातील ‘सक्सेस ग्रुप’ या नामांकित रिअल इस्टेट कंपनीचा संचालक असलेला २६ वर्षीय केतन अगरवाल याचा विवाह सिया गोयल (वय २०) हिच्यासोबत ठरला होता. कुटुंबीयांच्या संमतीने दोघांचा साखरपुडा झाल्यानंतर नोव्हेंबर महिन्यात विवाह सोहळा पार पडणार होता. दरम्यान, १८ जून रोजी लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगदरम्यान कड्यावरून पाय घसरून केतनचा सुमारे ३५० ते ४०० फूट खोल दरीत पडून मृत्यू झाल्याची माहिती सियाने पोलिसांना दिली होती. सुरुवातीला हा केवळ एक दुर्दैवी अपघात असल्याचा बनाव सिया आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी (वय २२) यांनी रचला होता. मात्र, अगरवाल कुटुंबीयांनी उपस्थित केलेल्या संशयानंतर गडावरील सीसीटीव्ही चित्रीकरण, आरोपींच्या हालचाली आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी या बनावाचा पर्दाफाश केला. प्रेमसंबंधातील अडथळा दूर करण्यासाठीच केतनला पूर्वनियोजित कटानुसार ढकलून दिल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी सिया आणि चेतन या दोघांना २३ जून रोजी अटक केली होती. हे दोन्ही मुख्य आरोपी सध्या येरवडा मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत.

 ​या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असताना पुणे ग्रामीण सायबर शाखेने मुख्य संशयित चेतन चौधरी याच्या जप्त केलेल्या मोबाईल फॉरेन्सिक विश्लेषणासाठी पाठवला होता. तांत्रिक तपासणीत आरोपींनी व्हॉट्सॲप चॅट्स आणि कॉलिंग डेटा नष्ट केल्याचे समोर आले. सायबर तज्ज्ञांनी हे डिलीट केलेले संभाषण पुन्हा मिळवले असता, त्यातून चेतनचा महाविद्यालयीन वर्गमित्र असलेल्या रितेश हांगे याचे नाव निष्पन्न झाले. मूळचा बीड जिल्ह्यातील असलेला रितेश सध्या पुण्यातील बालेवाडी परिसरात एका खासगी कंपनीत नोकरी करत होता.

 ​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केतनच्या हत्येचा कट अचानक रचला गेला नव्हता, तर अनेक दिवसांपासून त्याचे नियोजन सुरू होते. सुरुवातीला केतनचे हातपाय मोडून त्याला गंभीर जखमी करायचे, जेणेकरून नियोजित विवाह लांबणीवर पडेल, असा प्राथमिक बेत आरोपींनी आखला होता. मात्र, हा प्रकार उघडकीस येण्याची भीती वाटल्याने त्यांनी थेट अपघाताचा आभास निर्माण करत त्याला कायमचे संपवण्याचा कट रचला. यासाठी टायगर पॉईंट, विसापूर किल्ला आणि लोहगड अशा विविध ठिकाणांची चाचपणी करण्यात आली होती. या संपूर्ण योजनेची रितेशला इत्यंभूत कल्पना होती आणि त्याने याबाबत चेतनशी सविस्तर चर्चाही केली होती, असा पोलिसांचा दावा आहे.

 ​१८ जून रोजी घटनेच्या दिवशी आरोपींनी रितेशलाही लोहगडावर सोबत येण्यास सांगितले होते; परंतु त्याने प्रत्यक्ष घटनास्थळी जाणे टाळले. गुन्हा घडल्यानंतर मुख्य आरोपी चेतनने तातडीने रितेशशी संपर्क साधून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली होती आणि त्यानंतर दोघांची प्रत्यक्ष भेटही झाली होती. संशयाची सुई वळू नये म्हणून आरोपींनी एकमेकांशी झालेले संवाद नष्ट केले होते. गंभीर गुन्ह्याची पूर्वकल्पना असूनही ती पोलिसांपासून लपवून ठेवणे, कटात सहभाग असणे आणि डिजिटल पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी रितेशवर भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलम ६१ (गुन्हेगारी कट) अन्वये गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली.

 ​पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक आता घटनाक्रमाची पुनर्रचना करत आहे. गुन्ह्याच्या दिवशी रितेशचे तांत्रिक लोकेशन, टॉवर डम्प डेटा आणि त्याने मुख्य आरोपींना कोणती मदत पुरवली होती का, या दिशेने कसून चौकशी सुरू आहे. फॉरेन्सिक तपासणीतून समोर आलेले डिजिटल पुरावे या खटल्यात पोलिसांची बाजू भक्कम करण्यासाठी अत्यंत निर्णायक ठरणार असून, न्यायालयीन कोठडीत असलेल्या मुख्य आरोपींची रितेशसोबत समोरासमोर बसवून चौकशी केली जाण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी वर्तवली आहे.

https://nynavabharatnews.online/

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??