आरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीमहाराष्ट्र

क्लस्टर व्हॉलीबॉल स्पर्धेत ‘संजीवन’ अजिंक्य

राष्ट्रीय स्पर्धेसाठी संघाची निवड

क्लस्टर व्हॉलीबॉल स्पर्धेत संजीवन अजिंक्य ; राष्ट्रीय स्पर्धेसाठी संघाची निवड

पन्हाळा : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे पार पडलेल्या सीबीएसई महाराष्ट्र क्लस्टर व्हॉलीबॉल स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलांच्या गटात संजीवन पब्लिक स्कूल, पन्हाळा यांच्या संघाने शानदार कामगिरी करत अजिंक्यपद पटकावले. स्पर्धेतील प्रत्येक सामन्यात दमदार खेळाचे प्रदर्शन करत संजीवनच्या संघाने विजेतेपदावर आपले नाव कोरले. या यशामुळे संघाची हिमाचल प्रदेशातील कसौली येथे ३० सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या सीबीएसई राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

महाराष्ट्रातील विविध भागांतील नामांकित सीबीएसई शाळांचे एकूण ३६ संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते. सुरुवातीपासूनच संजीवनच्या खेळाडूंनी उत्कृष्ट समन्वय, वेगवान आक्रमण आणि भक्कम बचावाच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व राखले. साखळी फेरीतील पाचही सामने जिंकत संघाने बाद फेरीत दिमाखात प्रवेश केला आणि विजेतेपदाचा दावेदार असल्याचे सिद्ध केले.उपांत्यपूर्व फेरीत संजीवनच्या संघासमोर पंढरपूरचा संघ होता. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यात संजीवनने २-१ अशा सेटने विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली. त्यानंतर उपांत्य सामन्यात नाशिक-मालेगावच्या संघासमोर संजीवनच्या खेळाडूंनी एकतर्फी वर्चस्व राखले. २५-१६ आणि २५-१७ अशा सरळ दोन सेटमध्ये विजय मिळवत संघाने अंतिम फेरीत प्रवेश निश्चित केला.

अंतिम सामन्यात नागपूरच्या ऑरेंज सिटी स्कूलचा सामना संजीवनसमोर होता. अंतिम लढतीतही संजीवनच्या खेळाडूंनी संयमी आणि आक्रमक खेळाचे दर्शन घडवत २५-१७ आणि २५-१८ अशा सरळ दोन सेटमध्ये विजय मिळवला. या विजयासह संजीवन पब्लिक स्कूलने महाराष्ट्र क्लस्टर स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावत संपूर्ण स्पर्धेत आपला दबदबा कायम राखला.

संजीवनच्या या यशस्वी संघात कर्णधार संचित डोंगळे याच्यासह समर्थ ढोक, ओम साळसकर, कार्तिक कौशल्य, विवेक प्रक्षाळे, अर्जुन पाटील, विनायक शेळके, अर्जुन काशीद, प्रज्वल शिंदे, कृष्णा कदम, कृष्णा पवार आणि भरत गुत्तेदार या खेळाडूंचा समावेश आहे. सर्व खेळाडूंनी संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट सांघिक खेळ करत प्रत्येक सामन्यात विजयाची मालिका कायम राखली.

संघाच्या या यशामागे क्रीडाशिक्षक प्रकाश जाधोर यांचे नियोजन, प्रशिक्षक अबिद मोकाशी, कपिल खोत, नूरमंहम्मद नगारजी, नचिकेत जाधव, गजानन माळवी आणि संदीप जाधव यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन लाभले. तसेच संस्थापक डॉ.पी.आर.भोसले, सहसचिव एन.आर.भोसले, क्रीडा संचालक सौरभ भोसले आणि प्राचार्य बी.आर.बेलेकर यांनी खेळाडूंना वेळोवेळी दिलेल्या प्रोत्साहनामुळे संघाला ही उल्लेखनीय कामगिरी करता आली.

राज्यस्तरीय विजेतेपदाच्या या यशामुळे संजीवन पब्लिक स्कूलच्या क्रीडा परंपरेत आणखी एका मानाच्या शिरपेचाची भर पडली असून आता हिमाचल प्रदेशातील राष्ट्रीय स्पर्धेतही संघाकडून दमदार कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे

https://nynavabharatnews.online/

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??