आपला जिल्हाताज्या घडामोडी

जागतिक ब्रँडिंगसाठी ‘कोल्हापूर महोत्सव’ संकल्पनेची गरज : राज्यपाल जिष्णु देव वर्मा

विमानतळ विस्तार, तीर्थक्षेत्र व पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा; ‘पिंक रूम’ व ट्रान्सजेंडर पथकाचे कौतुक

जागतिक ब्रँडिंगसाठी ‘कोल्हापूर महोत्सव ‘ संकल्पनेची गरज : राज्यपाल जिष्णु देव वर्मा

विमानतळ विस्तार, तीर्थक्षेत्र व पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा; ‘पिंक रूम’ व ट्रान्सजेंडर पथकाचे कौतुक

​कोल्हापूर :एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

अप्रतिम निसर्गसंपदा, धार्मिक वारसा आणि क्रीडा व औद्योगिक परंपरेचा समृद्ध वारसा लाभलेल्या कोल्हापूरचे जागतिक स्तरावर एकात्मिक ब्रँडिंग होणे काळाची गरज आहे. यासाठी ‘कोल्हापूर महोत्सव’ यासारखे व्यापक उपक्रम राबवून जिल्ह्याला जागतिक नकाशावर ठळकपणे प्रमोट करावे, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी केले. त्या दृष्टीने कोल्हापूर विमानतळाची हवाई कनेक्टिव्हिटी तातडीने वाढविण्यावरही त्यांनी विशेष भर दिला.

 ​कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील विविध महत्त्वाकांक्षी विकास प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, परिवार प्रबंधक डॉ. निशिकांत देशपांडे, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, कुलगुरू डॉ. रजनीश कामत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जास्मिन, राज्यपालांचे परिसहायक नवदीप अगरवाल तसेच इचलकरंजी महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांच्यासह प्रमुख प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

​राज्यपाल म्हणाले, की कोल्हापूरच्या भूमीला ऐतिहासिक व सामाजिक कार्याची मोठी पार्श्वभूमी आहे. कुस्ती आणि कबड्डीसारखे मैदानी खेळ, हुपरीचा प्रसिद्ध चांदी उद्योग आणि इचलकरंजीचे वस्त्रोद्योग केंद्र ही जिल्ह्याची ओळख सातासमुद्रापार पोहोचली आहे. श्री करवीर निवासिनी अंबाबाई व जोतिबा ही पवित्र शक्तिपीठे येथे असून कोल्हापुरी गूळ, कोल्हापुरी चप्पल आणि वैशिष्ट्यपूर्ण स्थानिक कृषी व हस्तकला उत्पादनांना स्वतंत्र बाजारपेठ उपलब्ध आहे. ही ताकद जगासमोर आणण्यासाठी मोठ्या महोत्सवांचे नियोजन होणे गरजेचे आहे.

​केवळ पर्यटन किंवा विकासकामांपुरते मर्यादित न राहता निकोप समाज घडविण्याचे आवाहन करत राज्यपालांनी ‘नशामुक्त भारत’ आणि ‘टीबीमुक्त भारत’ मोहिमा अधिक आक्रमकपणे राबविण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. व्यसनमुक्ती केवळ कायदे, पोलीस किंवा प्रशासकीय पातळीवर साध्य होऊ शकत नाही; त्यात कुटुंब आणि समाजाचा सक्रिय सहभाग हवा. युवा पिढीला व्यसनाधीनतेपासून वाचवण्यासाठी क्रीडापटू, कलाकार आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी पुढाकार घेऊन व्यापक लोकचळवळ उभी करावी, असे त्यांनी नमूद केले.

​बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी जिल्हा प्रशासनाच्या वतीने महामार्ग विकास, राज्य रस्ते जाळे, विमानतळ विस्तार, श्री अंबाबाई व श्री जोतिबा तीर्थक्षेत्र विकास आराखडा, पूरनियंत्रण उपाययोजना, प्रदूषणमुक्ती प्रकल्प, कोल्हापूर आयटी पार्क, शक्तिपीठ महामार्ग, विभागीय क्रीडा संकुलाचे आधुनिकीकरण, आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम, रिंग रोड, उन्नत मार्गिका आणि वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्ग प्रकल्पांची सविस्तर माहिती दिली.

​महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांनी संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाची पुनर्बांधणी, ऐतिहासिक राजर्षी शाहू खासबाग मैदान संवर्धन, राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधी स्थळ परिसर विकास, मेकॅनिकल कार पार्किंग, रंकाळा तलावावरील म्युझिकल फाऊंटन, अ‍ॅस्ट्रोटर्फ हॉकी स्टेडियम, शहर सुशोभीकरण, एलिव्हेटेड कॉरिडोअर, घनकचरा प्रक्रिया व्यवस्थापन आणि जीआयएस आधारित मालमत्ता सर्वेक्षण या नागरी सुविधा प्रकल्पांचा ताळेबंद मांडला.

​जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जास्मिन यांनी प्राथमिक शिक्षण क्षेत्रातील पीजीआय ग्रेडिंग, समृद्ध शाळा अभियान आणि विद्यार्थिनींसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘पिंक रूम’ उपक्रमाचे सादरीकरण केले. विद्यार्थिनींच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणाऱ्या ‘पिंक रूम’ उपक्रमाची दखल घेत राज्यपालांनी त्याचे विशेष कौतुक केले. यासोबतच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अंतर्गत देशात आगळावेगळा ठरलेला ट्रान्सजेंडर स्वयंसेवकांचा रेस्क्यू चमू तयार करण्याच्या संवेदनशील उपक्रमाचीही राज्यपालांनी मनापासून प्रशंसा केली.

​दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे सकाळी कोल्हापूर विमानतळावर आगमन झाल्यानंतर त्यांना पोलीस दलाकडून मानवंदना देण्यात आली. त्यानंतर त्यांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात जाऊन दर्शन घेतले व पुरातत्त्व विभागामार्फत सुरू असलेल्या संवर्धन कामांची पाहणी केली.

https://nynavabharatnews.online/

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??