ताज्या घडामोडी

काव्याची परिपक्वता जपत डॉ. विजयकुमार माने यांनी गझलतंत्र लीलया पेलले : डॉ. दिलीप कुलकर्णी

​मिरजेत 'गझल ओनामा' गझलसंग्रहाचा प्रकाशन सोहळा आणि कविसंमेलन उत्साहात संपन्न

काव्याची परिपक्वता जपत डॉ. विजयकुमार माने यांनी गझलतंत्र लीलया पेलले : डॉ. दिलीप कुलकर्णी

​मिरजेत ‘गझल ओनामा’ गझलसंग्रहाचा प्रकाशन सोहळा आणि कविसंमेलन उत्साहात संपन्न

​मिरज : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

डॉ. विजयकुमार स. माने हे मूळचे संवेदनशील कवी आहेत. काव्याची परिपक्वता, आंतरिक भाव आणि गेयता टिकवून ठेवत त्यांनी गझलचे नियम व तंत्र अत्यंत लीलया आत्मसात केले आहे. त्यांचे शेर काळजाचा ठाव घेणारे आहेत, असे गौरवद्गार ज्येष्ठ कवी व गझलकार डॉ. दिलीप कुलकर्णी यांनी काढले.

​येथील प्रसिद्ध गझलकार डॉ. विजयकुमार स. माने यांच्या बहुचर्चित गझल ओनामा या पहिल्या गझलसंग्रहाचा प्रकाशन सोहळा शब्दांगण साहित्यिक व सांस्कृतिक व्यासपीठ, मिरज आणि बायसिंगर मेमोरियल लायब्ररी, मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या उत्साहात व साहित्यिक वातावरणात पार पडला. त्यावेळी डॉ. कुलकर्णी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ गझलकार सुधाकर इनामदार होते, तर ज्येष्ठ कवी भीमराव धुळुबुळू यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.

​कार्यक्रमाची सुरवात डॉ. अनिता नातू यांच्या भावपूर्ण गणेशवंदनेने झाली. यानंतर डॉ. चिदानंद चिवटे आणि अर्जुन लोंढे यांनी डॉ. माने यांच्या निवडक गझलांचे सुश्राव्य गायन सादर करून संपूर्ण सभागृहाला मंत्रमुग्ध केले. त्यांच्या सुरेल सादरीकरणाला उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात भरभरून दाद दिली.

​गझलसंग्रहाचा विस्तृत आढावा घेताना डॉ. दिलीप कुलकर्णी यांनी संग्रहातील वैशिष्ट्यपूर्ण शेरांचे दाखले देत विवेचन केले. वैद्यकीय पेशात राहूनही शब्दांवर असलेले डॉ. माने यांचे प्रभुत्व थक्क करणारे असल्याचे त्यांनी नमूद केले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना सुधाकर इनामदार यांनी कविता आणि गझल यातील तांत्रिक तसेच भावनिक भेद श्रोत्यांसमोर सहजसोप्या भाषेत उलगडून दाखवला. गझलमध्ये वृत्ताचे भान, रदीफ आणि काफि यांची अचूक जुळणी किती महत्त्वाची असते हे सांगत, गझल ओनामा हा गझल विश्वात एक आश्वासक पाऊल ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रमुख पाहुणे भीमराव धुळुबुळू यांनी रुग्णसेवेच्या धबडग्यातून वेळ काढून निरंतर साहित्यसाधना करणाऱ्या डॉ. माने यांच्या लेखणीचे आणि चिकाटीचे मनापासून कौतुक केले.

​पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यानंतर गझलकार वैभव चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली भव्य कवी संमेलन पार पडले. या संमेलनात विविध विषयांवरील गझला व कवितांनी मैफल चांगलीच रंगली. कवी संमेलनात अविनाश सगरे, आनंदराव जाधव, विनायक कुलकर्णी, डॉ. स्वाती पाटील, नंदिनी पाटील, गजानन पाटील, नीता शिराळकर, हेमंत भुरके, सरिता चौगुले, भाग्यश्री पाटील, विशाल कुरणे, आलताब मुजावर, संजय पाटील, प्रकाश वायदंडे, डॉ. प्रिया पाटील, अनिल पाटील, शंकर भजनावळे, ऋषिकेश इंगळे, विलास संकपाळ यांच्यासह तब्बल २२ कवींनी आपल्या दर्जेदार रचना सादर केल्या. संमेलनाध्यक्ष वैभव चौगुले यांनी सादर केलेल्या प्रभावी रचनांनी रसिकांची मने जिंकली.

​या साहित्यिक सोहळ्यास ज्येष्ठ साहित्यिक सुनील इनामदार, आनंदहरी, अंजली गोखले, डॉ.राजश्री पाटील, ईश्वर रायण्णावर, मेहबूब जमादार यांच्यासह मिरज व परिसरातील नामवंत डॉक्टर, अभियंते, पत्रकार, शिक्षक, चित्रकार, विधीज्ञ, व्यावसायिक आणि साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नेटके आणि ओघवते सूत्रसंचालन वैष्णवी जाधव यांनी केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सुरेख संयोजन डॉ. शैलजा माने व चित्रकार अनिल दबडे यांनी केले होते. शेवटी सामूहिक पसायदानाने या दिमाखदार सोहळ्याची सांगता झाली.

https://nynavabharatnews.online/

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??