आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

विसर्जन मिरवणुकीनंतर अवघ्या काही तासांत कोल्हापूर चकाचक; दोन डंपर चपलांसह तीस टन कचऱ्याचा तातडीने उठाव  

​महापालिकेचे साडेतीनशे कर्मचारी आणि स्वयंसेवकांचे रात्रभर श्रमदान; ३५ टन निर्माल्यापासून खतनिर्मिती  

विसर्जन मिरवणुकीनंतर अवघ्या काही तासांत कोल्हापूर चकाचक; दोन डंपर चपलांसह तीस टन कचऱ्याचा तातडीने उठाव  

​महापालिकेचे साडेतीनशे कर्मचारी आणि स्वयंसेवकांचे रात्रभर श्रमदान; ३५ टन निर्माल्यापासून खतनिर्मिती  

कोल्हापूर :एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

अनंत चतुर्दशीच्या ऐतिहासिक आणि भव्य सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीची सांगता झाल्यानंतर कोल्हापूर शहरात महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने राबविलेल्या युद्धपातळीवरील स्वच्छता मोहिमेमुळे संपूर्ण शहर अवघ्या काही तासांत पुन्हा चकाचक झाले. मिरवणूक मार्गावर पडलेला कचरा, निर्माल्य आणि गर्दीमुळे तुटून पडलेल्या चपलांचा खच तातडीने हटवत महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी कौतुकास्पद कामगिरी केली. या विशेष मोहिमेत सुमारे दोन डंपर भरून चपला आणि जवळपास तीस टन कचऱ्याचा यशस्वी उठाव करण्यात आला असून संकलित केलेल्या चपला पुनर्प्रक्रियेसाठी पाठविण्यात आल्या आहेत.  

​यंदाची करवीरनगरीतील विसर्जन मिरवणूक अठरा तासांच्या विक्रमी वेळेत आणि शांततेत पार पडली. रात्री बारा वाजताच डॉल्बी बंद करण्याच्या नियमाचे काटेकोर पालन करण्यात आले होते. मिरवणूक पाहण्यासाठी शहर आणि परिसरासह सांगली तसेच सीमाभागातून लाखो भाविकांनी गर्दी केली होती. मध्यरात्रीच्या सुमारास काही ठिकाणी भाविकांची झुंबड उडाल्याने आणि पुढे जाण्याच्या प्रयत्नात झालेल्या धक्काबुक्कीमुळे अनेक नागरिकांच्या चपला गर्दीत तुटून रस्त्यावरच राहिल्या. विशेषतः ताराबाई रोड, महाद्वार रोड, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर परिसर आणि पापाची तिकटी ते गंगावेश या प्रमुख मार्गांवर चपलांचा मोठा खच साचला होता.  

​पहाटे अडीचच्या सुमारास मिरवणुकीची सांगता होताच महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाची यंत्रणा तातडीने रस्त्यावर उतरली. स्वच्छता मोहिमेचे काटेकोर नियोजन करून शहरातील सर्व विसर्जन मार्ग, रंकाळा तलाव परिसर, राजारामपुरी, शाहूपुरी, कसबा बावडा आणि घाटांची स्वच्छता हाती घेण्यात आली. कसबा बावडा येथील राजाराम बंधारा परिसरातील घाटाची तर रात्री दोनच्या सुमारास अवघ्या काही वेळातच कसून स्वच्छता पूर्ण करण्यात आली होती. रस्त्यांवर साचलेल्या चपला जमा करण्यासाठी विशेष पथके नेमण्यात आली होती. गोळा करण्यात आलेल्या दोन डंपर चपला कसबा बावडा येथील घनकचरा प्रक्रिया प्रकल्पात पाठवण्यात आल्या असून त्यावर पुनर्प्रक्रिया केली जाणार आहे.  

​पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा वसा जपत यंदा इराणी खणीत दोन हजार नऊशे एकोणीस गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यात सोळाशेहून अधिक सार्वजनिक तर बाराशेहून अधिक घरगुती गणेशमूर्तींचा समावेश होता. या संपूर्ण विसर्जन प्रक्रियेदरम्यान धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सुमारे सहाशे श्री-बैठक सेवकांनी अहोरात्र सेवा बजावत तब्बल पस्तीस मेट्रिक टन निर्माल्याचे संकलन केले. हे निर्माल्य दहा डंपरद्वारे थेट खतनिर्मिती प्रकल्पाकडे पाठविण्यात आले. यामुळे जलप्रदूषण रोखण्यासोबतच कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन साधणे शक्य झाले.  

​महापालिकेच्या या स्वच्छता मोहिमेत मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, विभागीय आरोग्य निरीक्षक नंदकुमार पाटील, विनोद नाईक, पूनम जाधव, मनोज लोट, माधवी मसुरकर, आनंद बावडेकर, दिलीप पाटणकर, राकेश लोखंडे, संबंधित प्रभागांचे मुकादम आणि सुमारे साडेतीनशे स्वच्छता कर्मचाऱ्यांनी रात्रीपासूनच रस्त्यावर उतरून घाम गाळला. महापालिकेच्या या मोहिमेला शहरातील विविध सामाजिक संस्था आणि सजग तरुणांनी मोलाची साथ दिली. कोल्हापूर अर्थ वॉरियर्स, युवान कोल्हापूर, गार्डन क्लब, गोखले कॉलेजचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, क्लीन कोल्हापूर क्लब, ग्रीन सृष्टी फाउंडेशनचे प्लास्टिकमुक्त अभियान, कोल्हापूर प्रबोधिनी, सायकल वेडे कोल्हापूर आणि गडकोट गिर्यारोहक संस्थेचे शेकडो स्वयंसेवक झाडू आणि कचरा पिशव्या हातात घेऊन मोहिमेत सहभागी झाले होते.  

​उत्सव संपताच काही तासांतच शहराला पूर्ववत स्वच्छ आणि देखणे रूप मिळवून देणाऱ्या महापालिकेच्या स्वच्छता दूतांचे आणि सामाजिक संस्थांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. प्रशासकीय नियोजन, कर्मचाऱ्यांची तत्परता आणि कोल्हापूरकरांचा पर्यावरणस्नेही प्रतिसाद यामुळे उत्सवानंतरही शहरात प्रसन्न आणि निरोगी वातावरण निर्माण झाले आहे.

nynavabharatnews.online

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??