व्हॉट्सॲपवर एका मेसेजला १४ पैसे पडणार ? १ऑक्टोबरपासून व्हॉट्सॲपच्या नियमांमध्ये बदल- नवे नियम आणि त्यामागचं नेमकं सत्य वाचा!
सामान्य युजर्ससाठी सेवा मोफतच, व्यावसायिक कंपन्यांवर पडणार आर्थिक भार

व्हॉट्सॲपवर एका मेसेजला १४ पैसे पडणार ? १ ऑक्टोबरपासून व्हॉट्सॲपच्या नियमांमध्ये बदल- नवे नियम आणि त्यामागचं नेमकं सत्य वाचा !
सामान्य युजर्ससाठी सेवा मोफतच, व्यावसायिक कंपन्यांवर पडणार आर्थिक भार
नवी दिल्ली :एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
इन्स्टंट मेसेजिंग ॲप व्हॉट्सॲपवर एक ऑक्टोबरपासून प्रत्येक मेसेजसाठी १४ पैसे मोजावे लागणार असल्याची चर्चा सध्या समाजमाध्यमांवर रंगली आहे. मात्र, या चर्चेमुळे घाबरण्याचे कोणतेही कारण नसून सर्वसामान्य युजर्ससाठी व्हॉट्सॲप पूर्वीप्रमाणेच पूर्णपणे मोफत राहणार आहे. मूळ कंपनी ‘मेटा’ने आणलेला हा नवीन बिलिंग नियम केवळ मोठ्या व्यावसायिक आस्थापना, ब्रँड्स आणि ई-कॉमर्स कंपन्यांसाठी लागू होत आहे.
आतापर्यंतच्या रचनेनुसार, जेव्हा एखादा ग्राहक व्हॉट्सॲपवर एखाद्या कंपनीला किंवा ब्रँडला मेसेज पाठवत असे, तेव्हा कंपनीला २४ तासांची विनामूल्य कस्टमर सर्व्हिस विंडो मिळत होती. या २४ तासांत ग्राहकसेवेअंतर्गत दिलेली उत्तरे, तक्रार निवारण किंवा ऑर्डरचे अपडेट्स पाठवण्यासाठी कंपन्यांना कोणतेही शुल्क द्यावे लागत नव्हते. एक ऑक्टोबरपासून ही २४ तासांची मोफत विंडो पूर्णपणे बंद केली जात आहे.
नवीन रचनेनुसार, भारतात व्हॉट्सॲप बिझनेस प्लॅटफॉर्म किंवा ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस (एपीआय) वापरणाऱ्या कंपन्यांना डिलिव्हर होणाऱ्या प्रत्येक सर्व्हिस मेसेजसाठी सुमारे ११.५ पैसे शुल्क आकारले जाईल. त्यावर वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू झाल्यानंतर हा खर्च प्रति मेसेज जवळपास १४ पैशांपर्यंत पोहोचतो.
व्यवसायांना दिलासा म्हणून प्रत्येक व्यावसायिक खात्याला दरमहा पहिले एक हजार सर्व्हिस मेसेज मोफत दिले जाणार आहेत. हा मासिक कोटा संपल्यानंतरच अतिरिक्त मेसेजवर प्रति मेसेज दर आकारला जाईल. न वापरलेले मोफत मेसेज पुढील महिन्यात जमा होणार नाहीत. प्रमोशनल किंवा जाहिरातींशी संबंधित मार्केटिंग मेसेजचे दर आधीपासूनच स्वतंत्र आणि अधिक आहेत.
या बदलाचा थेट फटका दररोज हजारो ग्राहकांशी व्हॉट्सॲपद्वारे संवाद साधणाऱ्या मोठ्या बँका, विमा कंपन्या, ट्रॅव्हल बुकिंग प्लॅटफॉर्म आणि ई-कॉमर्स कंपन्यांना बसणार आहे. अनेक कंपन्या ऑटोमेटेड चॅटबॉटद्वारे वारंवार रिप्लाय पाठवत असल्याने त्यांच्या बिलामध्ये वाढ होऊ शकते. परिणामी, आता कंपन्या कमीत कमी मेसेजमध्ये ग्राहकांच्या शंकांचे निरसन करण्यावर भर देतील.
स्थानिक दुकानदार किंवा छोटे व्यावसायिक वापरत असलेल्या साध्या व्हॉट्सॲप बिझनेस ॲपवर या नियमांचा कोणताही थेट परिणाम होणार नाही. तसेच नातेवाईक व मित्रांशी चॅटिंग, व्हॉईस कॉलिंग, व्हिडिओ कॉलिंग आणि ग्रुप चॅट्स या नेहमीच्या वैयक्तिक वापरासाठी व्हॉट्सॲप पूर्वीसारखेच मोफत राहणार असल्याने सर्वसामान्य नागरिकांना कोणत्याही प्रकारचा भुर्दंड सोसावा लागणार नाही.




