आपला जिल्हाताज्या घडामोडीराजकीय

शंभर ई-बसेसमुळे केएमटीची आर्थिक कोंडी फुटणार; खासदार धनंजय महाडिक यांचा विश्वास

शंभर ई-बसेसमुळे केएमटीची आर्थिक कोंडी फुटणार; खासदार धनंजय महाडिक यांचा विश्वास

​कोल्हापूर :एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

केंद्र शासनाच्या पीएम ई-बस सेवा योजनेअंतर्गत कोल्हापूर महानगर परिवहनला (केएमटी) मंजूर झालेल्या शंभर वातानुकूलित आणि पर्यावरणपूरक ई-बसेसमुळे शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला मोठी बळकटी मिळणार आहे. तसेच यामुळे गेले अनेक दिवस डबघाईला आलेली केएमटीची आर्थिक घडी सावरण्यास मोठी मदत होईल, असा ठाम विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी शनिवारी व्यक्त केला. पहिल्या टप्प्यात दाखल झालेल्या दहा ई-बसेसची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी त्यांनी विरोधकांवरही जोरदार टीकास्त्र सोडले.

 ​केंद्र सरकारच्या माध्यमातून मंजूर झालेल्या शंभर ई-बसेसपैकी पहिल्या टप्प्यातील दहा अत्याधुनिक बसेस कोल्हापुरात दाखल झाल्या आहेत. उर्वरित सर्व बसेस येत्या ऑगस्ट महिन्याअखेरपर्यंत शहरात दाखल होतील, अशी माहिती देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर खासदार धनंजय महाडिक यांनी शनिवारी केएमटीच्या शास्त्रीनगर येथील कार्यशाळेला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी नव्याने दाखल झालेल्या वातानुकूलित बसेसची, बुद्ध गार्डन येथे उभारण्यात येत असलेल्या चार्जिंग स्टेशनची, डेपोची आणि प्रशासकीय कार्यालयाची सविस्तर पाहणी केली. पाहणीनंतर खासदार महाडिक यांनी स्वतः या नव्या ई-बसमधून उपस्थित पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांसमवेत प्रतीकात्मक प्रवास करून बसमधील आधुनिक सुविधांचा आढावा घेतला. तसेच ई-बस चालकांसाठी कार्यशाळेत एक सुसज्ज विश्रांतीगृह उभारण्याची अत्यंत महत्त्वाची सूचनाही त्यांनी प्रशासनाला केली.

 ​यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना खासदार महाडिक म्हणाले की, कोल्हापूरकरांना आधुनिक, सुरक्षित आणि दर्जेदार सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता. सुरुवातीला लोकसंख्येच्या निकषानुसार पन्नास बसेस मिळणे अपेक्षित होते, मात्र शहराचा वाढता विस्तार आणि नागरिकांची गरज लक्षात घेऊन आपण शंभर बसेससाठी आग्रही राहिलो. या प्रयत्नांना यश येऊन शहराला प्रथमच शंभर ई-बसेस मंजूर झाल्या आहेत. विशेष म्हणजे, या संपूर्ण बससेवेसाठी आणि चार्जिंग स्टेशनसारख्या पायाभूत सुविधांसाठी केंद्र शासनाने शंभर टक्के निधी उपलब्ध करून दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रदूषणमुक्त आणि शाश्वत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला प्राधान्य दिल्यामुळेच देशभरात या ई-बस सेवेला मोठी चालना मिळत आहे. या सर्व बसेस ताफ्यात दाखल झाल्यानंतर केएमटीची सेवा अधिक सक्षम होईल आणि उत्पन्नात वाढ होऊन आर्थिक स्थितीतही सकारात्मक बदल घडेल. केएमटी प्रशासनाने आता योग्य वेळापत्रक तयार करून प्रवाशांना वेळेवर व दर्जेदार सेवा देण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करावेत, असे निर्देशही त्यांनी दिले.

 ​नव्या बसेसच्या मंजुरीवरून विरोधकांकडून करण्यात आलेल्या टीकेचा समाचार घेताना महाडिक यांनी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्यावर थेट निशाणा साधला. ते म्हणाले की, शंभर ई-बसेस मंजूर झाल्यानंतर काहींनी त्याबाबत जाणीवपूर्वक शंका उपस्थित करत खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला होता. काहींनी तर केवळ तीन बसेस आणून मोठा डांगोरा पिटला होता, मात्र आम्ही शंभर बसेस आणण्याचे जे आश्वासन दिले होते, त्याची प्रत्यक्ष पूर्तता करून दाखविली आहे. केवळ आश्वासने न देता ती प्रत्यक्षात पूर्ण करून दाखविणे हीच आमची खरी कार्यपद्धती असल्याचे आता सिद्ध झाले आहे, असा सणसणीत टोला त्यांनी लगावला.

 ​शहरातील सांस्कृतिक वैभवाचा मानबिंदू असलेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाच्या नूतनीकरण आणि व्यवस्थापनासंदर्भातही त्यांनी यावेळी भाष्य केले. या नाट्यगृहाचे कोणत्याही परिस्थितीत खाजगीकरण होणार नसल्याचे त्यांनी अत्यंत स्पष्ट शब्दांत सांगितले. त्यामुळे रंगकर्मी, कलाकार आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मंडळींनी याबाबत कोणतीही चिंता करू नये. उलट या वास्तूच्या संवर्धनासाठी आणि दर्जेदार सुविधांसाठी ज्या काही आवश्यक सूचना असतील, त्या प्रशासनाकडे द्याव्यात, असे खुले आवाहनही महाडिक यांनी यावेळी केले.

​या कार्यक्रमादरम्यान परिवहन समितीचे सदस्य हेमंत आराध्ये यांनी केएमटीच्या आधुनिकीकरणासाठी काही महत्त्वपूर्ण मागण्या मांडल्या. इंटेलिजंट ट्रान्स्पोर्ट मॅनेजमेंट सिस्टीम (आयटीएमएस) कार्यान्वित करण्यासाठी आठ कोटी रुपयांचा निधी तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली. या सिस्टीममुळे प्रवाशांना तिकीटलेस आणि कॅशलेस प्रवासाची सुविधा तसेच बसचे लाईव्ह लोकेशन ॲपवर पाहता येणार आहे. यासोबतच गृह विभागाकडे प्रलंबित असलेले केएमटीचे दोन कोटी रुपये मंजूर करून देण्यासाठीही खासदारांनी शासनाकडे पाठपुरावा करावा, अशी विनंती आराध्ये यांनी केली.

 ​या पाहणी दौऱ्याप्रसंगी महापौर रूपाराणी निकम, महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, परिवहन समिती सभापती सत्यजीत जाधव, भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव, महेश जाधव, राहुल चिकोडे, उपायुक्त परितोष कंकाळ यांच्यासह महापालिकेचे नगरसेवक, परिवहन विभागाचे सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://nynavabharatnews.online/

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??