वाघबीळ घाटात खड्ड्यांचे साम्राज्य ; चिखल आणि निसरड्या रस्त्यामुळे वाहनधारक मेटाकुटीला महामार्गाचे काम रखडल्याने अपघाताची टांगती तलवार
दिशादर्शक व रिफ्लेक्टर्सचा अभाव ; मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी उपाययोजना करण्याची मागणी


दिशादर्शक व रिफ्लेक्टर्सचा अभाव; मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी उपाययोजना करण्याची मागणी
पन्हाळा : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क (विशेष प्रतिनिधी )
पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर सध्या प्रवाशांना आणि वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. विशेषतः वाघबीळ घाट परिसरामध्ये महामार्गाचे काम दीर्घकाळापासून रखडल्याने आणि पावसाच्या पाण्यामुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. नियोजित वेळापत्रकानुसार जून महिन्यात पूर्ण होणे अपेक्षित असलेले हे काम अद्यापही अपूर्ण अवस्थेत पडून आहे. परिणामी, या संपूर्ण घाट मार्गावर रस्त्यात खड्डे की खड्ड्यांत रस्ता अशी विदारक स्थिती निर्माण झाली असून ऐन पावसाळ्यात वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
महामार्गाच्या चौपदरीकरण व पुलाच्या बांधकामासाठी वापरण्यात येणारे जड वाहतुकीचे ट्रक, डंपर आणि इतर यंत्रसामग्री मातीच्या भरावातून ये-जा करताना त्यांच्या चाकांसोबत मोठ्या प्रमाणात लाल मऊ माती डांबरी रस्त्यावर पसरत आहे. सतत सुरू असणाऱ्या पावसामुळे या मातीचे रूपांतर गुळगुळीत चिखलात झाले असून संपूर्ण रस्ता प्रचंड निसरडा बनला आहे. याचा सर्वाधिक फटका दुचाकीस्वारांना बसत असून दररोज अनेक दुचाकी घसरून लहान-मोठे अपघात घडत आहेत. बांधकाम करताना रस्त्यावर पडणारा चिखल तातडीने बाजूला करण्याची किंवा रस्ता स्वच्छ ठेवण्याची कोणतीही खबरदारी संबंधित ठेकेदाराकडून घेतली जात नसल्याने वाहनधारकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
घाटाच्या सुरुवातीलाच एका पुलाखालून वाहतूक तात्पुरत्या स्वरूपात वळवण्यात आली आहे. मात्र, या वळणावर डांबरी रस्त्याची एक बाजू मोठ्या प्रमाणावर खचून खोल खड्डा पडला आहे. परिणामी, अवजड वाहने आणि प्रवासी बस या खड्ड्यात अडकून पडत असल्याने वारंवार वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत आहे. त्याहून अधिक गंभीर बाब म्हणजे, या अत्यंत धोकादायक वळणावर रात्रीच्या अंधारात वाहनचालकांना मार्गदर्शन करण्यासाठी कोणतेही रिफ्लेक्टर्स, रेडियम पट्टे, ब्लिंकर्स अथवा धोक्याची सूचना देणारे फलक लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे रात्रीच्या वेळी समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज न आल्याने वाहने समोरासमोर येऊन भीषण अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.

जून महिन्याची मुदत उलटून गेल्यानंतरही संथ गतीने चाललेले काम आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हजारो प्रवाशांचे प्राण टांगणीला लागले आहेत. एखादी भयानक दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल प्रवासी विचारत आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, संबंधित प्रशासकीय अधिकारी आणि कंत्राटदार यांनी तात्काळ संयुक्त पाहणी करून रस्त्यावरील धोकादायक खड्डे बुजवावेत, निसरडा चिखल हटवून रस्ता वाहतूकयोग्य करावा तसेच वळणांवर आवश्यक दिशादर्शक व रिफ्लेक्टर्स बसवावेत, अशी आग्रही मागणी भयभीत झालेल्या वाहनधारकांनी व स्थानिक नागरिकांनी केली आहे




