आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

रंकाळा पद्माराजे उद्यान परिसरातील अतिक्रमणांवर महापालिकेचा हातोडा ; अनधिकृत हातगाड्या, साहित्य कायमस्वरूपी जप्त

रंकाळा पद्माराजे उद्यान परिसरातील अतिक्रमणांवर महापालिकेचा हातोडा ; अनधिकृत हातगाड्या, साहित्य कायमस्वरूपी जप्त

​कोल्हापूर :एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

शहरातील प्रमुख रस्ते, पदपथ आणि सार्वजनिक परिसर रहदारीसाठी सुरक्षित व मोकळा ठेवण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेने अतिक्रमण निर्मूलन मोहीम तीव्र केली आहे. ऐतिहासिक रंकाळा तलाव लगतच्या पद्माराजे उद्यान परिसरात महापालिकेच्या पथकाने धडक मोहीम राबवून अनधिकृत व्यावसायिक आणि हातगाड्यांवर कारवाई केली. वारंवार सूचना देऊनही रस्त्यावर ठाण मांडणाऱ्या व्यावसायिकांचे साहित्य जप्त करण्यात आले असून, जप्त केलेले साहित्य परत न देता ते कायमस्वरूपी जमा करण्याचा कठोर निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या कारवाईमुळे परिसरातील अनधिकृत व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.

​रंकाळा आणि पद्माराजे उद्यान परिसरात सायंकाळच्या सुमारास स्थानिक नागरिक आणि पर्यटकांची मोठी रेलचेल असते. रस्त्याच्या दुतर्फा आणि पदपथांवर नियमबाह्य पद्धतीने हातगाड्या, लोखंडी स्टँड व फलक उभारले जात असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन पादचाऱ्यांची मोठी गैरसोय होत होती. या पार्श्वभूमीवर आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्या आदेशानुसार आणि उपायुक्त किरणकुमार धनवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय कार्यालय क्रमांक एक (गांधी मैदान) व अतिक्रमण निर्मूलन पथकाने संयुक्तरीत्या ही मोहीम हाती घेतली.

​महापालिकेचे पथक कारवाईसाठी परिसरात दाखल होताच काही व्यावसायिकांनी स्वतःहून सुमारे पंधरा हातगाड्या, एक लोखंडी स्टँड आणि स्टँड बोर्ड काढून घेतले. मात्र, प्रशासनाच्या सूचनांकडे कानाडोळा करून व्यवसाय सुरू ठेवणाऱ्यांवर पथकाने थेट जप्तीचा बडगा उगारला. यापूर्वी जप्त केलेले साहित्य दंड भरून परत मिळत असल्याने काही दिवसांनी पुन्हा त्याच ठिकाणी अतिक्रमण उभे राहत असे. मात्र, या वेळी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर वचक बसावा यासाठी जप्त केलेले साहित्य संबंधितांना कोणत्याही परिस्थितीत परत न देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.

​ही मोहीम सहायक आयुक्त उज्वला शिंदे आणि अतिक्रमण निर्मूलन प्रमुख प्रफुल्ल कांबळे यांच्या नेतृत्वाखाली विभागीय कार्यालय क्रमांक एकच्या कर्मचाऱ्यांनी पार पाडली. शहरातील रस्ते वाहतुकीसाठी अडथळा-मुक्त आणि सुरक्षित ठेवण्यासाठी अशा प्रकारची धडक मोहीम यापुढेही नियमितपणे सुरू राहणार असून, व्यावसायिक आणि नागरिकांनी नियमांचे पालन करून महापालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??