युवकांनी नोकऱ्या मागणारे नव्हे, नोकऱ्या देणारे व्हावे’ – आमदार अशोकराव माने यांचे आवाहन
जिल्हा गुंतवणूक परिषदेत ६ हजार १०५ कोटींचे सामंजस्य करार

युवकांनी नोकऱ्या मागणारे नव्हे, नोकऱ्या देणारे व्हावे’ – आमदार अशोकराव माने यांचे आवाहन जिल्हा गुंतवणूक परिषदेत ६ हजार १०५ कोटींचे सामंजस्य करार
कोल्हापूर : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
उद्योग क्षेत्राची कार्यक्षमता वाढवणे ही काळाची गरज असून कोल्हापूरच्या औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी तरुणांनी केवळ नोकऱ्या मागणारे न राहता नोकऱ्या देणारे सक्षम उद्योजक बनावे, असे ठाम प्रतिपादन आमदार अशोकराव माने यांनी केले. जिल्हा उद्योग व सेवा विभागाच्या वतीने हॉटेल रसिका येथे आयोजित जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेत ते बोलत होते. या परिषदेत २०३ उद्योजकांसोबत ६ हजार १०५ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले असून, यातून २० हजार ८३५ रोजगारांची निर्मिती होणार आहे.
कार्यक्रमात बोलताना आमदार माने म्हणाले की, कोल्हापूर जिल्ह्यात उद्योगांच्या वाढीसाठी अत्यंत पोषक वातावरण असून येत्या काळात हा जिल्हा उद्योग क्षेत्रात संपूर्ण राज्यात अग्रेसर बनेल. उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी शासन आणि प्रशासनाकडून सर्वतोपरी सहकार्य दिले जात आहे. तरुणांनी उद्योग विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेत आर्थिक उन्नती साधावी, असे आवाहन त्यांनी केले. तसेच उद्योग विभागाच्या सर्व योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत आणि होतकरू तरुणांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी या योजनांवर आधारित एक स्वतंत्र माहितीपुस्तिका तयार करावी, अशी महत्त्वपूर्ण सूचनाही आमदार माने यांनी प्रशासनाला केली.
जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या परिषदेत कोल्हापूरला आयटी डेस्टिनेशन बनवण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेत कोल्हापूर जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल यावेळी बँक अधिकारी व यशस्वी उद्योजकांना जिल्हा उद्योग पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी पुणे उद्योग व सेवा विभागाचे सहआयुक्त संदीप रोकडे, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी उमेश देशमुख, उद्योग उपायुक्त डॉ. विद्या कुलकर्णी, कोल्हापूर फर्स्टचे अध्यक्ष सुरेंद्र जैन, माजी आमदार सुजित मिणचेकर यांच्यासह जिल्ह्यातील उद्योजक आणि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



