ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त आपटेनगर ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने जलद चालण्याची स्पर्धा उत्साहात संपन्न
शंभरहून अधिक ज्येष्ठांचा उत्स्फूर्त सहभाग

ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त आपटेनगर ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने जलद चालण्याची स्पर्धा उत्साहात संपन्न – शंभरहून अधिक ज्येष्ठांचा उत्स्फूर्त सहभाग
कोल्हापूर : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून आपटेनगर ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेली जलद चालण्याची स्पर्धा ( मिनी मॅराथॉन) अत्यंत उत्साही वातावरणात पार पडली. नवीन वाशी नाका चौक ते कणेरकर नगर रिंग रोड या ८०० मीटरच्या मार्गावर झालेल्या या स्पर्धेत साने गुरुजी वसाहत आणि आपटेनगर परिसरातील १०० हून अधिक आजी-आजोबांनी सहभाग घेत आपल्या उत्तम आरोग्याने नवा आदर्श घालून दिला.
संघाचे अध्यक्ष विनायक कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली या क्रीडा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ठीक साडेसात वाजता नरेंद्र मोदी विचार मंचाच्या अध्यक्षा पूनम तोडकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. या स्पर्धेतील सर्व बक्षिसे तोडकर यांनी प्रायोजित केली होती. प्रत्यक्ष धावण्या-चालण्यापूर्वी अशोक पोतनीस यांनी सहभागी सर्व ज्येष्ठांकडून विविध प्रकारची हास्ययोगाची प्रात्यक्षिके करून घेतली व वातावरणात आनंद निर्माण केला.
स्पर्धा सुरळीत आणि नियोजनबद्ध व्हावी यासाठी ६५ वर्षांखालील आणि ६५ वर्षांवरील अशा दोन वयोगटांत महिला व पुरुषांसाठी विभागणी करण्यात आली होती. स्पर्धकांनी ८०० मीटरचे नियोजित अंतर जलद गतीने चालून पूर्ण करायचे होते. रिंग रोडवर उपस्थित असलेले प्रतिनिधी अशोक चौगुले व विश्वास शिरोळे यांच्याकडून टोकन मिळवून मूळ ठिकाणी परत येणे अनिवार्य होते. ज्येष्ठ नागरिकांचे वय आणि आरोग्य लक्षात घेऊन रस्त्यावर संयोजकांचे प्रतिनिधी दुचाकीवरून संपूर्ण मार्गावर बारकाईने लक्ष ठेवून होते.
स्पर्धेत ६५ वर्षांवरील पुरुष गटात परशुराम नांदवडेकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर ८० वर्षांच्या बाळासाहेब भोगम यांनी अप्रतिम चपळाई दाखवत द्वितीय स्थान मिळवून उपस्थितांची दाद मिळवली. या गटात अशोक पाटील आणि श्रीकांत नलावडे यांना विभागून तृतीय क्रमांक देण्यात आला. ६५ वर्षांवरील महिला गटात राजश्री नांदवडेकर यांनी प्रथम, समिता सुर्वे यांनी द्वितीय आणि मालती जोशी यांनी तृतीय क्रमांक मिळवला.
६५ वर्षांखालील पुरुष गटात अशोक शांताराम पोतनीस यांनी प्रथम, संग्राम मोहन वेल्हाळ यांनी द्वितीय, तर रंगराव दत्तू पाटील यांनी तृतीय क्रमांक पटकावला. याच वयोगटातील महिलांच्या चुरशीच्या फेरीत जयश्री मिलिंद पाठक यांनी प्रथम, सुरेखा मोहिते यांनी द्वितीय आणि नीता हातकर यांनी तृतीय क्रमांक संपादन केला.
स्पर्धेनंतर सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र तसेच केळी व बिस्कीट असा अल्पोपहार देण्यात आला. विजेत्यांना अनुक्रमे पाचशे, तीनशे आणि दोनशे रुपयांचे रोख पारितोषिक आणि गौरवपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना पूनम तोडकर यांनी ज्येष्ठांनी शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी दैनंदिन जीवनात नियमित चालणे आणि अशा सामाजिक-क्रीडा उपक्रमांमध्ये सातत्याने सहभागी होणे काळाची गरज असल्याचे सांगितले. अध्यक्ष विनायक कुलकर्णी यांनी संघातर्फे वर्षभरात राबविल्या जाणाऱ्या पर्यटन सहली, कराओके गायन, एकांकिका आणि स्नेहमेळावे यांसारख्या विविधांगी उपक्रमांची माहिती देत परिसरातील अधिकाधिक ज्येष्ठ नागरिकांनी संघाचे सक्रिय सभासद व्हावे, असे आवाहन केले.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी संघाचे उपाध्यक्ष डॉ. देवेंद्र रासकर, सचिव शरद दिवाण, दीपक पंडित, दिलीप सासने, महादेव कुंभार, सिंधुताई शिरोळे, राजश्री सूर्यवंशी, अशोक चौगुले, विश्वास शिरोळे, संजय वाघापूरकर, अरुण कुलकर्णी आणि सुहास शेलार यांनी विशेष परिश्रम घेतले. बी चॅनेलचे प्रतिनिधी प्रमोद घनगुडे यांचे यासाठी सहकार्य लाभले. अध्यक्ष विनायक कुलकर्णी यांनी उपस्थितांचे आभार मानले.




