आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली लिंगायत समाजाची अभूतपूर्व एकजूट; ९ ऑगस्टच्या निर्णायक लढ्याचे धरणगुत्तीत रणशिंग फुंकले

गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली लिंगायत समाजाची अभूतपूर्व एकजूट; ९ ऑगस्टच्या निर्णायक लढ्याचे धरणगुत्तीत रणशिंग फुंकले

शिरोळ :एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

जगतज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळामध्ये लिंगायत समाजातील सर्व घटकांचा समावेश करून महामंडळ अधिक सक्षम करावे, त्यासाठी किमान एक हजार कोटी रुपयांची तरतूद करावी, तसेच महामंडळातील विद्यमान त्रुटी दूर कराव्यात, या प्रमुख मागण्यांसाठी ९ ऑगस्ट रोजी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होणाऱ्या बेमुदत साखळी उपोषणाच्या पार्श्वभूमीवर धरणगुत्ती येथे लिंगायत समाजाचे ज्येष्ठ नेते गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीत समाजातील सर्व घटकांनी एकसंघ राहून आंदोलन यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी श्री दत्त सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील होते. प्रारंभी शेखर पाटील यांनी स्वागत करून आंदोलनाची भूमिका स्पष्ट करणारे प्रास्ताविक केले.

या बैठकीस स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, इचलकरंजी महानगरपालिकेचे नगरसेवक संजय तेलनाडे, जिल्हा परिषद सदस्य *प्रशांत शहापूरे* यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि लिंगायत समाजातील विविध घटक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राजेंद्र पिंपळे, बी. एस. पाटील, कॉ. आप्पा पाटील, नितीन पाटील, उदय पाटील आणि सुरेश पाटील यांनी आपल्या मनोगतात समाजाच्या प्रश्नांसाठी एकदिलाने उभे राहण्याचे आवाहन केले.यावेळी धनगर समाजाचे नेते अशोक कोळेकर आणि शिरोळचे उपनगराध्यक्ष पृथ्वीराज यादव यांनी लिंगायत समाजाच्या बेमुदत साखळी उपोषणाला जाहीर पाठिंबा देत न्यायाच्या लढ्यात आपण खंबीरपणे सहभागी राहणार असल्याचे सांगितले.

सरला पाटील यांनी लिंगायत धर्माची वैचारिक परंपरा आणि सामाजिक योगदान याविषयी मार्गदर्शन केले. रजनी मगदूम यांनी समाजाच्या मागण्या पूर्णपणे न्याय्य असून शासनाने त्या तातडीने मान्य कराव्यात, अशी भूमिका मांडली.

नगरसेवक संजय तेलनाडे यांनी जगतज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची स्थापना, त्यामागील उद्दिष्टे आणि त्यातील त्रुटींची सविस्तर माहिती दिली. महामंडळ प्रभावी करण्यासाठी आवश्यक सुधारणा तातडीने करण्यात याव्यात, अशी मागणी करत ९ ऑगस्ट रोजी समाजातील सर्व घटकांनी मोठ्या संख्येने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले.

जिल्हा परिषद सदस्य *प्रशांत शहापूरे* यांनी समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी गट-तट विसरून एकसंघ राहण्याची गरज अधोरेखित केली. समाजातील प्रत्येक घटकाला समान न्याय मिळाला पाहिजे. संघटित समाजच आपले प्रश्न प्रभावीपणे सोडवू शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले.

प्रमुख मार्गदर्शन करताना गणपतराव पाटील यांनी महामंडळाच्या स्थापनेपासून आजपर्यंतचा प्रवास, त्यामागील उद्दिष्टे आणि सध्याच्या त्रुटींचा सखोल आढावा घेतला. महामंडळासाठी *किमान एक हजार कोटी रुपयांची आर्थिक तरतूद* करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी त्यांनी केली. या निधीमुळे शेतकरी, विद्यार्थी, गृहिणी, व्यापारी आणि समाजातील सर्व घटकांना विकासाच्या नव्या संधी उपलब्ध होतील, असे त्यांनी सांगितले.तसेच महामंडळासाठी कायमस्वरूपी आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी, जेणेकरून समाजाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होईल आणि शासनस्तरावर समाजाच्या मागण्यांना गती मिळेल, अशी मागणी त्यांनी केली. वीरशैव आणि लिंगायत असा कोणताही भेद न करता लिंगायत समाजातील सर्व घटकांचा महामंडळात समावेश करण्यात यावा*, ही समाजाची प्रमुख मागणी असल्याचे त्यांनी ठामपणे नमूद केले.

“समाजाच्या प्रत्येक विधायक कार्यात मी सदैव सहभागी राहीन. समाजासाठी प्रामाणिकपणे काम करणारे संजय तेलनाडे, प्रशांत शहापूरे, राजेंद्र पिंपळे, बी. एस. पाटील यांच्यासारखे कार्यकर्ते ही समाजाची मोठी ताकद आहे. समाजहितासाठी लागेल ती मदत करण्यास मी कायम तयार आहे,” असे गणपतराव पाटील यांनी सांगितले.

राजू शेट्टी यांनी शासनाच्या धोरणांतील त्रुटींवर भाष्य करत लिंगायत समाजाच्या मागण्या पूर्णपणे न्याय्य असल्याचे सांगितले. या मागण्यांसाठी शासनाकडे प्रभावीपणे पाठपुरावा करून न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असे आश्वासन त्यांनी दिले.अमोल चौगुले* यांनी आभार मानले.

यावेळी दरगू गावडे, पंकज गुरव, दीपक परीट, राजशेखर तंबाखे, स्मिता तेलनाडे, सुनील गोटखिंडे, संतोष जाधव, युनूस डांगे, चंद्रकांत जाधव, गुंडाप्पा पवार, सरदार कारंडे, सुदर्शन कदम, रवींद्र चौगुले, गजानन चौगुले, नितीन बागे, महेश परीट, नीलम म्हेत्रे यांच्यासह समाजातील विविध घटकांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीच्या शेवटी ९ ऑगस्ट रोजी होणारे बेमुदत साखळी उपोषण ऐतिहासिक, शिस्तबद्ध आणि अभूतपूर्व करण्याचा एकमुखी निर्धार करण्यात आला.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??