ताज्या घडामोडी

सहलीचा आनंद क्षणात हिरावला ; दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर पुण्याच्या ८ विद्यार्थ्यांचा बुडून दुर्दैवी अंत

सहलीचा आनंद क्षणात हिरावला ; दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर पुण्याच्या ८ विद्यार्थ्यांचा बुडून दुर्दैवी अंत

​विशेष वृत्त :एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर आज गुरुवारी एक काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली. पुण्याच्या आळंदी परिसरातील एका खाजगी कोचिंग क्लासच्या सहलीसाठी आलेल्या तब्बल आठ विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. समुद्रातील पाण्याच्या खोलीचा आणि लाटांच्या वेगवान प्रवाहाचा अंदाज न आल्याने हे सर्व तरुण विद्यार्थी लाटांच्या ओघात वाहून गेले. ऐन उमेदीच्या वयात घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण आळंदी आणि पुणे परिसरावर शोककळा पसरली आहे.

 ​पुणे जिल्ह्यातील आळंदी येथील विनर्स अकॅडमी या खाजगी शिकवणी वर्गाचे ११ वी आणि १२ वी विज्ञान शाखेचे विद्यार्थी एका खाजगी बसने दिवेआगर येथे सहलीसाठी आले होते. या सहलीमध्ये मुला-मुलींसह शिक्षकही सहभागी झाले होते. दुपारच्या सुमारास सर्वजण निसर्गरम्य दिवेआगर चौपाटीवर फिरण्याचा आनंद घेत होते. मात्र, याच दरम्यान काही विद्यार्थी पोहण्याच्या मोहाने समुद्राच्या पाण्यात उतरले. भरतीची वेळ आणि समुद्राच्या जोरदार लाटांचा अंदाज न आल्यामुळे अचानक आठ जण पाण्याच्या प्रवाहामध्ये ओढले गेले आणि दिसेनासे झाले.

 ​विद्यार्थी पाण्यात बुडत असल्याचे लक्षात येताच किनाऱ्यावर उपस्थित असलेल्या इतरांनी आरडाओरड सुरू केली. किनाऱ्यावर उपस्थित स्थानिक ग्रामस्थ, स्थानिक मच्छीमार आणि वॉटर स्पोर्ट्स कर्मचाऱ्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून स्वतःच्या जिवाची पर्वा न करता तात्काळ समुद्रात उड्या घेतल्या व बचावकार्य सुरू केले. घटनेची माहिती मिळताच दिघी सागरी पोलीस ठाण्याचे पथक आणि स्थानिक प्रशासकीय अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले.

 ​स्थानिक बचाव पथकाच्या अथक प्रयत्नांनंतर समुद्रातून बुडालेल्या सर्व आठही विद्यार्थ्यांना पाण्याबाहेर काढण्यात यश आले. त्यांना तातडीने जवळच्या बोर्ली पंचतन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र, तिथे उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती सर्व आठ विद्यार्थ्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले.

तन्मय दत्तात्रय वहिले, सुमित भारत अहिरे, प्रणव रामदास बनसोडे, कैवल्य सतीश वासनकर, राजवीर युवराज वहिले, यश किरण वानखेडे, सोहम तुकाराम भांडवलकर आणि कौस्तुभ संदीप दोंड अशी समुद्रात बुडून मृत्यू झालेल्या दुर्दैवी विद्यार्थ्यांची नावे आहेत.

 घटनेचे वृत्त समजताच रायगड जिल्हा प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी संपूर्ण घटनेची माहिती घेत मदतकार्याचा आढावा घेतला. सर्व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून, विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना या भीषण दुर्घटनेची माहिती देण्यात आली आहे. हसतखेळत घराबाहेर पडलेल्या आपल्या पोटच्या गोळ्यांचा असा निर्दयी अंत झाल्याची बातमी धडकताच पालकांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता; त्यांच्यावर जणू आभाळच कोसळले. केवळ आनंद आणि विरंगुळ्यासाठी निघालेली ही सहल आठ निष्पाप मुलांच्या आयुष्याची अखेरची यात्रा ठरेल, अशी पुसटशी कल्पनाही कोणाला नव्हती. दरम्यान, तब्बल चाळीसहून अधिक विद्यार्थ्यांची जबाबदारी असताना समुद्राच्या धोकादायक लाटांमध्ये उतरण्याबाबत निष्काळजीपणा झाला होता का, स्थानिक प्रशासकीय नियमावलींचे पालन झाले होते का आणि सुरक्षा उपायांमध्ये नेमकी कुठे उणीव राहिली होती का, या सर्व बाजूंनी पोलीस आता सखोल चौकशी करत आहेत.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??