ताज्या घडामोडी

सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या भावात २० टक्क्यांची घसरण; किरकोळ बाजारातही दर उतरणार, ग्राहकांना मोठा दिलासा.

सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या भावात २० टक्क्यांची घसरण ; किरकोळ बाजारातही दर उतरणार, ग्राहकांना मोठा दिलासा.

​पुणे / नवी दिल्ली : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

रक्षाबंधन आणि आगामी गणेशोत्सवाच्या ऐन तोंडावर वाढलेल्या साखरेच्या दरांना अखेर वेसण बसली आहे. केंद्र सरकारने तातडीने केलेल्या धोरणात्मक हस्तक्षेपानंतर घाऊक बाजारात साखरेचे भाव तब्बल १८ ते २० टक्क्यांनी घसरले आहेत. घाऊक आणि कारखान्यांच्या स्तरावर दर खाली आल्याने आता येत्या दोन ते तीन दिवसांत किरकोळ बाजारातही साखर स्वस्त होणार असून, सणासुदीच्या खरेदीत सर्वसामान्यांचे खिसे हलके होण्यापासून वाचणार आहेत.

​गेल्या दोन आठवड्यांत बाजारात साखरेच्या दरात अचानक मोठी तेजी पाहायला मिळाली होती. देशभरात प्रतिक्विंटल दर थेट ६,४०० रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचले होते, तर किरकोळ दुकानांमध्ये साखर ६५ ते ७५ रुपये प्रतिकिलो दराने विकली जात होती. वाढत्या भावांमुळे मिठाई व्यावसायिक आणि घरगुती ग्राहकांचे बजेट कोलमडण्याची भीती निर्माण झाली होती. मात्र, ही भाववाढ प्रत्यक्ष टंचाईमुळे नसून साठेबाजी आणि सणांच्या पार्श्वभूमीवरील कृत्रिम अडवणुकीमुळे झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर केंद्र सरकारने पावले उचलली.

​वाढत्या महागाईला चाप लावण्यासाठी सरकारने १० लाख टन कच्च्या साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला मंजुरी दिली. याशिवाय केवळ निर्यातीसाठी राखीव असलेल्या प्रक्रिया केलेल्या साखरेपैकी सुमारे ३ ते साडेतीन लाख टन साखर देशांतर्गत खुल्या बाजारात विकण्यास रिफायनरीजना मुभा देण्यात आली. या निर्णयाचा तत्काळ परिणाम दिसून आला असून देशांतर्गत बाजारात साखरेचा पुरवठा वाढला आहे.

​सरकारी निर्णयानंतर साखर कारखान्यांचे दर (एक्स-मिल दर) प्रतिक्विंटल १,५०० रुपयांनी घसरून ४,८०० ते ५,००० रुपयांच्या वास्तव पातळीवर आले आहेत. कोल्हापूर, सांगलीसह पश्चिम महाराष्ट्रातील बाजारात एक्स-मिल दर प्रतिकिलो ४८ रुपयांपर्यंत खाली आले आहेत, तर उत्तर प्रदेशातही हे दर प्रतिकिलो ५२ ते ५३ रुपयांवर स्थिरावले आहेत.

​इंडियन शुगर अँड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने (इस्मा) दिलेल्या माहितीनुसार, सरकारी उपाययोजनांमुळे साखरेच्या उपलब्धतेची स्थिती सुरळीत झाली आहे. कारखान्यांच्या पातळीवरील दरकपातीचा फायदा आता किरकोळ ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास सुरुवात होईल. देशात सध्या साखरेचा मुबलक साठा शिल्लक असून रक्षाबंधन, गणेशोत्सव आणि दिवाळी अशा सलग सणांच्या काळात ग्राहकांना रास्त भावात साखर उपलब्ध राहील, असा विश्वास उद्योग जगताकडून व्यक्त करण्यात आला आहे.

https://nynavabharatnews.online

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??