आपला जिल्हाक्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडी

संजीवन विद्यालयाने पटकावले आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद

संजीवन विद्यालयाने पटकावले आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद 

​गडहिंग्लज :एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

येथील एम. आर. हायस्कूलच्या मैदानावर पार पडलेल्या पंधरा वर्षांखालील आंतरजिल्हा शालेय फुटबॉल स्पर्धेत पन्हाळ्याच्या संजीवन विद्यालयाने विजेतेपदावर आपले नाव कोरले. अटीतटीच्या झालेल्या अंतिम फेरीत त्यांनी स्थानिक साधना हायस्कूलचा १-० अशा गोलफरकाने पराभव केला. संजीवन विद्यालयाच्या या विजयात मोलाची भूमिका बजावणारा खेळाडू अधिराज जाधव स्पर्धेचा मानकरी ठरला. पन्हाळ्याच्याच संजीवन पब्लिक स्कूलने तृतीय, तर येथील विजयमाला शिंदे हायस्कूलने चतुर्थ क्रमांक पटकावला.

 ​गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनच्या वतीने दिवंगत सुनील चौगुले यांच्या स्मरणार्थ या दोन दिवसीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे हे तिसरे वर्ष असून यामध्ये कोल्हापूर व बेळगाव जिल्ह्यातील आघाडीच्या १२ शालेय संघांनी सहभाग नोंदवून चुरस निर्माण केली होती.

 ​अंतिम सामन्याच्या पूर्वार्धात दोन्ही बाजूंनी आक्रमक चढाया पाहायला मिळाल्या. साधना हायस्कूलच्या दर्शन तरवाळ आणि समित पन्नोरी यांनी भक्कम बचाव केला, तर गोलरक्षक कार्तिक चव्हाण याने अप्रतिम गोलरक्षण करत संजीवनला रोखून धरले. त्यामुळे मध्यंतरापर्यंत सामना गोलशून्य बरोबरीत राहिला. उत्तरार्धात संजीवनच्या खेळाडूंनी आक्रमक रणनीती आखली. खेळाच्या एका टप्प्यावर शुभंकर भाटेने दिलेल्या अचूक पासवर अधिराज जाधवने सुरेख मैदानी गोल नोंदवून संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर पिछाडीवर पडलेल्या साधना हायस्कूलने बरोबरी साधण्यासाठी जोरदार प्रयत्न केले, मात्र संजीवनचा गोलरक्षक वीर पाटील याने त्यांची आक्रमणे शिताफीने परतावून लावली. साधना हायस्कूलच्या सूरज पोवारचे गोल करण्याचे प्रयत्न अखेर निष्फळ ठरले.

 ​तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात संजीवन पब्लिक स्कूल आणि विजयमाला शिंदे हायस्कूल यांच्यात चुरस रंगली. पूर्ण वेळेत सामना बरोबरीत राहिल्याने टायब्रेकरचा अवलंब करण्यात आला. यात संजीवन पब्लिक स्कूलने विजयमाला शिंदे हायस्कूलवर ४-३ अशी मात करत तृतीय क्रमांक पटकावला.

 ​स्पर्धेतील उत्कृष्ट वैयक्तिक कामगिरीत अधिराज जाधवला स्पर्धावीर, वीर पाटील याला उत्कृष्ट गोलरक्षक, दर्शन तरवाळ याला उत्कृष्ट बचावपटू, अभिषेक सासने याला उत्कृष्ट मध्यरक्षक आणि मानव पटेल याला उत्कृष्ट आघाडीपटू म्हणून गौरविण्यात आले.

 ​सामन्यानंतर झालेल्या पारितोषिक वितरण समारंभात माजी नगरसेवक राजू खणगावे, अरुणा कोलते व निवृत्त पोलीस निरीक्षक साताप्पा ढंगी यांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघांना चषक देऊन गौरविण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार विकास कोलते, युनायटेडचे संचालक शक्ती चौगुले, प्रशांत बाटे, रोहित चव्हाण, प्रशिक्षक अमित साळोखे, सुनील कलाल, सौरभ जाधव, सौरभ पाटील आणि प्रवीण पोवार यांच्यासह खेळाडू व फुटबॉलप्रेमी उपस्थित होते. युनायटेडचे सचिव दीपक कुपन्नावर यांनी प्रास्ताविकातून स्पर्धेची पार्श्वभूमी मांडली, तर स्पर्धा समन्वयक दत्ता चव्हाण यांचा विशेष सत्कार करण्यात आला. ऋषिकेश भोसले यांनी उपस्थितांचे आभार मानले. ज्येष्ठ खेळाडू प्रकाश जाधव, काशिनाथ बंदी, उदय पाटील आणि बी. बी. पाटील यांनी खेळाडूंना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या खेळाडूंना क्रीडा प्रशिक्षक अमित साळोखे, क्रीडा शिक्षक सागर पाटील व जयंत कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच प्रशालेचे प्राचार्य महेश पाटील, संस्थेचे चेअरमन डॉ. पी. आर. भोसले, सहसचिव एन. आर. भोसले आणि क्रीडा संचालक सौरभ भोसले यांचे प्रोत्साहन लाभले.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??