कृषी व व्यापारताज्या घडामोडीदेश विदेश

बजेट क्रॅश! स्मार्टफोन मार्केटमध्ये किमतींचा ब्लास्ट; सॅमसंगपासून रिअलमीपर्यंत सर्वच ब्रँड्सचे फोन्स झाले भलतेच महाग

बजेट क्रॅश ! स्मार्टफोन मार्केटमध्ये किमतींचा ब्लास्ट; सॅमसंगपासून रिअलमीपर्यंत सर्वच ब्रँड्सचे फोन्स झाले भलतेच महाग – जाणून घ्या नेमकं काय घडलंय ?

टेक न्यूज :एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

जर तुम्ही आगामी सणासुदीच्या काळात किंवा कॉलेजसाठी नवा कोरा स्मार्टफोन, गेमिंग डिव्हाइस खरेदी करण्याचा बेत आखत असाल, तर तुमच्या बजेटचे गणित चांगलेच बिघडणार आहे. भारतीय टेक विश्वात एक मोठा बदल पाहायला मिळत असून सॅमसंग, रिअलमी, ओप्पो, विवो आणि शाओमीसारख्या तरुणाईच्या लाडक्या ब्रँड्सनी लोकप्रिय स्मार्टफोन्सच्या किमतीत थेट एक हजार रुपयांपासून ते तब्बल पाच हजार रुपयांपर्यंत प्रचंड वाढ केली आहे. बजेट आणि मिड-रेंज सेगमेंटमध्ये झालेल्या या अचानक दरवाढीमुळे गॅझेट लव्हर्स आणि सर्वसामान्य ग्राहकांना चांगलाच झटका बसला आहे.

​अँड्रॉइड विश्वात मोठा दबदबा असणाऱ्या सॅमसंगने आपल्या सर्वाधिक खपाच्या मॉडेल्सना चांगलेच महाग केले आहे. तरुणांमध्ये लोकप्रिय असणाऱ्या सॅमसंग गॅलॅक्सी एम १७ ५जी च्या विविध व्हेरिएंट्समध्ये एक ते तीन हजार रुपयांची वाढ झाली असून, हा फोन आता १७,९९९ ते २१,९९९ रुपयांच्या घरात पोहोचला आहे. सोबतच गॅलॅक्सी एफ १७ ५जी, गॅलॅक्सी एफ ७० ई ५जी आणि बजेट श्रेणीतील ए ०६, ए ०७ सीरिजच्या किमतीतही साडेतीन हजार रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. दुसरीकडे, स्टाईल आणि सुपरफास्ट चार्जिंगसाठी ओळखल्या जाणाऱ्या रिअलमीनेही ग्राहकांना जोरदार धक्का दिला आहे. रिअलमी १६ प्रो प्लस ५जी च्या बेस व्हेरिएंटची किंमत ४९,९९९ रुपयांवरून थेट ५३,९९९ रुपये झाली असून यामध्ये तब्बल चार हजारांची वाढ नोंदवली गेली आहे. याशिवाय रिअलमी १६ प्रो, १६ ५जी, १६ टी तसेच बजेटमधील सी ८३ आणि सी १०० एक्स या मॉडेल्सचे दरही एक ते चार हजार रुपयांनी कडाडले आहेत.

​कॅमेरा आणि ट्रेंडी डिझाइनच्या जोरावर तरुणाईला भुरळ पाडणाऱ्या विवोच्या टी-सीरिजमधील विवो टी ५ एक्स आणि विवो टी ४ लाइटच्या किमती दोन ते तीन हजार रुपयांनी वाढल्या आहेत. गेमिंगसाठी पसंती मिळवणाऱ्या आयकूच्या झेड १० एक्स आणि झेड ११ एक्स मॉडेल्समध्ये थेट दोन ते चार हजारांची दरवाढ झाली आहे. ओप्पोच्या ए ६ ५जी, ओप्पो एफ ३१ आणि प्रीमियम लूक असणाऱ्या रेनो १५ सी मॉडेल्सचे दरही चार हजारांपर्यंत महाग झाले आहेत. व्हॅल्यू फॉर मनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाओमीनेही आपल्या लोकप्रिय रेडमी नोट १५ ५जी, रेडमी १५ सी आणि रेडमी ए ७ प्रो च्या दरात एक ते अडीच हजार रुपयांची वाढ केली असून, विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासासाठी लोकप्रिय असणाऱ्या शाओमी पॅड ८ या टॅबलेटचे भाव तर चक्क पाच हजार रुपयांनी वाढले आहेत.

​स्मार्टफोन्सच्या किमतीत अचानक झालेल्या या भडक्यामागे जगभरात आलेली ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ अर्थात एआयची लाट कारणीभूत ठरली आहे. जगभरात मोठ्या प्रमाणावर उभारल्या जाणाऱ्या एआय डेटा सेंटर्समुळे रॅम (RAM) आणि नँड (NAND) मेमरी चिप्सचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. टेक कंपन्या डेटा सेंटर्सच्या चिप्स पुरवठ्याला प्राधान्य देत असल्याने स्मार्टफोनसाठी लागणाऱ्या मेमरी चिप्सचे भाव कडाडले आहेत. त्यासोबतच हाय-रिफ्रेश रेट डिस्प्ले पॅनल्स, प्रगत कॅमेरा सेन्सर्स आणि लॉजिस्टिक खर्चात २५ ते ३० टक्क्यांची भर पडल्याने कंपन्यांचा निर्मिती खर्च प्रचंड वाढला आहे. नफ्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी या कंपन्यांनी उत्पादन खर्चाचा हा सगळा भार थेट ग्राहकांच्या माथी मारला आहे.

​अचानक झालेल्या या दरवाढीमुळे सोशल मीडिया क्रिएटर्स, गेमर्स आणि बजेट फोन शोधणाऱ्या तरुण पिढीचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. नवीन तंत्रज्ञानाचा अनुभव घेण्यासाठी आता ग्राहकांना थेट खरेदी करण्याऐवजी बँक ऑफर्स, नो-कॉस्ट ईएमआय आणि जुना फोन एक्सचेंज करण्यासारख्या पर्यायांवरच अधिक अवलंबून राहावे लागणार आहे.

https://nynavabharatnews.online/

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??